Monday, January 30, 2012

माझी चेन्नई सफर.........!!! भाग २ रा


दिवस तिसरा –
अगोदरच्या दिवसाच्या प्रवासाचा शीन असल्यामुळे पहाटे जरा उशिरा, म्हणजे आठ वाजता उठलो. स्नान वगैरे सगळे विधी आटोपून सगळ्यांना चहा टाकला. नंतर चहापान करता करताच एकमेकांशी ओळखीपाळखी करून घेतल्या, सगळ्यांशी गप्पा मारल्या. अतुल बरोबर त्याचे मित्र होते – मुंबईचे निलेश ढमाले, जिग्नेश हिंगु, अक्षय नांदविकर तर चिंचवड पुण्याचा उदय डफळ आणि नागपूरचा गौरव कस्तुरे. दोघेजण अगोदरच निघून गेले होते.
ह्यांच्याशी गप्पा मारता मारता एक गोष्ट लक्षात आली ती म्हणजे ही नुकतीच वयाची बावीशी-तेविशी-पंचविशी ओलांडलेली मुले आपल्या घरी (कोणी मुंबईला, तर कोणी पुण्याला, तर कोणी नागपूरला आपल्या महाराष्ट्रातील इतर ठिकाणी असलेल्या घरी) जाण्यासाठी फारच उत्सुक होती. त्यांच्याशी संवाद साधताना असे कळून आले कि काहीजण दिवाळीत आप-आपल्या घरी जावून आलेत तेव्हापासून ते आजपर्यंत आपल्या कुटुंबियांशी संपर्क साधण्यासाठी त्यांना फक्त एका मोबाईल फोनशिवाय दुसरा कोणताच आधार नव्हता कि पर्याय नव्हता. नाही म्हणायला एकाकडे लॅपटोप होता, तो त्यांचा मित्र आदित्य देखील, आम्ही ज्या दिवशी चेन्नईला पोहोचलो त्याच दिवशी, त्याची पुण्याला ट्रान्स्फर झाल्यामुळे संध्याकाळी मुंबईला जाण्यासाठी रवाना झाला होता. त्याचा लॅपटोप हा सगळ्यांचा विरन्गुळ्याचा एक मोठा आधार होता. त्या लॅपटोपवर ते सगळेजण सिनेमा पहावयाचे, तर कधी फेसबुकवर आपले प्रोफाइल अपडेट करावयाचे. घरात टी.वी. नसल्यामुळे त्या मनोरंजनाच्या साधनापासूनही ते वंचितच होते. त्यामुळे एकाकीपण आणखीनच वाढले तर नवल ते कोणते? अशा एकाकीपणाच्या वातावरणात मग विरंगुळा कोणता? तर सिनेमाला जा, फिरायला जा, खा-प्या मौज-मजा करा इत्यादी इत्यादी. परंतु पहिल्या दोन-तीन महिन्यातच हे सगळे आटोपलेले असल्यामुळे आता त्याचाही कंटाळा आलेला. त्यामुळे शनिवार, रविवारच्या रजेच्या दिवशी फक्त आराम आणि आरामच करावयाचा असल्यामुळे सकाळी उशिराने उठणे हे ओघाने आलेच.
ह्यात एक सुख:द धक्का मला मिळाला तो म्हणजे त्यांच्या वागणूकीमध्ये झालेला बदल पाहून. पहिले दोन-तीन महिने मौज मजा केल्यानंतर माझ्या चिरन्जीवांसह त्याच्या मित्रांमध्ये झालेला बदल म्हणजे बाहेर गेल्यावर येणारा खाण्या-पिण्याचा भरमसाट खर्च, या गोष्ठीची त्यांना झालेली जाणीव. ही जाणीव त्यांना झाल्यामुळे त्या सगळ्यांनी आता असे ठरविले होते की जेवणासाठी उठसुठ बाहेर न जाता घरीच जेवण बनवायचे. त्यांच्यामध्ये गौरव नावाचा त्यांचा नागपूरचा जो मित्र होता, तो जेवण करण्यात पटाईत होता. सोमवार ते शुक्रवार ते सगळे मित्र कॅम्पस मधूनच रात्रीचे जेवण करून बाहेर पडत व आपल्या रुमवर येत असत, त्यामुळे आठवड्यातील पांच दिवस दोन्ही वेळ त्यांना जेवणाची ददात नव्हती. प्रश्न होता तो फक्त दोन दिवसांचा, शनिवार आणि रविवारचा. तसे पाहिले तर तोही प्रश्न नव्हता, कारण कॅम्पसमध्ये तेही दोन दिवस जेवण मिळाले असते, परंतु हे सगळेजण साधारणपणे ऑफिसपासून एक तासाच्या अंतरावर असल्यामुळे व रजेचे दिवस असल्यामुळे फक्त जेवणासाठी इतक्या लांबवर जाणे, प्रवास करणे त्यांना प्रसस्त वाटत नसावे, त्यातच त्यांचा तो शेफ मित्र त्यांच्याबरोबर असल्यामुळे त्या सगळ्यांनी असा निर्णय घेतला की घरीच जेवण करायचे. यावरून त्यांच्यातील झालेला हा सकारात्मक बदल पाहून धन्यता वाटली. इतकेच नव्हे तर ही सगळी मित्र-मंडळी जेवण करताना गौरवला एकत्र येवून मदत करीत होती व स्वत: सुद्धा जेवण करण्याचे शिकून घेत होती. यातील काही मुलांनी त्यांच्या ह्या २० ते २५ वर्षाच्या आयुष्यात कधी गॅसजवळ जाण्याचा प्रयत्नही केला नसेल, त्यांनी हे उचलेले पाऊल पाहून खरोखरीच ऊर भरून आला आणि मनही निश्चींत झाले. वाटले खरोखरीच ही मुले मोठी झालीत, विचार करायला शिकलीत, आजूबाजूच्या परिस्थितीची त्यांना जाण आली आणि फक्त जाणच नाही आली तर त्याबरहुकूम ते योग्य तो निर्णय सुद्धा घेऊ लागलेत. कोणा माता-पित्याला हे पाहून आनंद नाही होणार? का आपल्या मुलांबद्दल अभिमान नाही वाटणार? खरोखरीच अशीच जर सगळी तरुणाई वागू लागली तर मला वाटते ही मुले जी आप-आपल्या घरादारापासून लांब असलीत, आपल्या आप्तांपासून दूर असलीत, तरी ती लांब नसून जवळच आहेत असे वाटू लागते. परंतु ह्याबरोबर हे ही जाणवले की ही मुले जर आपल्या घराजवळ, आई-वडिलांजवळ असती, तर निदान काही प्रमाणात होणारा अनावश्यक खर्च टाळता आला असता, त्यामुळे आर्थिक बचत होऊन त्यांना ती भविष्यात उपयोगी ठरू शकली असती.
