Sunday, November 4, 2018

*प. पू. श्री सद्गुरु स्वामी* *भगवान महाराज यांची* *अमृतवाणी*

🙏👏🙏

*प. पू. श्री सद्गुरु स्वामी*
*भगवान महाराज यांची*
*अमृतवाणी*

आपले बाबा आपणास सांगतात, *"आपण जिला जगत् जननी म्हणतो तीच जगद् माता!"* पुढे या गोष्टीची आठवण करून देताना म्हणतात, "जगत माया निराळी."

येथे एक गोष्ट लक्षात घेण्यासारखी आहे ती म्हणजे, बाबा म्हणतात, *"जगत् जननीला सर्व अधिकार आहेत. पण या आसनासमोर अधिकार नाहीत."* आपले बाबा असे का बरे म्हणत असावेत? *कारण आपला हा दरबार सर्वसाधारण दरबार नव्हे, तर तो सताचा दरबार आहे. ॐ कारांचा दरबार आहे. येथे सताशिवाय इतर कुणाचाही अधिकार लागू होत नाही.* 

बाबा पुढे जगत् जननीला सांगताना म्हणतात, "कोणत्या सेवेक-यावर लाघव करावे, कोणावर करू नये ह्याची जबाबदारी तूझी, ते तू जाण."

आठवण करून देताना पुढे म्हणतात, "क्षमा द्यायची आहे. पण तशी क्षमा करता येणार नाही."

बाबा पुढे म्हणतात, "सेवेक-याची कसोटी घेतली तर तिची सुद्धा कसोटी घेणारा कोणीतरी आहे." म्हणजे काय? तर तिला जरी मानवांची परीक्षा घेण्याचे अधिकार असले, तरी सुद्धा ती देखील परीक्षाधीन असून, सताच्या परीक्षेला तिला देखील सामोरे जावे लागणारच आहे.

सत् काय करते? तर प्रथम कसोटी घेते आणि त्या कसोटीत पास झाल्यानंतरच कार्य सुपूर्द करते.

आपणा सर्वांना आठवण करून देताना म्हणतात, *"जगत् जननी सामान्य तत्व नाही, तर ते सुद्धा महान तत्व आहे."*

हे जरी खरे असले तरी बाबा जगत् जननीला म्हणतात, "सेवेकरी अडाणी असले तरी तू जाणीव घेतली पाहिजे." पुढे जाणीव करून देताना म्हणतात, "ज्याला परमपदाचा अधिकार आहे अशी तू सेवेकरीण असलीस तरी या दरबारात तूझी किंमत शून्य. जगत् जननी कुणाला वर पाठवीत नाही. नाना क्लुप्त्या करुन खालीच पाठवते." दरबारच्या बाबतीत तिची पायरी ठेवली आहे. तिला म्हणजे *"जगत् जननीला उत्पन्न करणारा कोणीतरी आहे."* 

बाबा पुढे सेवा, पूजा ह्या बाबतीत मार्गदर्शन करताना म्हणतात, *"सेवेक-याने वेडीवाकडी पण समाधानाने केलेली सेवा त्या ठिकाणी (सद्गुरू चरणांवर) पोहचते. पण पूजा करताना सेवेक-याची भावना कशी हवी? तर शुध्द. भावना शुद्ध नसेल तर सेवा पावन होणार नाही."* 

तसेच सेवेक-याला पूजेची माहिती नाही पण त्याने श्रध्देने केलेली पूजा मला पावन आहे असे बाबा म्हणतात. बाबा विचारणा करताना म्हणतात, "सेवेक-यामध्ये भोळा भाव व अखंड लीनत्व केव्हा येते? तर त्याच्याकडे शुद्ध आचार विचार असल्यासच ते असते. लीनत्व शुध्द असल्याशिवाय लीनत्व राहणार नाही." *लिनत्व असणा-या सेवेक-याच्या सानिध्यात परमेश्वर येतो.*

बाबा पुढे म्हणतात, "सेवेकरी एकतर अडाणी किंवा पूर्ण ज्ञानी तरी असावा, अतीविव्दान नसावा."

