Tuesday, November 27, 2018

*तुम्ही ज्या बाबांना शरण आहात*........

👏👏👏

*तुम्ही ज्या बाबांना शरण आहात*........

*तुम्ही ज्या बाबांना शरण आहात त्यांची ओळख करून घेता आली पाहिजे* असे जेव्हा आपले बाबा म्हणतात, त्यावेळी त्या म्हणण्यात काहीतरी तथ्य असले पाहिजे?

बाबांजवळ एखादी नवीन व्यक्ती दर्शनासाठी आली की, बाबा त्यांना सांगत की, आंधळेपणी मला शरण जाऊ नका. मला आपण सद्गुरू म्हणून जर स्वीकारत असाल, तर तत्पूर्वी मला जाणून घ्या, आपले होणारे सद्गुरू हे कोण आहेत? ते पडताळून पहा. त्याना हवे तर तावून-सुलाखून घ्या. हे सगळे केल्यानंतर जर आपणास वाटले की, आपले सद्गुरू पदासाठी योग्य आहेत, मगच त्याना शरण जा. पण हे लक्षात ठेवा की, एकदा का तुम्ही त्यांना शरण गेलात की मग आपल्या सद्गुरूना चाचपण्याचा, त्यांच्यावर अविश्वास दाखविण्याचा प्रयत्न अजिबात करू नका.

इतकेच नव्हे तर, *आपले सद्गुरू हे कोण आहेत हे जाणल्यानंतर, आपणास त्यांना स्वतःच्या दृष्टीने पाहता आले पाहिजे,* असे आपले बाबा आपणास सांगतात. याचा अर्थ काय?

येणे आपणास डोळे बंद करून ज्यावेळेस नामस्मरण करावयाचे असते, त्यावेळेस आपल्या बंद असलेल्या डोळ्यांसमोर आपल्या सद्गुरूंची मूर्ती साकारावयास हवी. आपले बाबा आपणास, जसे ते आपल्या चर्मचक्षूना दिसत असत, तसे ते दृष्टी बंद केल्यानंतरही पाहता आले पाहिजेत. मग आपणाला कळू शकेल की आपले बाबा हेच सतही आहेत. म्हणजेच आपणास कल्पना येईल की *सगुण आणि निर्गुण* हे दोन्ही तेच आहेत. अर्थात त्यासाठी आपले नामस्मरण सुद्धा तेवढ्याच उच्च पातळीवरचे असावयास हवे. आपली सता प्रतीची भक्ती देखील तेवढ्याच उच्च गतीची असावयास हवी. तेव्हाच हे शक्य होईल.

बाबा पुढे म्हणतात, "ते (सद्गुरू) सांगतात ते आपण आचरणात आणा. *जे अनन्य भावे माझ्या भक्तित निपूण आहेत, त्याला समर्थ कधीही उपाशी ठेवणार नाहीत*" आणि हे आपणांपैकी कित्येकांनी अनुभवले तर आहेच, तद्वत ते अजून सुद्धा अनुभवत आहेत.

श्री सद्गुरू माऊली पुढे म्हणते, *"समर्थ मतलबी मायेला भाळणारे नाहीत."* हे आपल्या बाबांचे म्हणणे शंभरच काय तर एकशे एक टक्के सत्य होय. आपल्या बाबानी मायावी मायेला वाजवीपेक्षा जास्त महत्त्व कधीच दिले नाही. मायेने देखील, सुरुवातीच्या काळात बाबांचा येणे सताचा कस घेतला असताना देखील, बाबांनी तिला कधीही महत्व दिले नाही, म्हणून तिने बाबांना स्थूलात असताना भरपूर त्रास देखील दिला. परंतु बाबा त्यावेळेला तिला किंवा तिच्या मायावी त-हेला कधीही भुलले नाहीत.

सद्गुरु महिमा किती अगाध आहे, याबाबत ते म्हणतात, *"वेळेला समर्थ सेवेकऱ्याचे अर्धे संचित आपल्यावर घेतात. त्यांच्याखेरीज मायेचा पुत सुद्धा हे घेऊ शकणार नाही."* ह्याची बरीच उदाहरणे आपल्यापैकी ब-याच गुरूबंधु भगिनींनी प्रत्यक्षात या दरबारात अनुभवली देखील आहेत.

सगळ्यात महत्वाचे म्हणजे, *ते समत्व बुध्दीने पाहतात.* त्यांच्याकडे द्वैत भाव नसून, ते अद्वैत भावाचे पाठीराखे होते. त्यांच्याकडे दुजाभाव अजिबात नव्हता. माझे तुझे नावाला देखील नव्हते. एक जवळचा व दुसरा दूरचा असेही नव्हते. सगळे त्याना समान होते. त्यांच्याकडे लहान मोठा, गरीब श्रीमंत हा भेदभाव था-याला देखील उभा राहू शकत नव्हता. असे ते आपले सद्गुरू होते. अशा सद्गुरूंचे आपण सेवेकरी आहोत, हे प्रत्येकांने लक्षात घेऊन आपली वाटचाल करावयास हवी.