येथे एक नमूद करावेसे वाटते कि ह्या तरुणाईतल्या मुलांचे तसेच त्यांच्या पालकांचे कौतुक करावे तेव्हढे थोडेच. आत्ताच कुठे ही मुले आपले बी.ई.चे शिक्षण संपवून बाहेर पडतात न पडतात तोच त्यांना आय.टी. क्षेत्रात नोकरी मिळाल्यामुळे व मुंबईमध्ये त्यांच्या कंपनीची (इन्फोसिस) ऑफिसेस नसल्यामुळे त्यांना आवडो अथवा न-आवडो मुंबई म्हणा, पुणे म्हणा किंवा नागपूर म्हणा आपले राहते घरकुल सोडून, आपल्या आई-वडिलांना सोडून, आपल्या प्रिय बंधू-भगिनींना सोडून, नातेवाईकांना सोडून ट्रेनिंगसाठी व नोकरीसाठी चेन्नई, मैसूर, बेंगलोर, पुणे, हैदराबाद अशा ठिकाणी यावेच लागते. तसे पाहिले तर ह्या मुलांनी आयुष्य असे किती पाहिले? आत्ताच तर त्यांच्या आयुष्याची खरी सुरुवात झालेली असतांना त्यांना आपल्या घरापासून, माता-पित्यांपासून, भावंडापासून, नातेवाईकांपासून लांब राहावे लागत आहे हे विचार मनात येताच आम्हा माता-पित्यांनाही मनातून दु:ख होतच असते. परंतु वर म्हटल्याप्रमाणे ही मुले स्वावलंबी होताना पाहून, स्वत:चे योग्य निर्णय घेताना पाहून पुढच्याच क्षणाला वाटते की नाही हीच ती वेळ आहे ह्या मुलांनी आपल्या आयुष्यात पुढे जाण्याची, आपल्या आयुष्याचे सोने करण्याची. ह्याच वेळेला जर त्यांनी व पर्यायाने आम्ही पालकांनी थोडेसे कठोरपण नाही घेतले, थोडेसे बंध नाही ढिले केले, त्यांच्यावर विश्वास नाही टाकला, त्यांना आयुष्यात पुढे जाण्यासाठी नाही साथ दिली, तर त्यांचे पुढील भविष्य कसे उभारेल? ते मोठे कसे होतील? आपल्या आयुष्यात उंची कशी गाठतील? आणि भविष्यात नावारूपाला कसे येतील?
त्यांच्या मनातील अशाप्रकारची घालमेल पाहताना व याचेच निरुपण करताना
दुस-या दिवशीच्या त्यांच्याबरोबरच्या चहापान करण्याच्या दरम्यान त्यांना हेच समजावून सांगण्याचा मी प्रयत्न करीत होतो. काही जणांना वाटत होते की त्यांचा बॉन्डचा कालावधी संपला की त्यांना पुण्याला (कारण मुंबईला त्यांच्या कंपनीची ऑफिसेस नसल्यामुळे) ट्रान्स्फर नाही मिळाली तर ते ही कंपनी सोडून दुसरीकडे जाण्याचा निर्णय घेणार होते. त्यावेळेस हे ऐकून मला मनस्वी दु:ख झाले, त्याला कारणेही अनेक होती, आणि तीच त्यांना समजावून सांगण्याचा मी तेव्हा प्रयत्न देखील केला, त्यातीलच काही मुद्दे येथे मांडीत आहे -
पहिल्या प्रथम त्यांचे व त्यांच्या आई-वडिलांचे आभार मानले ते ह्यासाठी की अगोदरच म्हटल्याप्रमाणे या सगळ्यांनी आप-आपल्या मुलांच्या बाबतीत जो निर्णय घेतला तो किती धाडसाचा आणि योग्य होता. दुसरे असे की हे जरी खरे असले तरी आज माझ्यासमोर असणा-या या मुलांनी देखील आपल्या माता-पित्यांसारखे धैर्य दाखवून ह्या कंपनीची ऑफर स्वीकारली, हे देखील वाखाणण्या जोगेच नव्हे काय?
आज तसे पाहिले तर आय.टी. क्षेत्रामध्ये ज्या नाव घेण्यासारख्या कंपन्या आहेत त्यातील ब-याच वर असणारी, त्यांची निवड झालेली, अशी ही एक कंपनी आहे – इन्फोसिस. जागतिक स्तरावरील आई.बी.एम., अॅपल सारख्या कंपन्यांबरोबरच स्पर्धेत असणारी भारतातील क्रमांक दोनची ही कंपनी, आज विशेषत्वाने कशासाठी जर प्रसिद्ध आहे तर ती तिच्या कार्यालयीन संस्कृतीमुळे. श्रीयुत नारायण मूर्ती  आणि त्यांच्या पत्नी सौ. सुधा मूर्ती यांच्या संयुक्त कल्पनेतून साकारलेली, आणि आपल्या पुण्यातच मुहूर्तमेढ रोवलेली, आपल्याबरोबर असणा-या आपल्या कामगारांचा कुटुंब म्हणून स्वीकार करणारी, त्यांच्या हिताचे निर्णय घेणारी, त्यांना आपल्या फायद्यात सामावून घेणारी अशी ही कंपनी मिळणे हे ही आपण आपले भाग्य का समजू नये?
कंपनीची बहुतेक कार्यालये ही जरी शहरांपासून लांब असलीत तरी अतिप्रशस्त अशा जागांवर, निसर्गाच्या कुशीत प्रस्थापित केलेली असून आजूबाजूला हेतुत: निसर्ग जपून आपला कामगार अशा हिरव्यागार वातावरणामुळे सदैव टवटवीत राहिल ह्याचीही खबरदारी कंपनीने घेतलेली दिसून येते. नुसते वातावरणच जपलेले नसून, कामगारांच्या सगळ्या गोष्टींची आठवण ठेवून, तेथें प्रत्येक गोष्ट त्यांना उपलब्ध होईल हे देखील कंपनीने पाहिलेले आहे. त्यामुळे झाले काय की एकदा का आपण कॅम्पसमध्ये पदार्पण केले की सगळ्या गोष्टी तेथें उपलब्ध असल्यामुळे कशाचीही उणीव भासत नाही व त्यामुळे सर्वस्वांचा विसर पडून आपण आपले काम जोमाने करू शकतो. हो, नाही म्हणायला उणीव भासते ती आपल्या घरच्यांची. ठीक आहे, हे जरी खरे असले, तरी आज माणसाला जी किंमत आहे ती त्याच्या आर्थिक सबलतेमुळे आणि त्याच्या समाजातील असणा-या स्थानामुळे, ह्या दोन्ही गोष्टींची येथे काळजी घेण्यात आलेली असल्यामुळे, आपण आपल्या नातलगांचा केलेला व त्यांनी आपला केलेला त्याग हा त्यामानाने फारच कमी पडावा. कारण, आज आपण आपले अस्तित्व सिद्ध करण्यासाठी विद्यार्थीदशेतून नुकतेच कुठे बाहेर पडलो आहोत आणि इथे तिथे न भटकता सरळ योग्य ठिकाणी आणि योग्य मार्गावर आहोत, हे ही नसे थोडके.
