Tuesday, December 25, 2018

मुक्ती 2

👏👏👏

*मुक्ती - भाग 2*

कालच्या भागात आपण मुक्तीचे चार प्रकार पाहिले.
त्या पुढीलप्रमाणे होत्या -

अ)  *समीपता* - देवाचे सानिध्य प्राप्त होणे. हि मुक्ती *उपासना अथवा पुण्याई* मुळे मिळते.

*समीप* या शब्दाचा अर्थच मुळी जवळ असा आहे. मुक्तीच्या बाबत समीपता म्हणतो, तो अर्थ म्हणजे देवाच्या सान्निध्यात जाणे किंवा जवळ जाणे होय.

*देवाचे सान्निध्य कधी प्राप्त होते?*
देवाचे सान्निध्य एक तर देवाची उपासना केल्याने प्राप्त होते किंवा ते पुण्याई मुळे प्राप्त होते. देवाची उपासना या जन्मातील असू शकते किंवा ती अगोदरच्या जन्मातील सुद्धा असू शकते. त्याचप्रमाणे पुण्याई देखील या जन्मातील वा पूर्व जन्मातील असू शकते. पुण्याईचा अर्थ पुण्य कर्म, हे ज्या मानवाकडून घडले, तो भाग्यवान होय. ह्यामुळेच तो मानव देवाच्या जवळ जाऊ शकतो, अन्यथा नाही.

ह्याच्या समर्थनार्थ तुकाराम महाराजांचा खालील अभंग उद्बोधक ठरेल - *पुण्यकाळ त्यांच्या राहिलासे उभा |* *देवकीच्या गर्भा देव आले ||*

या उदाहरणातून तुकाराम महाराज म्हणतात,"पुण्यामुळे देवकी मातेच्या गर्भात श्रीकृष्णाने जन्म घेतला."

ब)  *सलोकता* - देवाचा लोक प्राप्त होणे. विष्णूची उपासना करणाऱ्यांना वैकुंठ,रामाच्या उपासकांना साकेत धाम, कृष्णाच्या उपासकांना गोलोक प्राप्त होतो. हि मुक्ती *तपामुळे* मिळते.

*देव लोक कधी प्राप्त होतो?*
पहिली पायरी देवाच्या जवळ जाणे, तर ही पुढची पायरी होय.  यामध्ये आपण ज्या देवाची उपासना करतो, त्या देवाच्या लोकी जातो असे म्हटले जाते आणि ही पायरी आपणास तप केल्याने प्राप्त होते असे म्हटले जाते.

येथे तुकाराम महाराज म्हणतात, *वैकुंठा जावया तपाचे सायास|* *करणे लागे नाश जीवा बहु ||*

तुकाराम महाराज येथे म्हणतात,"जर कां मानवाला वैकुंठ म्हणा, कैलासी म्हणा किंवा स्वर्गात जावयाचे असेल तर त्याला तपःश्चर्या ही करावी लागते. तपसाधना केल्याशिवाय हे देव लोक गाठणे मानवाला शक्य होणार नाही.

क)  *स्वरूपता* - देवाचे रूप प्राप्त होणे. हि मुक्ती *ध्यानामुळे* प्राप्त होते.

*देवाचे रूप कशाने प्राप्त होते?*
तिसरी पायरी म्हणजे देवाचे रूप प्राप्त होणे होय. म्हणजेच मानवाला हे समजने की मी देवात आणि देव माझ्यात कसा सामावलेला आहे. ज्यावेळेस या रूपाची जाणीव मानवाला होते, त्याचवेळेला तो ख-या अर्थाने देवाशी एकरूप होतो. त्याचा अद्वैत भाव जागृत होतो. आणि हे फक्त ध्यानधारणेमुळे होऊ शकते.

म्हणूनच तुकाराम महाराज म्हणतात,

*ध्यानी ध्याता पंढरीराया|* *मनासहित पालटे काया ||*

आपण ज्याचे ध्यान करू, तेच रूप आपल्या मनाशी साकारते व आपण व ते कसे एक आहोत, ह्याची जाण आपणाला होते.

ड)  *सायुज्यता* - ब्रम्हरूप होणे. मोक्ष मिळणे. हि मुक्ती *ज्ञानाने* प्राप्त होते.

*ब्रह्मरूप कसे होता येईल?*
वरील तीन पाय-यांच्या पुढील व शेवटची पायरी म्हणजे सायुज्यता, येणे मोक्ष. एकदा का आपले मन त्या भगवंताशी मनाने तादात्म्य पावले की तो मानव हा मानव न राहता, देवत्वास जाऊन मिळतो. म्हणजेच तो त्या भगवंतात एकरूप, एकलय होऊन जातो. त्याला कशाचे भान राहत नाही, त्याला कशाची भ्रांत राहत नाही. अर्थात तो आणि भगवंत एक होतात. हाच तो मुक्ती मोक्ष.

*जे ज्ञान तयाचे हाती| तोची समर्थ मुक्ती|*

तुका म्हणे *नामापाशी चारी मुक्ती |* *एसे बहुता ग्रंथी बोलियले ||*

म्हणूनच तुकाराम महाराज म्हणतात,"त्या *नामातच* चारही मुक्ती अंतर्भूत आहेत, असे ग्रंथ सांगतात."

शेवटी ह्या सर्वस्वातून काय निष्पन्न होते, तर *नाम* हेच मुक्ती दाता, *नाम* हेच मोक्ष दाता. *नामा* परते अन्य काहीही साधन नाही. म्हणूनच *नामा* बद्दलच सर्व साधु-संतांनी, ऋषीमुनींनी उहापोह केलेला आहे आणि *नामा* वरच सर्वस्व भर दिलेला आहे.

अनगड आपणास आठवण करून देताना म्हणतात,"आपल्या श्री सद्गुरू माऊलीने देखील *नामाचे* आणि *नामस्मरणाचे* महत्व आपल्या प्रवचनातून वेळोवेळी विशद केलेले आहे."

No comments:

अनगडवाणी