💐🌷💐🌷💐🌷💐🌷💐🌷

गुह्यत्वाचा साक्षात्कार

👏👏👏

*_गुह्यत्वाचा साक्षात्कार_*

ह्या प्रवचनातील महत्वाचा मुद्दा असा, तो म्हणजे *आपल्या सद्गुरू मातेचे अनंताप्रत झालेले प्रयाण.* ज्यावेळेस बाबांनी अनंतांना प्रणव दिधले, त्याच वेळेस आपली माता अनंतांप्रत जाण्यास सज्ज झाली. तिचे मार्गक्रमण हे बाबानी सांगितल्याप्रमाणे *तीन टप्प्यांत* झाले आणि ते तीन टप्पे पार पडण्यासाठी स्वतः अनंतांनी व पितामहांनी पाठीमागे राहून सहाय्य केले होते. 

हे निर्वाण कार्य ज्यावेळेस घडत होते, तेव्हा माता ही ज्योती स्वरूपात आणि तीन टप्प्यांत अनंतांप्रत प्रयाण करती झाली. या प्रयाणा दरम्यान मातेने टप्प्याटप्प्याने *चार देहांचा - स्थुल, सूक्ष्म, कारण आणि महाकारण - त्याग केला होता,* परंतु या घटनेची साक्षीदार असलेली योगीनी हिला देखील ते चार देह येथे कसे ठेवले ते काही कळले नाही. याबाबत आपल्या श्री सद्गुरू माऊलीने म्हटल्याप्रमाणे, "त्या गोष्टीची जाण - त्या गुह्याची जाण योगीनीलाही दिली नाही."

आपणास कल्पना असेलच की माणूस मृत झाला असता प्रथम त्याचा श्वास बंद पडतो, अर्थात सत बाहेर पडते. श्वास म्हणजेच नाम बंद पडते. हा झाला स्थुल देहाचा भाग. इतर देहाने तो तेथेच आजूबाजूला असतो, कारण इतर तीन देहांचा नाश फक्त आणि फक्त अनंतच करू शकतात, इतर कुणीही नाही. यालाच आपण मानव मृत झाला असे म्हणतो.

तर अशाप्रकारे चार देहांचा त्याग करून माता अनंतांप्रत चालली असताना ती देह रूपी न जाता ज्योती स्वरूपात जात होती. शेवटी चारही देहांपलीकडे गेल्यावर मातेची ज्योत अनंतांमध्ये एकरूप झाल्याचे वर्णन त्यावेळेस या घटनेची साक्षीदार असलेल्या योगीनीने केले होते.

अशाप्रकारे मानव सरळसरळ अनंतांप्रत जाऊ शकत नाही, परंतु माता त्या नियमाला अपवाद होती. हे शक्य झाले आपल्या श्री सद्गुरू माऊलींमुळे. यावरून आपण एक गोष्ट लक्षात घ्यावयास हवी, ती म्हणजे, *आपले सद्गुरू हे कोण होते व आहेत?*

या सव्वीसाव्या अवतार कार्यात मानव रूप धारण केलेले आपले सद्गुरू हे - निराकार आणि आकार - ह्यातील आकार रूपी ॐकारच होत, त्याचप्रमाणे निराकारही होत. त्यामुळेच त्यांची शक्ती - आद्यशक्ती - ही आपली माता, मानवी त-हेने त्यांच्याच आदेशावरून - निराकाराने अर्थात अनंतांनी आपल्यात सामावून घेतली. तिची जागा तीच होती आणि आहे देखील. ती इतरत्र कशी जाणार? त्यामुळे ती त्यांच्यातच सामावली गेली. 

👏💐👏💐👏💐👏💐👏💐

सुमन

सद्गुरुंना पुजूया
शुभ्र सुमनांनी|

सद्गुरुंना पुजूया
शुभ्र सु मनांनी||

🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

👏👏👏

*सुमनाचे यमक मनोमन भावले*
*यमकाच्या रूपाने सद्गुरू आम्हा पावले*
*सुमन किती थोर ते सद्गुरू चरणी वाहिले*
*सु-मन किती थोर ते त्याने सद्गुरू चरण दाविले*

💐👏💐🙏💐👏💐🙏💐

हार - महात्म्य

👏👏👏

        ॥ *हार - महात्म्य*॥

या हाराला आपण वेगवेगळ्या नावांनी ओळखतो. कुणी साध्या सोप्या शब्दांत त्याला *हार* या नावांने संबोधतात, तर कुणी त्याला *पुष्पहार* म्हणतात. कुणी त्याला *पुष्पमाला* म्हणूनही ओळखतात, तर कुणी फक्त *माळा किंवा माला.* एकूण काय ! तर हा हार आपण भगवंताच्या गळ्यात घालण्यासाठी घेत असतो.