आपल्या सारख्यांचे, वय-वर्षे २५ ते ४५ दरम्यानच जी काही प्रगती होईल त्यावरच संपूर्ण आयुष्य अवलंबून असेल हे ध्यानात घ्यावयास हवे. आणि येथे तर काही जण वयाच्या २३व्या वर्षांपासूनच इन्फोसिस सारख्या कंपनीमध्ये दाखल झालेले. ना नोकरी शोधण्याची दगदग, ना धडफड. फक्त आपण साध्य केलेल्या साध्यावर लक्ष केंद्रित करून आपण आपला उत्कर्ष कसा होईल हे पाहणे महत्वाचे. अशावेळी जर का आपल्यासारख्यानी आपला ह्या कंपनीमध्ये येण्याचा उद्देश्य सफल झाल्यामुळे येथेच आपली प्रगती साधण्याचा निर्णय घेतल्यास योग्यच नाही का होणार? मग त्यासाठी आपणाला आपल्या घरापासून, आपल्या नातलगांपासून लांब रहावे लागले तरी बेहत्तर असे का बरे समजू नये? असे जर का आपण ठरवून आपला निर्णय घेतलात तर मला वाटते येत्या पांच वर्षात आपण आपल्या निवडलेल्या क्षेत्रामध्ये, कंपनीमध्ये स्थिर होऊन एका विशिष्ट उंचीवर आलेले असाल आणि आज जी तुमच्या जीवाची घुसमट, घालमेल होतेय की मला माझे आई-बाबा मिळत नाहीत, माझे घर मिळत नाही, माझी भावंडे मिळत नाहीत, ती आपोआप दूर होईल. कशी दूर होईल? तर आपण आजपासून पांच वर्षांनी आजच्या पेक्षा आणखी जास्त पगार मिळवत असाल, आपली खर्चाची बाजू आजच्यापेक्षा थोडी जास्त असेल, परंतु आजच्या मानाने कमीच असेल, म्हणजेच आपली बचतीची बाजू आजच्यापेक्षा नक्कीच सुधारलेली असेल. बचत वाढल्यामुळे व पगारही जास्त असल्यामुळे, आपण आपल्या आई-बाबांना किंवा माता-पित्यांना, भाऊ-बंदाना तुम्ही जेथे असाल तेथें कधीही बोलावू शकाल, तुम्हाला आठवण झाल्यास तुम्ही रजा काढून स्वत: आपल्या माता-पित्यांना भेण्यासाठी कधीही आप-आपल्या घरी जावू शकाल आणि हे सर्व शक्य होईल जेव्हा तुम्ही आर्थिकदृष्ट्या सक्षम असाल. मग मला सांगा हे बरे की आपण आपल्या माणसात राहून आपली प्रगती न होणे हे बरे?
असे म्हणण्याचे कारण इतकेच की, आज आपण पाहतो की विशेषकरून आपल्या मुंबईमध्ये दूरदूरवरचे, परक्या मुलुखातले लोक येऊन स्थिर झालेले आहेत. इतकेच नव्हे तर ते जीवनात यशस्वीही झालेले आहेत, नावारूपाला आलेले आहेत. त्यांनी आपली कर्मभूमी म्हणून मुंबईचा स्वीकार केलेला आहे. उदा. अमिताभ बच्चन. ते ही आपल्या आई-वडिलांपासून, नातलगांपासून, भाऊ-बंदांपासून आपल्या घरादारापासून खूप दूरवर आलेले आहेत, परंतु आज ते जीवनात सगळ्या गोष्टीनी जसे, आर्थिक, व्यावसायिक वगैरे यशस्वी असल्यामुळे हवे तेव्हा, हवे तेवढयावेळा  आपल्या घरी-दारी, आपल्या मुला-माणसात जावू-येऊ शकतात. त्यांना कशाचेही बंधन नाही. कारण आज असलेली त्यांची आर्थिक, सामाजिक, व्यावसायिक, मानसिक परिस्थिती आणि ही परिस्थिती त्यांना कशामुळे प्राप्त झाली? तर त्यांच्या आर्थिक, मानसिक, व्यावसायिक सबलतेमुळे. एवढेच नव्हे तर त्यांनी ह्या जोरावर जागोजागी आपली घरे-दारे निर्माण करून ठेवलेली आहेत. आज त्यांना कशाचीही ददात वाटत नाही, पडत नाही. त्यांना आज कशाचीही खंत नाही किंवा काही घालविल्याचे, हरविल्याचे दु:ख नाही. तसे पाहिले तर सुरुवातीच्या काळात जें काही त्यांनी घालविले, हरविले, ते त्यांनी आपल्या स्वकर्तृत्वावर पुन्हा मिळविले आणि आज ते एक यशस्वी, आनंदी, सुखी व्यक्तिमत्व म्हणून आपले जीवन सुखात जगताहेत. त्यांनी जर तशी खटपट, धडफड त्यांच्या सुरुवातीच्या काळात केली नसती, त्यांनी जर घराबाहेर पडण्याची जोखीम उचलली नसती तर त्यांना हे आज शक्य झाले असते काय? तर ह्याचे उत्तर आपणास नकारार्थीच मिळेल. मी जें काही निरुपण वर दिलेले आहे ते मुंबईमध्ये भरभराटीला आलेल्या बॉलिवूड – चित्रपट व्यवसायाला आणि त्यामध्ये असणा-या व्यावसायिकांना विशेषकरून लागू पडते. त्याकाळी आणि आजही मुंबई ही चित्रपट उद्योगाची पंढरी आहे. त्यामुळे आजही आपण पाहू शकतो की ह्या क्षेत्रामध्ये नाव कमविण्यासाठी बाहेरून लोकं येतच असतात, आपले नशीब अजमाविण्याचे प्रयत्न करीतच असतात.
ह्याचेच दुसरे उदा. लक्ष्मी मित्तल ह्या व्यावसायिकांचे. राजस्थान ह्या प्रांतातील सुपुत्र श्रीयुत लक्ष्मी मित्तल हे आज इंग्लंडसारख्या पर मुलुखात एक मोठे उद्योगपती म्हणून नावारूपाला आलेले आहेत. जागतिक स्तरावरील अर्सेलर या नामचीन कंपनीला त्यांनी खरेदी केले व आपल्या व्यावसायिक साम्राज्यात सामावून घेतले.
ते मुळचे तेथील होते का? तर नाही. परंतु तेथें जाण्याचा त्यांचा निर्णय योग्यच होता नां? आज त्यांना काय कमी आहे? ते वाटेल तेव्हा भारतात येऊ शकतात, जगामध्ये कोठेही फिरू शकतात, आपल्या नातेवाईकांना भेटू शकतात. अशी बरीच उदाहरणे सापडतील की जी आज जागतिक पातळीवरदेखील यशस्वी व्यक्तिमत्वे म्हणून ओळखली जातात.
आपले महाराष्ट्रीयन व्यक्तिमत्व श्रीयुत विक्रम पंडित, हे आज जागतिक पातळीवरील सिटी बँकेचे सर्वेसर्वा आहेतच ना? असेच दुसरे एक मराठी व्यक्तिमत्व म्हणजे श्रीयुत धनंजय दातार. ह्यांनी अरब देशात जावून आपला मसाल्यांचा व्यवसाय उभा केला आणि आज ते तेथें अल-आदिल ट्रेडिंग या कंपनीचे युनायटेड अरब एमिरेट्समध्ये गेली २५ वर्षे चेअरमन आणि सी.ई.ओ. म्हणून कार्यरत आहेत. आज ते दुबईतील मसाला किंग म्हणून ओळखले जातात. श्रीयुत मंदार जोगळेकर हे तर आपल्या रत्नागिरी जवळच्या साखरप्याचे. ह्यांनी देखील अमेरिकेत जावून आपला पुस्तकांचा व्यवसाय उभा केला आणि आज ते बुकगंगा डॉट कॉम ह्या साईटवरून मराठी प्रकाशकांची हजारो मराठी पुस्तके जागतिक पातळीवर घरोघरी पोहचविण्याचे कार्य मोठ्या जोमाने पार पाडीत आहेत, तर ग्लोबलमराठी डॉट कॉमच्या रुपाने ते सोशियल नेटवर्किंग साईट देखील चालवीत आहेत. माय विश्व कार्पोरेशन ह्या नॉर्थ वेल्स्, फिलाडेलफिया, पेनीनसिल्वानिया स्थित अमेरिकेत स्थापित कंपनीचे संस्थापक सी.ई.ओ.ही आहेत.
