Tuesday, November 27, 2018

_तुकारामांचे अभंग_

👏👏👏

*_तुकारामांचे अभंग_*
  (मराठी भावार्थ सहित)

माया तें चि ब्रह्म ब्रह्म तेंचि माया । 
अंग आणि छाया तया परी ॥1॥ 

तोडितां न तुटे सारितां निराळी ।
लोटांगणांतळीं हारपते ॥2॥ 

दुजें नाहीं तेथें बळ कोणासाठीं । 
आणिक ते आटी विचाराची ॥3॥

तुका म्हणे उंच वाढे उंचपणें । 
ठेंगणीं लवणें जैसीं तैसीं ॥4॥

÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷

माया हेच ब्रह्म आणि ब्रह्म हीच माया जसे शरीर आणि सावलीच जणू. 

शरीरापासून सावली वेगळी होत नाही किंवा करता येत नाही,
पण लोटांगण घातल्याने सावली शरीराखाली नाहीशी मात्र
होत असते तद्वत ब्रह्म आणि माया एकच असले तरी ते तसे आहेत किंवा नाहीत यास्तव मनोमनी बळाचा वापर कां करावा बरे? आणि कोणासाठी करावा बरे? तसेच त्यासाठी तर्क वितर्कांना उधाण कां आणावे बरे?

तुकोबा म्हणतात, "उंच हे उंच उंच वाढतच जाते, तर आकाराने ठेंगणी लव्हाळी असतात ती ठेंगणीच राहतात." याचाच अर्थ असा की, "ब्रह्मा समोर लोटांगण घाला म्हणजे सावली प्रमाणेच माया देखील नाहीशी होईल." म्हणजेच *परब्रह्माला शरण जा, म्हणजे सावली रूपी माया आपोआपच त्या परब्रह्मात सामावली जाईल व तिचे वेगळे असे अस्तित्व राहणार नाही व आपल्या आयुष्यात तिचा त्रास होणार नाही किंवा उद्भवणार नाही.*

*। ॐ श्री सद्गुरूवे नमः l*

🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

No comments:

अनगडवाणी