आपण पाहिले असेलच की हे हार तयार करण्यासाठी हारवाले निरनिराळ्या प्रकारची फुले वापरत असतात, ज्यामध्ये सफेद रंगाचा कागडा, लिली, गुलछडी इत्यादींचा समावेश असतो, तसेच भगव्या रंगाची अथवा पिवळ्या झेंडूची फुले देखील असतात. त्याचबरोबर साथीला लाल गुलाब, कधी कधी नारिंगी रंगाची अबोली सुद्धा असते. बरोबर अशोकाची, आंब्याची किंवा इतर हिरव्यागार पानांची सुद्धा हार सजविण्यासाठी योजना करावयाची असल्याने त्यांचीही रेलचेल असते. 

ही झाली *हार* आणि हारांची तयारी. आता हे तयार झालेले *हार* वेगवेगळ्या कामासाठी वापरण्यात येत असतात. काही *हार* भगवंताच्या गळ्यात विराजमान होतात, तर काही हार एखाद्याचा मान-सन्मान करण्यासाठी वापरले जातात, काही हार छायाचित्रांना घालण्यासाठी उपयोगात आणतात, तर काही हार मृत्यू शय्येवर पडलेल्या व्यक्तीच्या गळ्यात जाऊन स्थिरावतात. 

हारांचा रंग देखील तितकाच महत्त्वाचा. पांढ-या फुलांचे हार हे शांतीचे प्रतिक समजले जातात, तर भगव्या लाल रंगाची फुलें शक्तीचे प्रतिक म्हणून वापरण्यात येतात आणि म्हणूनच ते 
ब-याच वेळा देव देवतांच्या गळ्यात घालण्यासाठी वापरण्यात जरी येत असले, तरी लाल पिवळ्या फुलांचे हार देखील देव देवताना घातले जातात. 

विशेषकरून / मुख्यत्वे करून पांढरी फुले व जोडीला हारामध्ये इतर रंगाची आरास करण्यासाठी इतर रंगीत फुले गुंफिली जातात. परंतु हे जरी सत्य असले तरी शक्ती उपासक, देव-देवताना शक्तीचे प्रतिक असलेली लाल भगव्या रंगाच्या झेंडूच्या किंवा अस्टरच्या फुलांचाच प्रामुख्याने वापर करताना दिसून येतो हे ही तितकेच सत्य होय.

आता आपण समजून घेऊया *आपल्या सद्गुरूना कोणत्या फुलांचा हार आवडत असे? आणि कां तो आवडत असे?*

आपले हे स्थान शुद्ध, सात्विक भक्तीचे स्थान आहे हे सर्वस्वाना माहित आहेच. आपल्या सताचा प्रकाश कोणता? तर शुभ्र पांढरा. त्यात कोणत्याही रंगाची छटा नाही असा. आपल्या सताचा हा आवडता रंग. त्यामुळे सताचे आसनही पांढ-या शुभ्र रंगाचे. सत ज्यावेळेस या सव्वीसाव्या अवतार कार्यात कार्यरत होते, त्यावेळेस देखील त्यांच्या परिधानाची वस्त्रे होती पांढरी शुभ्र, यामध्ये समावेश होता तो पांढ-या धोतराचा, पांढ-या सद-याचा. पूर्वी ते पांढरी टोपी देखील वापरावयाचे, त्याचप्रमाणे पांढरा लेहंगा देखील घालायचे. एकूणच काय तर आपल्या *श्री सद्गुरू माऊलीना* म्हणजेच सताला पांढरा रंगच जवळचा होता. त्यामुळे हारांच्या बाबतही त्यांना पांढ-या रंगांच्या फुलांचा हारच आवडायचा. म्हणूनच हा सात्विकतेचे प्रतिक असलेला पांढरा रंग हारासाठी निवडून पांढ-या रंगांच्या फुलांचा हारच आपण त्यांना अर्पण करण्यासाठी वापरणे जास्त संयुक्तिक ठरेल नाही कां? मग ह्यापुढे शक्यतोवर पांढ-या शुभ्र फुलांचा हारच आपल्या श्री सद्गुरू माऊलीना अर्पण करून शुद्ध सात्विकता पाळूया.

💐💐💐💐💐💐💐💐💐

_तुकारामांचे अभंग_

👏👏👏

*_तुकारामांचे अभंग_*
  (मराठी भावार्थ सहित)

माया तें चि ब्रह्म ब्रह्म तेंचि माया । 
अंग आणि छाया तया परी ॥1॥ 

तोडितां न तुटे सारितां निराळी ।
लोटांगणांतळीं हारपते ॥2॥ 

दुजें नाहीं तेथें बळ कोणासाठीं । 
आणिक ते आटी विचाराची ॥3॥

तुका म्हणे उंच वाढे उंचपणें । 
ठेंगणीं लवणें जैसीं तैसीं ॥4॥

÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷

माया हेच ब्रह्म आणि ब्रह्म हीच माया जसे शरीर आणि सावलीच जणू. 

शरीरापासून सावली वेगळी होत नाही किंवा करता येत नाही,
पण लोटांगण घातल्याने सावली शरीराखाली नाहीशी मात्र
होत असते तद्वत ब्रह्म आणि माया एकच असले तरी ते तसे आहेत किंवा नाहीत यास्तव मनोमनी बळाचा वापर कां करावा बरे? आणि कोणासाठी करावा बरे? तसेच त्यासाठी तर्क वितर्कांना उधाण कां आणावे बरे?