आपल्या भारताच्या दक्षिणेकडील तामिळनाडू राज्यातील त्रिची किंवा तीरुचीलापल्ली येथून परदेशी गेलेले असेच एक व्यक्तिमत्व म्हणजे सितारामण  नारायणन जें अडोब ह्या जागतिक कंपनीमध्ये ब-याच वरच्या हुद्द्यावर कार्यरत असून त्यांचे नाव फोटोशॉप हे सोफ्टवेअर उघडताना श्रेय नामावलीमध्ये प्रामुख्याने दिसून येत असते. अशी कित्येक उदाहरणे सापडतील की जी आपल्या घरापासून दूरवर गेल्यावर नावारूपाला आली आहेत.
तसेच जर आपण निवडलेल्या आई.टी. क्षेत्रामध्ये आपणास नावारूपाला यावयाचे असेल, तर आपणालाही ह्या क्षेत्रामधील आई.टी. हब असलेल्या (म्हणजेच पर्यायाने आय.टी.चे बॉलिवूड असणा-या, आय.टी.ची पंढरी असणा-या) चेन्नई, बंगलोर, हैदराबाद, गुरगाव, पुणे येथेच किंवा परदेशामध्ये आपले नशीब अजमवावे लागेल, येथेच आपली प्रगती साधावी लागेल, येथेच आपल्याला आपल्या स्वबळावर नाव-लौकिक कमवावा लागेल, आर्थिक दृष्ट्या स्वावलंबी बनावे लागेल आणि मला वाटते आपण आणि आपल्या माता-पित्यांनी जो निर्णय काल घेतला होता तो खरोखरीच योग्य असा होता, आहेही आणि मला फक्त आशाच नाही तर पक्की खात्री आहे, तुम्ही लवकरच म्हणजे येत्या दोन-चार वर्षात तसा तो सिध्द कराल. फक्त त्यासाठी आपले मन थोडे खंबीर करा आणि कामाला लागा, जें तुम्ही लागलेलेच आहात, त्यामुळे तशी आशा आम्ही करावयास हरकत नाही.
मी आतापर्यंत केलेल्या अभ्यासात मला एक गोष्ट आढळून आली ती ही की जो मनुष्य आपल्या घरापासून लांब असतो, तो लवकर प्रगती करतो. आपण विचाराल, हे कसे? तर त्याचे कारण असे की, जो आपल्या मुलामाणसात असतो, ज्याचे घर जवळपास असते, त्याला कामावर असताना वेळ झाली की घरी जाण्याची ओढ लागते व थोडा जरी उशीर झाला की तो नाराज होतो, रागावतो, आपल्या वरीष्टांशी भांडतो, त्यामुळे होते काय की आपल्या कामात तो जास्त वेळ देण्यास का-कु करतो, जास्त परिणामकारकरित्या कार्य करू शकत नाही, त्यामुळे त्याची त्याच्या कामातील प्रगती खुंटते, त्याचे सगळे लक्ष घरी जाण्याकडे असते, तर ह्याच्या उलट जो मनुष्य आपल्या घरापासून दूरवर परमुलखामध्ये असतो, त्याला त्याचे नातलग किंवा त्याचे घर जवळपास नसल्यामुळे ती ओढ राहत नाही, दुसरे असे की जेथे त्याने भाड्याने घर घेतले असेल तेथील ओढ ही आपल्या घराप्रमाणे नसल्यामुळे म्हणा किंवा अॅटचमेंट नसल्यामुळे म्हणा, किंवा खाण्यापिण्याची गैरसोय असल्यामुळे म्हणा तो जास्तीत जास्त वेळ-काळ आपल्या कामाच्या ठिकाणी देऊ शकतो, त्यामुळे होते काय की तो आपले जास्तीत जास्त लक्ष कामावर केंद्रित करू शकतो, कामासाठी जास्त वेळ देऊ शकतो, पर्यायाने आपल्या कामामुळे व वरिष्ठांच्या मर्जीमुळे आपली प्रगती लवकरात लवकर करून घेऊ शकतो. अशाप्रकारे तत्पर प्रगती होण्याचा त्याचा मार्ग खुला होऊन तो लवकरच वरच्या पदाला पोहोचतो आणि एकदा का तुम्ही वरवर जात राहिलात, तर तुम्हाला काय कमी आहे? तुम्हाला हवे ते मिळू शकते. फक्त तुम्ही आर्थिक दृष्टीने सबळ होणे महत्वाचे आहे आणि हे तेव्हाच शक्य होईल, जेव्हा तुम्ही हे सर्वस्व आपल्या नित्यनियमित कामातून सगळ्यांना दाखवून द्याल. त्यासाठी तुम्हाला आपल्या कामावर लक्ष केंद्रित करावयास हवे आणि ते शक्य होईल फक्त वर उल्लेखिल्याप्रमाणे.
मग आता मला सांगा, हे आपल्या डोक्यातील मुंबई म्हणा, पुणे म्हणा, नागपूर म्हणा जाण्याचे जें खुळ शिरले आहे, ते काढून नको का टाकावयास? अशाने का आपली प्रगती होणार आहे? तुम्ही जितके आपल्या घराच्या ठिकाणी जवळ याल, तेवढे तुमचे तुमच्या कामातील लक्ष जास्त प्रमाणात विचलित होईल व तुम्ही प्रगतीपासून दूर जाल, ह्याच्या उलट तुम्ही जेवढे म्हणून तुमच्या घरापासून लांब राहाल, तेवढे तुम्ही आपल्या कार्यात यशस्वी होण्याचे प्रमाण वाढेल. फक्त यावेळेस काळजी एवढीच घ्यावयाची ती म्हणजे वाईट संगत करावयाची नाही, वाईट गोष्टी करण्याचे टाळावे, ज्या ज्या काही अवैध गोष्टी आहेत त्या टाळल्या म्हणजे झाले. पहा तुम्ही कसे प्रगतीपथावर चालू लागता ते.
ह्याची बरीचशी उदाहरणे आपण आज आपल्या मुंबईतच पाहतो. बरेच लोकं आज आपल्या मुंबईत बिहार राज्यातून, उत्तरप्रदेशातून, दक्षिणेकडील राज्यातून, उत्तरेकडून पूर्वेकडून, पश्चिमेकडून मुंबईत दाखल झालेले आहेत आणि स्थानिकांपेक्षा अधिक यशस्वी झालेले आहेत. याचे कारण वर उल्लेखिल्याप्रमाणे त्यांच्याकडे असणारा अनिर्बंध वेळ, तसेच नातलग, भाऊ-बंद, यांच्या पाशापासून मुक्त असणारे त्यांचे जीवन. इतकेच नव्हे तर स्वत:च्या पोटाची, मीठ-भाकरीची त्यांना सतत असलेली काळजी. त्यामुळे होते काय की ही माणसे जास्तीत जास्त वेळ आपणा स्वत:ला आपल्या कामात गुंतवून घेतात व पर्यायाने यशस्वी होतात आणि आपण स्थानिक मात्र आहोत तेथेच  राहतो. 
