Tuesday, December 25, 2018

भगवंताची प्राप्ती

👏👏👏

*मनुष्यमात्र भगवंताच्या प्राप्तीसाठीच जन्माला आला आहे.*
- हे म्हणणे शत प्रतिशत खरे होय. पण कोणासाठी? तर जो सत् मार्गाने जाणारा असेल त्याच्यासाठी. जो असत् मार्गाने जाणारा असेल त्याला ह्याचे काय महत्व? जसे म्हणतात नां, गाढवाला गुळाची काय चव?

*भगवंत एकच ओळखतो* 
- जो त्याची भक्ती करतो, तो त्याला आवडतो, मग तो कोणत्याही जाती-धर्माचा, वर्णाचा अथवा रंगाचा असो. ह्याचे उदाहरण म्हणजे *आपले बाबा* आणि *आपला सद्गुरू दरबार.* 

आपणा सर्वांना कल्पना आहेच की आपल्या दरबारात अनेक जाती-धर्मांच्या गुरूबंधु भगिनी आहेत. त्यामध्ये हिंदू धर्मातील तळागाळातील लोकांपासून ते उच्च वर्णीय लोकांचा जसा समावेश आहे, त्याचप्रमाणे इतर धर्मीयांचा देखील समावेश आहेच. 

प्रवचनकर्ते येथे विचारणा करताहेत - *भाग्यवान कोणाला म्हणावे?*
- येथे प्रवचनकार सांगताहेत, ज्याच्याकडे पैसा-अडका, धन-दौलत, घर-दार, जमीन-जुमला आहे, तो भाग्यवान नसून, ज्याच्याकडे किंवा ज्याच्या सोबत भगवंत आहे, तो खरा भाग्यवान होय. त्यासाठी ते म्हणतात, "भगवंत आपल्याला भेटणे हे ह्या जन्माचे उद्दिष्ट्य ठेवून, तसेच हे प्रत्येकाने आपल्या जीवनातील मुख्य कार्य समजून, तो आपणास कसा प्राप्त होईल, हे पाहावे."

पुढे ते म्हणतात, "पैसा भगवंताच्या आड येत नसतो, तर आपला अहंकार, आपला अहंभाव, आपल्यातील असलेला *मी* पणा, भगवंत प्राप्तीच्या आड येत असतो."

प्रवचनकर्ते *सेवेची* फोड करताना म्हणतात, *"मी सेवा करतो"* असे जे म्हणतात, त्यांच्याकडून भगवंताची खरी सेवा घडतच नाही आणि ह्याला कारण *सेवा करणारा* म्हणतो, *"मी सेवा करतो. तो असे म्हणत नाही की, ही सेवा भगवंत माझ्याकडून करून घेत आहेत." त्या सेवेचा कर्तेपणा तो स्वतःकडे घेत असतो.* ह्याचाच अर्थ तो स्वतःचा अर्थ त्यात पाहतो, म्हणजेच तो स्वार्थ पाहतो, तो येथे परमार्थ पाहत नाही, परम् अर्थ तो पाहत नाही. त्यामुळे त्यामध्ये *मीपणाचा* भाव दिसून येतो.

पुढे ते म्हणतात, "भगवंताची आठवण ठेवून जे जे कर्म करतात, त्याला पुण्यकर्म म्हणतात."

पुढचा जो भाग आहे, तो अतिशय महत्त्वाचा असा भाग आहे. त्यात ते म्हणतात, "भगवंत माझ्याजवळ आहेत, ही श्रद्धा ठेवून वागा." आपल्या श्री सद्गुरू माऊलींच्या सद्या सुरू असलेल्या प्रवचनांतून तेही आपणांस श्रद्धेच्या श्रेष्ठपणाबद्दलच सांगताहेत.

*सत्कर्म करणारे पुष्कळ असतात* असे ते पुढे म्हणतात. परंतु त्यामध्ये बरेच वेळा स्वार्थ बुद्धी असते, असेही ते म्हणतात. परंतु असे करू नये असे त्यांचे म्हणणे आहे. कोणत्याही प्रकारे फळाची अपेक्षा न करता सत्कर्म करावे असे ते सांगतात. आणि त्यांच्या मते तीच खरी भक्ती होय.

👏💐👏💐👏💐👏💐👏💐

No comments:

अनगडवाणी