तुकोबा म्हणतात, "उंच हे उंच उंच वाढतच जाते, तर आकाराने ठेंगणी लव्हाळी असतात ती ठेंगणीच राहतात." याचाच अर्थ असा की, "ब्रह्मा समोर लोटांगण घाला म्हणजे सावली प्रमाणेच माया देखील नाहीशी होईल." म्हणजेच *परब्रह्माला शरण जा, म्हणजे सावली रूपी माया आपोआपच त्या परब्रह्मात सामावली जाईल व तिचे वेगळे असे अस्तित्व राहणार नाही व आपल्या आयुष्यात तिचा त्रास होणार नाही किंवा उद्भवणार नाही.*

*। ॐ श्री सद्गुरूवे नमः l*

🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

सदा सर्वदा योग तुझा घडावा

*प. पू. श्री सद्गुरु स्वामी*
     *भगवान महाराज यांची*
              *अमृतवाणी*

*सदा सर्वदा योग तुझा घडावा ।*
*तुझे कारणी देह माझा पडावा ।*
*उपेक्षु नको गुणवंता अनंता ।*
*रघुनायका मागणे हेची आता ।*

वरील श्लोकाचा अर्थ सांगताना श्री सद्गुरू माऊली म्हणते,
"ह्या श्लोकामध्ये रामदास स्वामीनी स्वतःसाठी रामचंद्र प्रभूना आळवले आहे." 

*हे प्रभो ! प्रत्यक्ष रामा ! तुम्ही माझ्या संगती असावयास पाहिजे. तुम्ही माझ्या दृष्टि समोर रहा. अहंर्निश सतत माझ्यासोबत असा, म्हणजेच मला दर्शनयुक्त करा.* 

श्री सद्गुरू माऊली म्हणते, "रामचंद्र, सद्गुरु, परमतत्व असे संबोधून त्यांनाच आपण सत् समजतो." पण ते असे कुठेही म्हणत नाहीत की ते सर्वस्व मीच आहे.

येथे एक गोष्ट नमूद करावीशी वाटते ती म्हणजे आपले बाबा स्वतः ॐकार तत्व असून देखील, स्वतः सत् तत्व असून देखील ते मी आहे म्हणून कुठेही म्हणत नाहीत. नाहीतर आपण मर्त्य मानव सदा न कदा त्या *मी* पणाच्या गर्तेत धडपडत असतो.

बाबा पुढे म्हणतात, "नेहमी सकाळ, दुपार, संध्याकाळ अहर्निश, हे जगत् जेत्या ! तुम्ही प्रत्यक्ष माझ्या समोर असा. तुमच्या नामात मी असेन. प्रत्येक बरे, वाईट या सर्वांसाठी, दु:खांती, सुखांती नसून कुठेही असा, पण सुखांती नको व दु:खांती असा असे नाही. हे रामा ! तुम्ही सुखांती, दु:खांती नसून कुठेही असा. आपणाकरीता माझा सर्वस्व देह मी अर्पण करीत आहे. तुमच्यासाठी हा देह झीजावा. हे अविनाशा ! श्रीहरी ! देह कारणी लागावा. 

श्री सद्गुरू माऊली म्हणते, "रामदासानी त्यातले वर्म ओळखले होते. देह हा आपला नव्हे. देह हा जाणार सकळीक. प्रभो रामचंद्रांसाठी देह गेला तर तो सत् कर्मी गेला. आसनी, शयनी, भोजनी तुम्ही अहर्निश माझ्या हृदयी प्रगट असा. ते साधताना माझा देह सतत झीजत रहावा. 

बाबा विचारणा करतात, "खरोखर असा जर भक्त असेल तर सद्गुरु माऊली आपल्याला दूर ढकलील काय?" 

असे _जर सेवेकरी समर्थमय बनले, तर श्री समर्थ म्हणा किंवा श्री सद्गुरू माऊली म्हणा आपल्याला त्यांच्या चरणांपासून कदापिही दूर ठेवणार नाहीत._

*रामदास समर्थमय बनले म्हणून त्यांना समर्थ म्हणतात* असे बाबाच आपल्याला सांगतात.

जगत जननी

🙏👏🙏

*प. पू. श्री सद्गुरु स्वामी*
*भगवान महाराज यांची*
*अमृतवाणी*

आपले बाबा आपणास सांगतात, *"आपण जिला जगत् जननी म्हणतो तीच जगद् माता!"* पुढे या गोष्टीची आठवण करून देताना म्हणतात, "जगत माया निराळी."

येथे एक गोष्ट लक्षात घेण्यासारखी आहे ती म्हणजे, बाबा म्हणतात, *"जगत् जननीला सर्व अधिकार आहेत. पण या आसनासमोर अधिकार नाहीत."* आपले बाबा असे का बरे म्हणत असावेत? *कारण आपला हा दरबार सर्वसाधारण दरबार नव्हे, तर तो सताचा दरबार आहे. ॐ कारांचा दरबार आहे. येथे सताशिवाय इतर कुणाचाही अधिकार लागू होत नाही.* 

बाबा पुढे जगत् जननीला सांगताना म्हणतात, "कोणत्या सेवेक-यावर लाघव करावे, कोणावर करू नये ह्याची जबाबदारी तूझी, ते तू जाण."