दुसरे असे की, आज आपण भारतातच आहोत, परंतु घरापासून लांब आहोत म्हणून मनाला सारखे वाटते की आपल्या कार्यालयापासून आपले घर जवळ असते तर बरे झाले असते, आपली माणसे आपल्या जवळ असावीत आणि म्हणून मला मुंबईला जायचे आहे, मला पुण्याला जायचे आहे, मला नागपूरला जायचे आहे. परंतु विचार करा की समजा उद्या तुम्हाला भारताबाहेर पाठविण्यास तुमची कंपनी तयार झाली, तर त्यावेळेस देखील तुम्ही हेच म्हणणार काय की नाही मी भारताबाहेर जाणार नाही, मला आपली मुंबईच द्या किंवा पुणे द्या किंवा नागपूर द्या. मग मला सांगा अशावेळेस आपण सगळ्यांचा त्याग करून भारताबाहेर यु.एस.ए., यु.के.ला नाही का जाणार? अशावेळेस आपण म्हणणार का मला माझा देश सोडून नाही जायचे आहे.
अशावेळेस बाहेर जाणेच हिताचे ठरणार, त्यामुळेच आपली आर्थिक बाजू बळकट होणार आणि आपण आपले आपल्या जीवनात ठरविलेले ध्येय गाठू शकणार आहात.
आपण आपला काम-धंदा कशासाठी करीत असतो? आपण जीवनात शिक्षण कशासाठी घेत असतो?
आपण सगळेजण हे मान्य करू की आपण शिक्षण घेतो तेच मुळी चांगली नोकरी मिळावी म्हणून नाही का? मग चांगली नोकरी म्हणजे तरी काय? ती चांगली आहे हे कसे समजावे?
तर समाजामध्ये जें काही चाललेले आहे त्यावर आपण आपले लक्ष ठेवून असतो. शिक्षण घेता घेता आजूबाजूच्या लोकांकडून, शिक्षकांकडून, आपल्या आई-वडिलांकडून, वडीलधा-या मंडळीकडून ज्या काही गोष्टी शिकविल्या जातात, आपल्या स्वत:च्या अभ्यासातून, इतर मित्र-मंडळींच्या चर्चांमधून उलगडलेल्या अनेक गोष्टीचा परिणाम म्हणून जेव्हा आपणास कळते की अमुक एक कंपनी चांगली आहे किंवा वाईट आहे, तेथें मिळणारे आर्थिक लाभ, तसेच इतर लाभ हे इतरांपेक्षा चांगले आहेत, कंपनीचा आणि तेथील अधिका-यांचा त्यांच्या कामगारांकडे बघण्याचा दृष्टीकोन चांगला आहे, त्या कंपनीबद्दलचे त्या क्षेत्रात वावरणा-या तज्ञ लोकांकडून मिळालेले रिपोर्ट्स चांगले आहेत अशाप्रकारे जेव्हा आपणास माहिती होते, त्यावेळेसच आपण म्हणतो की कंपनी चांगली आहे. याचाच अर्थ नोकरी करण्यायोग्य ही कंपनी आहे.
अशाप्रकारे एकदा का आपण एखादी कंपनी निवडली की मग इथे तिथे न पाहता आपण आपल्याला आपल्या कामात सर्वस्व झोकून दिले पाहिजे. कोणत्याही गोष्टीने विचलित न होता, आपले ठरविलेले ध्येय गाठण्याचा प्रयत्न केला पाहिजे. जास्तीत जास्त वर्षे एका कंपनीमध्ये काढली पाहिजेत व त्याचबरोबर आपण आपल्या कामात प्रगतीही केली पाहिजे. इतकेच नव्हे तर वेळ मिळाल्यास किंवा न मिळाल्यास वेळ काढून आपण आपली शैक्षिणक पात्रता देखील वाढविली पाहिजे. आहे त्यातच समाधान जरूर माना, परंतु त्याचबरोबर नेहमी ज्ञानाचे भुकेले रहा आणि आपले ज्ञान वाढवीत रहा. त्यामुळे आपल्या क्षेत्रामध्ये वरची पायरी गाठ्ण्यासाठी त्याचा उपयोग होऊन आपण वर-वर जाऊ शकाल, आपणास पदोन्नती मिळेल, आपणास आपले जीवनातील ठरविलेले ध्येय गाठता येईल व पर्यायाने कंपनीची देखील भरभराट होईल. ह्याच्या उलट ज्यावेळेस आपण घाई-गडबडीने निर्णय घेवून थोड्या थोड्या कालावधीने कंपन्या बदलीत असतो, त्याचा परिणाम असा होतो की आपण आपली मन:स्थिति दुस-या कंपनीस दाखवून देत असतो. मुलाखतीला गेल्यावर त्या कंपनीच्या अधिका-यांच्या हे लक्षात येते व त्यांना वाटते की हा माणूस एका ठिकाणी स्थिर होत नाही, त्यामुळे जर का आपण ह्याला आपल्याकडे ठेवले तर कशावरून हा येथे स्थिर राहील व आपले काम चोख करील? म्हणून मग आपली निवड केली जात नाही व पर्यायाने आपण एका चांगल्या नोकरीस मुकतो. म्हणून एकादी कंपनी जर सोडायची असेल, तर त्यासाठी आपणाजवळ सबळ कारण हवे, त्याचबरोबर वर म्हटल्याप्रमाणे ज्या सर्वस्व गोष्टी सांगितल्या आहेत, त्यामध्ये ती कंपनी बसली पाहिजे. फक्त ती घराजवळ आहे म्हणून नाही किंवा मला माझ्या नातेवाईकांमध्ये जाता येते म्हणून तिची निवड करणे योग्य होणार नाही.      
आपण एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे ती म्हणजे आपण जें आपल्या कर्तव्यासाठी क्षेत्र निवडले आहे ते म्हणजे आय.टी., जें जागतिक स्तरावर विखुरलेले क्षेत्र आहे. आणि अशावेळी त्याची आपण जाण न ठेवताच जर कुपमंडूकवृत्तीने त्या डबक्यातील बेडकासारखे डबक्याच्या बाहेर न पडण्याचा मार्ग अवलंबिला, तर ते कितपत योग्य आहे? मग अशावेळेला आपली प्रगती कशी होईल? आपण आपल्या माता-पित्यांचे तसेच आपल्या स्वत:चे स्वप्न साकार कसे करणार? आपण उच्च पदावर कसे पोहचणार? तर वेळीच ह्या गोष्टीकडे लक्ष देवून आपण जो आपला मार्ग अनुसरला आहे, तो योग्य आहे हे सगळ्यांना, तसेच स्वत;लाही दाखवून देवून त्या मार्गाने जावूनच आपली प्रगती साधावयाची आहे, जीवनात ठरविलेली उंची गाठावयाची आहे आणि सर्वस्वानां सुखी करावयाचे आहे. आपण पद आणि पैसा कमाविलात की सगळी सुखे आपल्या पायाशी लोळण घ्यावयास लागतील. सर्वस्व आपल्या जवळ येईल आणि आता जी सर्वस्वांपासून लांब असल्याची भीती वाटते आहे ती नाहीशी होऊन, आपणच इतरांना, पुढच्या पिढीला मार्गदर्शन करू शकाल. यशाचा मार्ग दाखवू शकाल. मग हे माझ्या मित्रानो करणार ना?