बाबा विद्वान कोणाला म्हणतात? 
जो प्रत्येक गोष्टीतून त्या चाकोरीच्या चौकटीत बसतो तो विव्दान. बाबा विद्वानाला महत्व देतात, अतीविद्वानाला नव्हे.

"जो योग्यतेचा सेवेकरी असेल, त्याची योग्य सेवा, योग्य तर्‍हेने त्याला शोभली पाहिजे. सद्भावना व लीनत्व ज्याच्याकडे आहे, त्याची सेवा सद्गुरू चरणी रुजु आहे."

*"समर्थांनी एकदा आदेश दिले तर ते कायमचे असतात"*, असे श्री सद्गुरू माऊली म्हणते.

पुढे सद्गुरू माऊली म्हणते, *"सुगंध कोठून व कसा येतो त्याची जाणीव घ्या."*

ह्या संदर्भात आठवण सांगाविशी वाटते ती म्हणजे, काही काही वेळा दरबार सुरू असताना, मध्येच असा काही सुगंध सुटायचा की तो सांगता यावयाचा नाही. तो फक्त अनुभवता यावयाचा. बरे ! तो कुठून येतो, कसा येतो, कशाचा येतो ते काहीही कळत नसे इतका तो अवर्णनीय असा परिमळ असायचा. संपूर्ण वातावरण एका अलौकिक सुवासाने दरवळून जायचे. असा तो सुगंध क्षणीक, काही क्षणांपुरताच असावयाचा, पण तो आपल्याला एका वेगळ्याच जगात घेऊन जायचा. आणि असे ज्यावेळेस घडायचे त्यावेळी नक्कीच श्री मालिक येऊन गेल्याची जाणीव व्हावयाची. असा तो काळ म्हणजे साक्षात श्री सद्गुरू माऊलीने आपल्या सर्वांसाठी प्रत्यक्ष अनुभव उघड करून सप्रमाण दाखवून दिल्याचा तो काळ होता. ह्यासाठीच बाबा म्हणायचे, "सुगंध कोठून व कसा येतो त्याची जाणीव घ्या." हे जरी सत्य असले तरी ती आपली कुवत होती कां? तर नाही.

बाबांचे सांगणे होते, *"सुगंध मिळणे हे सुद्धा भाग्याचे लक्षण आहे. तो सुगंध निराळाच वाटतो. त्या ठिकाणी एकाग्र व्हा. सुगंध आला, मालिक येऊन गेले असे समजू नका. सेवेक-यावर समर्थाचे अखंड लक्ष असते. कार्य करीत असताना सुगंध आला तर लीन व्हा.*

ॐकार स्वरूपा सद्गुरु समर्था

*ॐकार स्वरूपा सद्गुरु समर्था ।*
*अनाथांच्या नाथा तुज नमो ।।*
*गुरूराज स्वामी असे स्वयंप्रकाश।*
*ज्या पुढे उदास चंद्र, रवी ॥*

एकनाथ महाराजांच्या ह्या अभंगात ते म्हणतात,"ॐकारा ! आपणच सद्गुरू आहात, आपणच समर्थ आहात. सद्गुरु माऊली आपणच अनाथांचे नाथ आहात. ज्याचा कुणी वाली नाही, त्यांचेही तुम्ही नाथ आहात."

सता! आपणच तारक आहात. पूर्णात पूर्ण असणारे तत्व देखील आपणच आहात. भक्ताला अनुग्रहीत करून, तसेच सद्गुरूंची गती देऊन पूर्णात पूर्ण पदाला पोहचविणारे ॐकार स्वरूप म्हणजेच ॐकार बीज, जे वेदांचे बा देखील आहेत,ते सुद्धा आपणच आहात.

बाबा विचारणा करतात,"पंचमहाभूतांचा अंत कुणी घेतला आहे कां? पृथ्वीचा अंत घेतला आहेत कां? पाण्याचा अंत कोणी घेतला आहे कां?" 

पाणी पण निराकारी आहे. तेज म्हणजे प्रकाश आणि वारा स्पर्शज्ञानाने कळतो. तो दिसत नाही. वायु नसेल तर आपण जीवंत राहू शकणार नाही. 