आठवण करून देताना पुढे म्हणतात, "क्षमा द्यायची आहे. पण तशी क्षमा करता येणार नाही."

बाबा पुढे म्हणतात, "सेवेक-याची कसोटी घेतली तर तिची सुद्धा कसोटी घेणारा कोणीतरी आहे." म्हणजे काय? तर तिला जरी मानवांची परीक्षा घेण्याचे अधिकार असले, तरी सुद्धा ती देखील परीक्षाधीन असून, सताच्या परीक्षेला तिला देखील सामोरे जावे लागणारच आहे.

सत् काय करते? तर प्रथम कसोटी घेते आणि त्या कसोटीत पास झाल्यानंतरच कार्य सुपूर्द करते.

आपणा सर्वांना आठवण करून देताना म्हणतात, *"जगत् जननी सामान्य तत्व नाही, तर ते सुद्धा महान तत्व आहे."*

हे जरी खरे असले तरी बाबा जगत् जननीला म्हणतात, "सेवेकरी अडाणी असले तरी तू जाणीव घेतली पाहिजे." पुढे जाणीव करून देताना म्हणतात, "ज्याला परमपदाचा अधिकार आहे अशी तू सेवेकरीण असलीस तरी या दरबारात तूझी किंमत शून्य. जगत् जननी कुणाला वर पाठवीत नाही. नाना क्लुप्त्या करुन खालीच पाठवते." दरबारच्या बाबतीत तिची पायरी ठेवली आहे. तिला म्हणजे *"जगत् जननीला उत्पन्न करणारा कोणीतरी आहे."* 

बाबा पुढे सेवा, पूजा ह्या बाबतीत मार्गदर्शन करताना म्हणतात, *"सेवेक-याने वेडीवाकडी पण समाधानाने केलेली सेवा त्या ठिकाणी (सद्गुरू चरणांवर) पोहचते. पण पूजा करताना सेवेक-याची भावना कशी हवी? तर शुध्द. भावना शुद्ध नसेल तर सेवा पावन होणार नाही."* 

तसेच सेवेक-याला पूजेची माहिती नाही पण त्याने श्रध्देने केलेली पूजा मला पावन आहे असे बाबा म्हणतात. बाबा विचारणा करताना म्हणतात, "सेवेक-यामध्ये भोळा भाव व अखंड लीनत्व केव्हा येते? तर त्याच्याकडे शुद्ध आचार विचार असल्यासच ते असते. लीनत्व शुध्द असल्याशिवाय लीनत्व राहणार नाही." *लिनत्व असणा-या सेवेक-याच्या सानिध्यात परमेश्वर येतो.*

बाबा पुढे म्हणतात, "सेवेकरी एकतर अडाणी किंवा पूर्ण ज्ञानी तरी असावा, अतीविव्दान नसावा."

बाबा विद्वान कोणाला म्हणतात? 
जो प्रत्येक गोष्टीतून त्या चाकोरीच्या चौकटीत बसतो तो विव्दान. बाबा विद्वानाला महत्व देतात, अतीविद्वानाला नव्हे.

"जो योग्यतेचा सेवेकरी असेल, त्याची योग्य सेवा, योग्य तर्‍हेने त्याला शोभली पाहिजे. सद्भावना व लीनत्व ज्याच्याकडे आहे, त्याची सेवा सद्गुरू चरणी रुजु आहे."

*"समर्थांनी एकदा आदेश दिले तर ते कायमचे असतात"*, असे श्री सद्गुरू माऊली म्हणते.

पुढे सद्गुरू माऊली म्हणते, *"सुगंध कोठून व कसा येतो त्याची जाणीव घ्या."*

ह्या संदर्भात आठवण सांगाविशी वाटते ती म्हणजे, काही काही वेळा दरबार सुरू असताना, मध्येच असा काही सुगंध सुटायचा की तो सांगता यावयाचा नाही. तो फक्त अनुभवता यावयाचा. बरे ! तो कुठून येतो, कसा येतो, कशाचा येतो ते काहीही कळत नसे इतका तो अवर्णनीय असा परिमळ असायचा. संपूर्ण वातावरण एका अलौकिक सुवासाने दरवळून जायचे. असा तो सुगंध क्षणीक, काही क्षणांपुरताच असावयाचा, पण तो आपल्याला एका वेगळ्याच जगात घेऊन जायचा. आणि असे ज्यावेळेस घडायचे त्यावेळी नक्कीच श्री मालिक येऊन गेल्याची जाणीव व्हावयाची. असा तो काळ म्हणजे साक्षात श्री सद्गुरू माऊलीने आपल्या सर्वांसाठी प्रत्यक्ष अनुभव उघड करून सप्रमाण दाखवून दिल्याचा तो काळ होता. ह्यासाठीच बाबा म्हणायचे, "सुगंध कोठून व कसा येतो त्याची जाणीव घ्या." हे जरी सत्य असले तरी ती आपली कुवत होती कां? तर नाही.