मी तुमचा वडिलधारी असलो, तरी तुमचा एक मित्र म्हणून माझी तुम्हा सर्वांना विनंती आहे की तुम्ही तुमचे लक्ष्य गाठण्याचा प्रयत्न करा व त्यासाठी कामात जास्तीत जास्त लक्ष घालून, वरिष्ठांची मर्जी राखून लवकरात लवकर मोठे व्हा. इतकेच नव्हे तर माझे तुम्हाला सांगणे आहे की तुम्ही तुमचे पुस्तकी ज्ञान देखील वाढवा, त्यासाठी भरपूर वाचन करा, नव-नविन शिक्षण घ्या व आपली पात्रता वाढवा आणि पर्यायाने उच्च पदावर आरूढ व्हा.       
आपण ज्या कंपनीत काम करीत आहात त्या कंपनीला आशियायी देशांमध्ये आय.टी. क्षेत्रातील कामगारांना ट्रेनिंग देणारी एक युनिवरसिटी आहे असे मानले जाते. इथे फक्त ट्रेनिंगच दिले जात नाही तर त्याचबरोबर तुम्हाला भरघोस असा पगारही दिला जातो. त्यामुळे होते काय की आपण आर्थिकदृष्टया देखील सबळ होतो. भरघोस म्हणण्याचे कारण आपल्यासारख्याना इतर कंपन्यांपेक्षा येथे सुरुवातीला देण्यात येणारा पगार हा इतरांपेक्षा थोडा जास्तच असतो असे पाहण्यात आलेले आहे. त्याचबरोबर येथे देण्यात येणारी व्यावसायिक ट्रेनिंग देखील सखोल अशी सहा महिन्यांची असते. ह्या सहा महिन्यांच्या ट्रेनिंगच्या दरम्यान त्यांची राहण्याची देखील काही नाममात्र चारजेस् घेऊन कंपनीकडून सोय केली जाते.
जी मुले आज बी.ई. करून येथे आलेली आहेत त्यांचे पगार भरघोस देण्यामागेसुद्धा श्रीयुत नारायण मूर्ती आणि त्यांची पत्नी हीच कारणीभूत आहेत. पूर्वीची पारंपारिक पद्दत मोडीत काढून ह्या दोघा पती-पत्नीनी कामगारांना कंपनीच्या फायद्यामध्येसुद्धा सामावून घेण्यास सुरुवात केली. अशाप्रकारे सर्वाथाने विचार करूनच ही कंपनी पुढे जात असताना, निश्चितच तिचे कामगारही आपल्या आयुष्यात उंची गाठ्णारच. असे असताना जी कंपनी आपल्या कामगारांच्या हिताचा नेहमीच विचार करते आहे, तिला सोडून पळत्याच्या पाठीमागे लागण्यात काय अर्थ आहे? का तर मला मुंबईला जायचे आहे म्हणून? की मला माझ्या घराजवळ जावयाचे आहे म्हणून? मी घराजवळ आल्यामुळे माझी प्रगती होणार आहे का? ह्या सगळ्या गोष्टींचा योग्य तो विचार करूनच पुढील निर्णय घेणे योग्य नाही का होणार?
इतर कंपन्यांमध्ये जावयाचे झाल्यास तेथील कार्यालयीन संस्कृती (ऑफिस कल्चर) कशी आहे, तेथील वातावरण कसे आहे, तेथील वरिष्ठ कसे आहेत वगैरे सगळ्या गोष्टीचा विचार करूनच निर्णय घेणे हिताचे ठरेल. घाई-गडबडीने कोणताही निर्णय घेणे योग्य नाही, कारण अशी संधी पुनः मिळणे नाही.
इतके करूनही जर कोणाला वाटत असेल की मला ही कंपनी सोडून माझ्या घराजवळील दुस-या कंपनीत भरती व्हायचे आहे, तर अशावेळी माझे तुम्हास सांगणे आहे की तुम्ही तेथील नोकरी स्वीकारण्याआधी तेथील सगळ्या गोष्टींची चौकशी करा, तेथील काम करीत असलेल्या कामगारांचे त्या कंपनीबद्दल असणारे मत विचारात घ्या, तेथील कामाचे स्वरूप लक्षात घ्या, तेथें देण्यात येणा-या पदोन्नतीबद्दल माहिती करून घ्या, तेथील इतर लाभांबद्दल माहिती घ्या, तेथें मिळणा-या आर्थिक लाभांबद्दल माहिती करून घ्या, इतकेच नव्हे तर तेथील कार्यालयीन संस्कृती पाहून मगच आपला निर्णय पक्का करा. घाई-गडबडीने कोणताही निर्णय घेऊ नका. नाहीतर उगाचच पस्तावण्याची वेळ आपणावर येईल. त्याबरोबरच आत्ताची कंपनी सोडवायची असल्यास, सोडण्यापूर्वी वरील सगळे प्रकार पडताळून पाहिल्यानंतरच व स्वत:ची खात्री झाल्यानंतरच रितसर राजीनामा देवून ही कंपनी सोडून जा. पळपुटयासारखे पहिल्या कंपनीस न कळविताच व दुस-या कंपनीकडून ऑफर लेटर मिळाल्याशिवाय अगोदरची कंपनी सोडू नका. माझी आपणा सर्वस्वांस विनंती आहे की येती पांच वर्षे तरी ही कंपनी सोडू नका आणि  जो काय निर्णय घेणार असाल तो पांच वर्षानंतरच घ्या.
तर मित्रानो, तुमचे, तुमच्या कुटुंबियांचे आणि माझे हे स्वप्न पुरे करणार ना?
अशाप्रकारे माझ्या चिरंजीवाना व त्याच्या मित्रांना समजावून सांगितल्यानंतर त्यांनी होकारार्थी माना डोलाविल्या. त्यामुळे येथे आल्याचे समाधान मिळाले. इतकेच नव्हे तर वेळीच आपणास सावध करण्याची संधी मिळाल्याबद्दल मन:पूर्वक धन्यता वाटली.
आजचा कार्यक्रम होता चिरंजीवांच्या ऑफिस कॅम्पसला भेट देणे. त्यामुळे ११ वाजता बाहेर पडलो आणि बस आणि रिक्षा करीत कॅम्पसला पोहोचलो. परवानगीचे सोपस्कार पूर्ण करून आम्ही आतमध्ये प्रवेश केला आणि आतील इमारती आणि आजूबाजूचे वातावरण पाहून मन एकदम खुष झाले. माझा भाचा तर एवढा खुष झाला की म्हणायला लागला की मला जर अशी कंपनी मिळाली असती तर मी ती कधी सोडलीच नसती. बाहेरील कंपन्यांमध्ये कसे प्रकार घडतात, कशाप्रकारे कामगारांना हाताळण्यात येते, कशाप्रकारचा त्रास असतो इत्यादिबद्दल तो ही के.पी.ओ. मध्ये कामाला असल्यामुळे त्यानेही थोडक्यात माहिती दिली.