बाबा पुढे विश्वाच्या निर्मिती मागील रहस्य उघड करताना म्हणतात,

*_वायु म्हणजेच प्रणव. धुंधुंकारातून प्रणव प्रसवला. प्रणव म्हणजे अक्षरे. ती ऐकता येतात. पण पाहता येतात कां? ते आकलन करता येत नाही._* 

बाबा म्हणतात,"आपल्याला ॐकार स्वरूप पाहता आले पाहिजे." ऋग्वेद, यजुर्वेद, सामवेद, अथर्ववेद हे चार वेद असून पाचवा वेद प्रणव. पंचमहाभूते निराकारी आहेत. 

बाबा विचारतात, "ॐ कार कसा आहे? तर आठ प्रकृतीने नटलेला ॐ आहे. (ह्या आठ प्रकृती कोणत्या? पंचमहाभूतें (पृथ्वी, आप, तेज, वायू व आकाश) आणि अहंकार, बुद्धी आणि चित्त (अव्यक्त परा प्रकृती) ह्या सर्व मूळ प्रकृती मिळून अष्टदा प्रकृती होतात असे भगवद् गीता सांगते.)

पुढे बाबा म्हणतात,"समर्थांना आकार नाही. समर्थ कसे आहेत, तर निराकारी. परंतु तुमच्या कोडकौतुकासाठी ते आकार घेतात. स्वतः समर्थांनी आपल्याला आपल्यात सामाऊन घेतले आहे. *प्रगट दृष्य तर अप्रगट अदृष्य.* 

एकाने उत्पत्ती करायची, एकाने स्थितीप्रत ठेवायचे, एकाने लय करायचे, ही कर्तव्ये कोण करीत असते? तर ब्रह्मा, विष्णू व महेश म्हणजेच त्रिगुण.

समर्थ म्हणतात, "भक्ताला मला पहाता येते पण पहाणारा पाहिजे." सर्व व्यापक सद्गुरु आहेत आणि व्यापूनही अलिप्त देखील आहेत. अलख निर्गुण निराकार पद आहे. ॐकार स्वरूप गुरूराज स्वामी आहेत. त्या प्रकाशापूढे चंद्र, सूर्य फिके पडतात, तोच स्वयम् प्रकाश. 

*वेद म्हणजे प्रणव.* *ॐकार ध्वनी सुद्धा शांत होतो.* 

जाणीव ठेवून जर एखादा भक्त दर्शन घ्यावयास गेला तर त्याला दर्शन होणार नाही. ह्यासाठी जाणीव रहित सत् चरणांत तादात्म्य होणे गरजेचे आहे आणि ज्यावेळेस अशी स्थिती होते, त्याचवेळेस त्या भक्ताला सत् चित् आनंद मिळतो. तो मिळाल्यावर तो भक्त आनंदिमय होतो व अशावेळेस त्यांचे तेज लोप पावणारे नसते.

कृपादृष्टी होणे म्हणजे अमृत दृष्टीने भगवंताने भक्तावर कृपा करणे होय. ते प्रगट कसे होणार? तर हिच गुरुकिल्ली आहे. 

एकनाथ महाराज सद्गुरू माऊलींना प्रभूराज म्हणतात. बाबा पुढे म्हणतात, "आपण सत्य काय आहे ते पहा, मायेला फसू नका."

*ज्ञानबीज म्हणजे अखंड नाम* आणि *भूमी म्हणजे भक्त.* जोपर्यंत भक्ताची भूमी शुध्द होत नाही तोपर्यंत ते ज्ञानबीज सद्गुरू माऊलींकडून भक्ताच्या भूमीवर पेरले जाणार नाही. म्हणजेच ते *नाम* तुम्हाला सद्गुरू माऊलींकडून मिळणार नाही आणि नाम न मिळाल्याने तुमचा उद्धार होणे कठीण होते. 