बाबांचे सांगणे होते, *"सुगंध मिळणे हे सुद्धा भाग्याचे लक्षण आहे. तो सुगंध निराळाच वाटतो. त्या ठिकाणी एकाग्र व्हा. सुगंध आला, मालिक येऊन गेले असे समजू नका. सेवेक-यावर समर्थाचे अखंड लक्ष असते. कार्य करीत असताना सुगंध आला तर लीन व्हा.*

ॐकार स्वरूपा सद्गुरु समर्था......

*ॐकार स्वरूपा सद्गुरु समर्था ।*
*अनाथांच्या नाथा तुज नमो ।।*
*गुरूराज स्वामी असे स्वयंप्रकाश।*
*ज्या पुढे उदास चंद्र, रवी ॥*

एकनाथ महाराजांच्या ह्या अभंगात ते म्हणतात,"ॐकारा ! आपणच सद्गुरू आहात, आपणच समर्थ आहात. सद्गुरु माऊली आपणच अनाथांचे नाथ आहात. ज्याचा कुणी वाली नाही, त्यांचेही तुम्ही नाथ आहात."

सता! आपणच तारक आहात. पूर्णात पूर्ण असणारे तत्व देखील आपणच आहात. भक्ताला अनुग्रहीत करून, तसेच सद्गुरूंची गती देऊन पूर्णात पूर्ण पदाला पोहचविणारे ॐकार स्वरूप म्हणजेच ॐकार बीज, जे वेदांचे बा देखील आहेत,ते सुद्धा आपणच आहात.

बाबा विचारणा करतात,"पंचमहाभूतांचा अंत कुणी घेतला आहे कां? पृथ्वीचा अंत घेतला आहेत कां? पाण्याचा अंत कोणी घेतला आहे कां?" 

पाणी पण निराकारी आहे. तेज म्हणजे प्रकाश आणि वारा स्पर्शज्ञानाने कळतो. तो दिसत नाही. वायु नसेल तर आपण जीवंत राहू शकणार नाही. 

बाबा पुढे विश्वाच्या निर्मिती मागील रहस्य उघड करताना म्हणतात,

*_वायु म्हणजेच प्रणव. धुंधुंकारातून प्रणव प्रसवला. प्रणव म्हणजे अक्षरे. ती ऐकता येतात. पण पाहता येतात कां? ते आकलन करता येत नाही._* 

बाबा म्हणतात,"आपल्याला ॐकार स्वरूप पाहता आले पाहिजे." ऋग्वेद, यजुर्वेद, सामवेद, अथर्ववेद हे चार वेद असून पाचवा वेद प्रणव. पंचमहाभूते निराकारी आहेत. 

बाबा विचारतात, "ॐ कार कसा आहे? तर आठ प्रकृतीने नटलेला ॐ आहे. (ह्या आठ प्रकृती कोणत्या? पंचमहाभूतें (पृथ्वी, आप, तेज, वायू व आकाश) आणि अहंकार, बुद्धी आणि चित्त (अव्यक्त परा प्रकृती) ह्या सर्व मूळ प्रकृती मिळून अष्टदा प्रकृती होतात असे भगवद् गीता सांगते.)

पुढे बाबा म्हणतात,"समर्थांना आकार नाही. समर्थ कसे आहेत, तर निराकारी. परंतु तुमच्या कोडकौतुकासाठी ते आकार घेतात. स्वतः समर्थांनी आपल्याला आपल्यात सामाऊन घेतले आहे. *प्रगट दृष्य तर अप्रगट अदृष्य.* 

एकाने उत्पत्ती करायची, एकाने स्थितीप्रत ठेवायचे, एकाने लय करायचे, ही कर्तव्ये कोण करीत असते? तर ब्रह्मा, विष्णू व महेश म्हणजेच त्रिगुण.

समर्थ म्हणतात, "भक्ताला मला पहाता येते पण पहाणारा पाहिजे." सर्व व्यापक सद्गुरु आहेत आणि व्यापूनही अलिप्त देखील आहेत. अलख निर्गुण निराकार पद आहे. ॐकार स्वरूप गुरूराज स्वामी आहेत. त्या प्रकाशापूढे चंद्र, सूर्य फिके पडतात, तोच स्वयम् प्रकाश. 

*वेद म्हणजे प्रणव.* *ॐकार ध्वनी सुद्धा शांत होतो.* 

जाणीव ठेवून जर एखादा भक्त दर्शन घ्यावयास गेला तर त्याला दर्शन होणार नाही. ह्यासाठी जाणीव रहित सत् चरणांत तादात्म्य होणे गरजेचे आहे आणि ज्यावेळेस अशी स्थिती होते, त्याचवेळेस त्या भक्ताला सत् चित् आनंद मिळतो. तो मिळाल्यावर तो भक्त आनंदिमय होतो व अशावेळेस त्यांचे तेज लोप पावणारे नसते.