अगोदरच म्हटल्याप्रमाणे येथील वातावरण फारच विलोभनीय होते. काय तो परिसर? काय त्या इमारती? काय ती रंगसंगती? सगळेच कसे, आपण कोठेतरी विदेशात असल्यासारखे वाटावे इतके सुंदर दृश्य होते ते. प्रशस्त रस्ते, लांबवर असलेल्या इमारती आणि त्या गाठण्यासाठी जागोजागी ठेवलेल्या सायकली. कोणतीही सायकल घ्या आणि चालू पडा आपल्या इप्सित स्थळी जाण्यासाठी.
चौकशी करता असे कळले की या कॅम्पसमध्ये जवळ जवळ १० हजारांवर कामगार आहेत. त्यांच्यासाठी आहे मोठे कॅफेटेरिया. एकावेळेस हजारो कामगार बसू शकतील अशी व्यवस्था केलेली. कॅफेटेरियाचे तीन भाग होते. जेवणाचे तसेच खाण्या-पिण्याचे निरनिराळे प्रकार उपलब्ध असल्यामुळे आपण एखाद्या स्टार हॉटेलमध्ये तर नाही ना बसलो आहोत, असा सतत भास होत होता. हे एकच कॅफेटेरिया नव्हते तर पुढे आणखीही अशाच प्रकारचे दुसरे कॅफेटेरिया देखील होते. तेही प्रशस्त होते.
एका इमारतीमध्ये स्टोरस् होते तसेच स्क्वाश कोर्ट, बॉलिंग अॅली, टेबल-टेनिस, स्वीमिंगसाठी स्वीमिंग पूल, आईसक्रीम पार्लर, केक शोप, व्यायाम  करणां-यासाठी ही मोठी जिम्नेशियम होती. तर दुस-या इमारतीमध्ये इंग्लिश पिक्चरमध्ये दाखवितात तसे कित्येक ऑटोमॅटीक मशिननी भरलेली कपडे धुण्यासाठी भली मोठी लोन्ड्री होती. येथे पूर्वी धुण्यासाठी टाकलेले कपडे ठेवून जाण्याची सोय उपलब्ध नसल्यामुळे बरीच गर्दी असायची, परंतु आता आपण सकाळी कपडे तेथें धुण्यासाठी टाकून, घरी जाताना संध्याकाळी परत घेण्याची सोय केल्यामुळे तितकी गर्दी नसते. आणि ते सगळ्यांना सोयीस्कर देखील होते, त्यामुळे फक्त शनिवार, रविवारसाठी देखील थांबण्याची गरज भासत नाही.
अशाप्रकारे दोन तीन तास मजेत घालवून, मनसोक्त फिरून व येथील आठवणी मनात साठवून व तेथेच जेवण घेवून आम्ही नंतर तीनच्या सुमारास बाहेर पडलो ते मरीना बीचवर जाण्यासाठी. त्यासाठी ऑफिसच्या बाहेर येताच रिक्षा उभेच होते, त्यांतील एक रिक्षा पकडून तेथूनच पुढे ब-याच अंतरावर असणा-या परमूर या लोकल रेल्वेच्या स्टेशनात गेलो. येथून जवळ जवळ एक तासावर मरीना बीच होते. त्यामुळे भर दुपारी बीचवर नको म्हणून चेन्नई एगमोर या अलीकडच्या स्टेशनात उतरलो. तेथून रिक्षा पकडून आम्ही जवळच असलेल्या एक्सप्रेस अवेन्यू या मॉलमध्ये वेळ घालविण्यासाठी गेलो. तेथें थोडे फिरल्यावर तेथून मरीना बीचवर जाण्यासाठी बाहेर पडलो. रिक्षावाल्यास विचारणा केली असता ते काहीतरीच भाडे सांगू लागले. कोणी १०० रुपये सांगत होते, तर कोणी ८० रुपये सांगत होते. शेवटी एकजण ५० रुपयांना तयार झाला. हे सांगयचे कारण इतकेच की रिक्षावाले मग ते मुंबईमधील असोत किंवा चेन्नईमधील असोत, इथून तिथून सारखेच. ते प्रवाशांच्या अज्ञानाचा फायदा उठविण्याचा नेहमीच प्रयत्न करीत असतात. रांगड्या भाषेत सांगायचे तर लुटायला बसलेत. आतमधील गल्यागल्या पार करून ज्यावेळेस रिक्षा मेन रोडवर आली त्यावेळेस कळले की अरे आपण तर चेन्नई सेंट्रल स्थानकापासून जवळच होतो व मरीना बीचही तेथून जवळच आहे.
रीक्षावाल्यांकडून दोन गोष्ठी समजल्या त्या म्हणजे मरीना बीचला दोन ठिकाणांवरून प्रवेश घेता येतो. एक म्हणजे युनिवरसिटी जवळील मार्गाने व दुसरा मार्ग म्हणजे गांधी मार्ग. ह्या अगोदरच म्हटल्याप्रमाणे हे मरीना बीच आशियातील सगळ्यात मोठे असे बीच आहे. येथे बीचवर जाताना मला आपल्या गिरगाव चौपाटीची आठवण झाल्याशिवाय राहिली नाही. बीचसमोरील रस्ता तसाच प्रशस्त. तशीच पोलिसांची वर्दळ. ठराविक जागेवरूनच रस्ता ओलांडून पलीकडे बीचवर जाण्यासाठी पोलिसांचे असलेले मार्गदर्शन इत्यादी इत्यादी. परंतु आपल्या चौपाटीपेक्षा कितीतरी पटीने मोठी असणारी ही चौपाटी होय, तर चौपाटीसमोरील रस्ता हा गिरगाव चौपाटीपेक्षा कितीतरी लहान.
रस्ता ओलांडून बीचवरील वाळूवर पाय टाकला आणि जस जसे पुढे पुढे जायला लागलो, तस तसे जाणवू लागले की आपल्याला आतमध्ये जाण्यासाठी बरेच चालावे लागणार आहे. पाणी तर दिसतच नव्हते. वाटले आणखी किती पुढे जायला लागणार आहे कोणास ठाऊक? परंतु आणखी थोडे अंतर चालून गेल्यावर पाणी दिसायला लागले आणि हुश्श वाटले. थोडेफार इकडे तिकडे भटकंती केली, फोटो काढलेत आणि परत परतीच्या मार्गाला लागलो, तेव्हा कळले की येथील पूर्वाश्रमीचे मुख्यमंत्री रामचंद्रन ह्यांच्या स्मरणार्थ एक स्थळ बाजूलाच उभारण्यात आलेले आहे, त्यामुळे तेथेही फेरफटका मारून शेवटी घरी परत जाण्यासाठी बाहेर पडलो. पुन्हा एकदा अडचण आली ती म्हणजे कोणती बस पकडायची? यावर उपाय म्हणून शेवटील तेथें उपस्थित पोलिसांनाच गाठले आणि त्यांच्याकडून बसची माहिती करून घेतली. त्याप्रमाणे बसमध्ये बसलो व परतीच्या प्रवासास सुरुवात केली. बस स्टोप सोडून बस पुढे सरकू लागली आणि थोड्याचवेळाने उजवीकडे वळली आणि पुन्हा एकदा आठवण झाली ती विल्सन कोलेजजवळील सिग्नलची. वाटले आपण गिरगाव चौपाटीजवळच असून विल्सन कोलेजला वळसा घालून चाललो आहोत.     