कृपादृष्टी होणे म्हणजे अमृत दृष्टीने भगवंताने भक्तावर कृपा करणे होय. ते प्रगट कसे होणार? तर हिच गुरुकिल्ली आहे. 

एकनाथ महाराज सद्गुरू माऊलींना प्रभूराज म्हणतात. बाबा पुढे म्हणतात, "आपण सत्य काय आहे ते पहा, मायेला फसू नका."

*ज्ञानबीज म्हणजे अखंड नाम* आणि *भूमी म्हणजे भक्त.* जोपर्यंत भक्ताची भूमी शुध्द होत नाही तोपर्यंत ते ज्ञानबीज सद्गुरू माऊलींकडून भक्ताच्या भूमीवर पेरले जाणार नाही. म्हणजेच ते *नाम* तुम्हाला सद्गुरू माऊलींकडून मिळणार नाही आणि नाम न मिळाल्याने तुमचा उद्धार होणे कठीण होते. 

*उद्धार होणे म्हणजे काय?* तर उद्धार होणे म्हणजे भक्ताला सद्गुरूंकडून नामाची प्राप्ती होणे व ती झाल्यावर अखंडितपणे आपण ते न विसरता घेत राहणे होय. अशाप्रकारे आपण सद्गुरू चरणांवर लिन झाले असता, आणखी उद्धार तो कोणता? त्यामुळे आपणाला श्री सद्गुरू माऊलींचे सतत सान्निध्य मिळते, वेळोवेळी सेवा करण्याची संधी मिळते, सत् कार्य करण्याची द्वारे आपोआप सद्गुरू माऊली आपणासाठी खुली करून देतात. अशाने एकप्रकारे आपला उद्धारच होत असतो.

🙏💐👏🙏💐👏🙏💐👏🙏

तुम्ही ज्या बाबांना शरण........

👏👏👏

*_भाग एक_*

*प. पू. श्री सद्गुरु स्वामी भगवान महाराज*

*तुम्ही ज्या बाबांना शरण आहात त्यांची ओळख करून घेता आली पाहिजे, त्यांना स्वत:च्या दृष्टीने पाहता आले पाहिजे असे आपले बाबा कां म्हणतात?*
कारण त्यावेळेस आपण आपल्या बाबांना मानवी त-हेने आपल्यातीलच एक म्हणून पाहत होतो. म्हणून ते म्हणायचे, "आपले सद्गुरू कोण हे आपल्याला ओळखता आले पाहिजेत. आपल्याला आपल्या स्वतःच्या दृष्टीने (येथे दृष्टी याचा अर्थ अंत:र्दृष्टीने म्हणजेच ज्ञान दृष्टीने अर्थात प्रकाशाच्या दृष्टीने डोळे बंद केलेले असोत वा उघडे असोत) पाहता आले पाहिजे." 

*हे होण्यासाठी कशाची आवश्यकता असते?* 
त्यासाठी आपल्याला आपल्या श्री सद्गुरू माऊलीने सत् पदाच्या आसनावरून बहाल केलेल्या *नामाची* उज्वलता करणे, त्या *नामाचा* जास्तीत जास्त उजाळा करणे, जास्तीत जास्त आपणाकडून *नामस्मरण* घडणे हे गरजेचे आहे.

बाबा म्हणतात, *ते आपण आचरणात आणा.*
याचाच अर्थ असा की, "सद्गुरू माऊलीने जी जी शिकवण आपणा समस्त भक्तगणांना आपल्या प्रवचनातून बहाल केली आहे, ती अंगीकारून आपल्या आचरणात आणावयास हवी. त्याबरहुकूम आपण आपले वागणे ठेवावयास हवे, तरच आपल्याला आपल्या श्री सद्गुरू माऊलीना स्वतःच्या दृष्टीने पाहता येऊ शकेल."

आपले बाबा आपल्याला आठवण करून देताना म्हणतात, *जे अनन्य भावे माझ्या भक्तित निपूण आहेत त्यांना सत् कधीही उपाशी ठेवणार नाहीत.* 

*सद्गुरु महिमा किती अगाध आहे* ह्याची जाणीव करून देताना ते पुढे म्हणतात, "समर्थ मतलबी मायेला भाळणारे नाहीत. वेळेला समर्थ सेवेकऱ्याचे अर्धे संचित आपल्यावर घेतात आणि आपल्या भक्ताला पूर्व वाईट संचितातून मुक्त करतात. त्यांच्याखेरीज मायेचा पुत वा इतर कुणीही हे घेऊ शकणार नाही, घेणे शक्य नाही."

श्री सद्गुरू माऊली सर्वांना समत्व बुध्दीने पाहतात. त्यांच्याकडे लहान थोर, श्रीमंत गरीब, डावा उजवा, उच नीच असा भेदभाव कधीही नसतो. त्यांच्यासाठी सगळे समान असतात. ते सगळ्यांना तितक्याच आत्मियतेने समजावून सांगत असतात. तितक्याच ममत्वाने बोध देखीली करीत असतात.