प्रवासास सुरुवात केल्याकेल्या एक गोष्ट जाणवली ती म्हणजे येथील बोलीभाषा. या अगोदरच म्हटल्याप्रमाणे मुंबईहून येताना मनामध्ये जी सल होती ती म्हणजे येथे संवाद कसा साधावयाचा. असे ऐकून होतो की हे लोक (तमिळ) हिंदी येत असली तरी बोलत नाहीत आणि तमिळला पर्याय म्हणून फक्त कधी कधी इंग्रजी बोलतात. त्यामुळे यांच्याशी संवाद साधने कठीण होणार हे अगोदरच गृहीत धरले होते.
पण या माझ्या चेन्नई सफरीमुळे एक गोष्ट मला शिकता आली ती म्हणजे आपणाला ज्या मुलुखामध्ये जावयाचे आहे तेथील संपूर्ण भाषा आली नाही तरी चालेल, परंतु रोजच्या व्यवहारातले काही त्यांच्या बोलीभाषेतील शब्द येणे गरजेचे आहे.  उदाहरणच द्यावयाचे म्हणजे, येथे प्रकर्षाने एक गोष्ट जाणवली ती म्हणजे कोणालाही जर हाक मारावयाची असेल किंवा त्या व्यक्तीशी संवाद साधावयाचा असेल तर त्याला अण्णा म्हणून पुकारायचे. त्यामुळे झाले काय की त्या स्थानिक माणसाला असे वाटायचे की कोणीतरी त्यांचाच माणूस त्याला हाक मारतोय आणि त्यामुळे तो आपल्या हाकेला लगेच प्रतिसाद द्यायचा व दोन अनभिज्ञ माणसांमधील जो न दिसणारा असा आडपडदा होता तो आपोआप गळून पडायचा. संवादाला सुरुवात व्हायची. या गोष्टीचा परिणाम असा झाला की पुढील संपूर्ण प्रवासात आम्हाला भाषेमुळे होणारा त्रास तसा फारसा कोठेच झाला नाही. तसेच दुसरे एक पथ्य मी पाळले ते म्हणजे जर कोणाला काही विचारायचेच झाल्यास रस्त्यावरील ह्याला त्याला न विचारत बसता पोलीस गाठायचो आणि त्याला अगोदरच म्हटल्याप्रमाणे अण्णा म्हणून पुढील जें काही विचारायचे आहे ते इंग्रजीत विचारायचो. याचाच परिणाम असा झाला की प्रत्येक वेळेला मी जी जी  काही विचारणा केली ती फलद्रूप झाली. एखाद दूसरा प्रसंग सोडला तर मला कोठेच नकाराची घंटा ऐकायला मिळाली नाही. इतकेच नव्हे तर प्रवासात बसमध्येही काही प्रवाशांनी मला उत्तम प्रतिसाद दिला. बसस्टॅापची कल्पना दिली, कोठे उतरायचे ते सांगितले. एकंदरीत काय, मला अगोदरच गृहीत धरल्याप्रमाणे, कोठेही भाषेची अडचण जाणवली नाही. उलट असे वाटले की मी मुंबईतच फिरतो आहे.
दुसरी गोष्ट अशी जाणवली ती म्हणजे हा जो भाषेचा बागुलबोवा कित्येकांनी त्यांच्या बाबतीत उभा केलेला आहे, तो मुळी योग्य नाही असे माझे मत या दरम्यान झाले. त्याला कारण असे की ह्या अगोदरच म्हटल्याप्रमाणे आपण जेव्हा परमुलुखात जातो तेव्हा आपण नेहमीच अपेक्षा करतो की त्यांनी आपल्या प्रश्नाला उत्तर द्यावे आणि त्यांनी तसे ते द्यावे यात काहीही वावगे नाही. परंतु आपण हे साफ विसरतो की जेवढी म्हणून आपण त्यांच्याकडून अपेक्षा करतो, तेवढीच आपलीही जबाबदारी असते की आपणही त्यांच्यासमोर उभे ठाकल्यानंतर त्यांच्याही काही अपेक्षा आपणाकडून असतात, जशा त्यांना समजेल अशा बोलीभाषेत आपण त्यांच्याशी संवाद साधणे.
माझे हे उदारीकरणाचे गणित चुकतही असेल, परंतु माझे असे मत झाले की चेन्नई सारख्या शहरात थोडी शिकलेली, इंग्रजी शिकलेली माणसे भेटतीलही त्यामुळे माझ्या फॉरम्युलानुसार मला उत्तरे मिळालीत, संवाद साधता आला. परंतु जर का मी अगदी आतील गावाकडील भागामध्ये गेलो तर तेथें ती मला भेटतीलच असे नाही. तेथील स्थानिक कदाचित शिकलेले नसतीलही, त्यामुळे त्यांना त्यांच्या तमिळ भाषेव्यतिरिक्त इतर भाषा येत नसतील. मग अशावेळेस जर मी त्यांच्याकडून अपेक्षा केली की त्यांनी इंग्रजी बोलावे, तर ते साफ चुकीचे ठरेल. याचे उदाहरणच द्यावयाचे झाल्यास आपल्या महाराष्ट्र देशामध्येसुद्धा जर का आपण एखाद्या गावात गेलो, तर तेथील गावातील गावकरी माणसांना इंग्रजी कोठे येते? हिंदी कोठे येते? अशावेळी मी जर त्यांच्याशी संवाद इंग्रजी किंवा हिंदीमधून साधू लागलो, तर मला काय किंवा इतरांना काय उत्तरे मिळूच शकणार नाहीत. मग मी असे म्हणावे काय की मराठी माणसे जाणून-बुजून हिंदी किंवा इंग्रजी बोलत नाहीत. तर ते तसे नाही आहे. हा सगळा प्रश्न शिक्षणाचा आहे. हे जरी खरे असले तरी, मी जर का अगोदरच ज्या मुलुखात जाणार आहे त्या मुलुखाची तेथील बोलीभाषा अवगत करून गेलो तर मला वाटते, मला माझ्या प्रश्नांची उत्तरे मिळू शकतील. जास्त नाही तरी पोटापुरता का होईना मी संवाद साधू शकेन. परंतु त्यासाठी मला तेथील बोलीभाषेमध्ये कशाप्रकारे एकाद्याला बोलाविले जाते याची कल्पना असावयास हवी. जसे, तमिळ भाषेमध्ये अण्णा म्हटल्यावर काम होते, तसे मराठी भाषेमध्ये भाऊ म्हटल्याने काम होते, तर गुजराती भाषेमध्ये भाय म्हणून काम करून घेता येते, तर इंग्रजी भाषेमध्ये ब्रदर म्हणून हाक मारता येते. अशाप्रकारे कामचलाऊ भाषा जर मी का थोडीशी शिकून घेतली, तर मला वाटते भाषेची अडचण टाळून मला पोटापुरता संवाद साधता येऊन माझे कार्य सुकर होईल आणि एकाद्या भाषेबद्दल आणि ती बोलणा-या माणसांबद्दल असे टोकाचे मत व्यक्त करण्यापासून आपण स्वत:ला वाचवू शकू. 
मयुर तोंडवळकर ............9869704882

अनगडवाणी