"या आसनाच्या ठिकाणी असणारा सेवेकरी, आसनाजवळ सेवेकरी व बाह्य ठिकाणी सद्गुरु आहे" असे जेव्हा आपले बाबा म्हणतात त्याचा अर्थ आपले बाबा आपल्या सेवेक-यावर किती विश्वास टाकतात. तो विश्वास सार्थ करण्यासाठी येथे आपण हे लक्षात घेतले पाहिजे की त्यामुळे आपली जबाबदारी वाढते व ती ओळखूनच, त्याप्रमाणे आपण वागावयास हवे. आपण आपली *कृती* आणि *उक्ती* अशी ठेवावयास हवी की आपल्या सताला किंवा त्यांच्या शिकवणीला कुठे गालबोट लागता कामा नये. उलट बाह्य स्थितीत तो चारचौघांत उठून दिसावयास हवा. त्याच्या उक्ती आणि कृतीमुळे बाह्य स्थितीने आवर्जून म्हटले पाहिजे की वाह् ! धन्य ते सद्गुरू आणि धन्य तो सेवेकरी !!

कारण आपण हे लक्षात घ्यावयास हवे की सद्गुरू हे एकच तत्व होऊ शकते. हा आपल्या श्री सद्गुरू माऊलींचा मोठेपणा आहे की ते म्हणतात, "या आसनाचा सेवेकरी येथे सेवेकरी आणि *बाह्यठिकाणी सद्गुरू आहे.*"

💐👏💐👏💐👏💐👏💐👏

वादे वादे जायते तत्वबोध:.....

👏👏👏

*_वादे वादे जायते तत्वबोध:_*

अर्थ - शब्दशः अर्थ असे सांगतो की, सुसंवाद केल्याने चांगले तत्वविवेचन होऊन ज्ञानप्राप्ती होते.

*अभिमान कशाने निर्माण होतो?*
तर *_असंगाने अभिमान निर्माण होतो._* (म्हणजेच वाईट माणसांशी संगत केल्याने वृथा अभिमान निर्माण होत असतो.) ह्यासाठी बाबा म्हणतात, *"अहंकाराची बाधा आपल्या मनाला लागू द्यायची नाही. अहंकार आपल्या मनाला शिवू द्यावयाचा नाही."*

बाबा पुढे म्हणतात, "आपला जो सत्संगाचा पाया आहे तो मजबूत करण्यासाठी नितीमत्ता अंगीकारा व त्या सताजवळ त्यांचे अखंड दर्शन मिळण्यासाठी टाहो फोडा. मानवाने सत्संग हा केलाच पाहिजे."

त्यासाठी मानवाने काय केले पाहिजे?
तर *मानवाने सत्संग केला पाहिजे.* त्यासाठी *सद्गुरू माऊलीना शरण गेले पाहीजे.* *सद्गुरू हे परब्रह्म मानले पाहिजे.* सदासर्वकाळ त्या *सद्गुरू माऊलींचे नाम मुखी घ्यावयास हवे.*

*_सद्गुरू हे सेवेक-यास अज्ञानाच्या अंध:कारातून बाजूला सारून पूर्ण प्रकाशाच्या मार्गाने घेऊन जाणारे तत्व असून, ते सर्वव्यापकही आहे._*

सर्व व्यापक म्हणजे सर्व ठिकाणी व्याप्त (चरात चर, परात पर, क्षरात क्षर, इतकेच नव्हे तर ते अणू, रेणू, परमाणू ह्यामध्ये असूनही अलिप्त असणारे असे ते तत्व आहे) असणारे असे ते तत्व आहे.

बाबा पुढे म्हणतात, "तुमची भूमी शुद्ध असेल तर *(भूमी शुद्ध करी, ज्ञान बीज पेरी)* पुरुष / स्त्री हा भेदाभेद त्यांच्याकडे नसतो, त्यामुळे अशावेळी ते भक्तात ज्ञान बीज पेरून, नाम बहाल करून, त्या भक्ताला भगवंताप्रत पोहोचण्याचा राजमार्ग खुला करून देतात." 

तो राजमार्ग कसा असावा? तर त्या सद्गुरू माऊलींचे स्मरण करताच तेथे ज्ञान प्रसवावयास हवे. अर्थात ती दिव्य दृष्टी त्या भक्तास प्राप्त होते. त्या दृष्टीच्या सहाय्याने तो भक्त त्या सद्गुरू माऊलींच्या चरणांत तादात्म्य होऊन जातो.

म्हणून श्री सद्गुरू माऊली पुढे म्हणते, "नितीने जा, अनितीस दूर सारा. मी नितीने जाणार अशी भीष्म प्रतिज्ञा करा."

 *अंतकाळीचा बा पांडुरंग !* हे नेहमी लक्षात ठेवा. इतर कुणीही अंतकाळी आपल्या मदतीला धावून येणार नाही, शिवाय श्री सद्गुरू माऊली. आणि अशात-हेने तुम्ही जर वाटचाल केलीत, तर तो भगवंत आपल्या पासून कधीही दूर राहणार नाही. ती श्री सद्गुरू माऊली आपणापासून कदापिही दूर राहू शकणार नाही.

🙏💐🙏💐🙏💐🙏💐🙏💐

अनगडवाणी