*उद्धार होणे म्हणजे काय?* तर उद्धार होणे म्हणजे भक्ताला सद्गुरूंकडून नामाची प्राप्ती होणे व ती झाल्यावर अखंडितपणे आपण ते न विसरता घेत राहणे होय. अशाप्रकारे आपण सद्गुरू चरणांवर लिन झाले असता, आणखी उद्धार तो कोणता? त्यामुळे आपणाला श्री सद्गुरू माऊलींचे सतत सान्निध्य मिळते, वेळोवेळी सेवा करण्याची संधी मिळते, सत् कार्य करण्याची द्वारे आपोआप सद्गुरू माऊली आपणासाठी खुली करून देतात. अशाने एकप्रकारे आपला उद्धारच होत असतो.

🙏💐👏🙏💐👏🙏💐👏🙏

*प. पू. श्री सद्गुरु स्वामी भगवान महाराज प्रवचने*

👏👏👏

*_भाग एक_*

*तुम्ही ज्या बाबांना शरण आहात त्यांची ओळख करून घेता आली पाहिजे, त्यांना स्वत:च्या दृष्टीने पाहता आले पाहिजे असे आपले बाबा कां म्हणतात?*
कारण त्यावेळेस आपण आपल्या बाबांना मानवी त-हेने आपल्यातीलच एक म्हणून पाहत होतो. म्हणून ते म्हणायचे, "आपले सद्गुरू कोण हे आपल्याला ओळखता आले पाहिजेत. आपल्याला आपल्या स्वतःच्या दृष्टीने (येथे दृष्टी याचा अर्थ अंत:र्दृष्टीने म्हणजेच ज्ञान दृष्टीने अर्थात प्रकाशाच्या दृष्टीने डोळे बंद केलेले असोत वा उघडे असोत) पाहता आले पाहिजे." 

*हे होण्यासाठी कशाची आवश्यकता असते?* 
त्यासाठी आपल्याला आपल्या श्री सद्गुरू माऊलीने सत् पदाच्या आसनावरून बहाल केलेल्या *नामाची* उज्वलता करणे, त्या *नामाचा* जास्तीत जास्त उजाळा करणे, जास्तीत जास्त आपणाकडून *नामस्मरण* घडणे हे गरजेचे आहे.

बाबा म्हणतात, *ते आपण आचरणात आणा.*
याचाच अर्थ असा की, "सद्गुरू माऊलीने जी जी शिकवण आपणा समस्त भक्तगणांना आपल्या प्रवचनातून बहाल केली आहे, ती अंगीकारून आपल्या आचरणात आणावयास हवी. त्याबरहुकूम आपण आपले वागणे ठेवावयास हवे, तरच आपल्याला आपल्या श्री सद्गुरू माऊलीना स्वतःच्या दृष्टीने पाहता येऊ शकेल."

आपले बाबा आपल्याला आठवण करून देताना म्हणतात, *जे अनन्य भावे माझ्या भक्तित निपूण आहेत त्यांना सत् कधीही उपाशी ठेवणार नाहीत.* 

*सद्गुरु महिमा किती अगाध आहे* ह्याची जाणीव करून देताना ते पुढे म्हणतात, "समर्थ मतलबी मायेला भाळणारे नाहीत. वेळेला समर्थ सेवेकऱ्याचे अर्धे संचित आपल्यावर घेतात आणि आपल्या भक्ताला पूर्व वाईट संचितातून मुक्त करतात. त्यांच्याखेरीज मायेचा पुत वा इतर कुणीही हे घेऊ शकणार नाही, घेणे शक्य नाही."

श्री सद्गुरू माऊली सर्वांना समत्व बुध्दीने पाहतात. त्यांच्याकडे लहान थोर, श्रीमंत गरीब, डावा उजवा, उच नीच असा भेदभाव कधीही नसतो. त्यांच्यासाठी सगळे समान असतात. ते सगळ्यांना तितक्याच आत्मियतेने समजावून सांगत असतात. तितक्याच ममत्वाने बोध देखीली करीत असतात.

"या आसनाच्या ठिकाणी असणारा सेवेकरी, आसनाजवळ सेवेकरी व बाह्य ठिकाणी सद्गुरु आहे" असे जेव्हा आपले बाबा म्हणतात त्याचा अर्थ आपले बाबा आपल्या सेवेक-यावर किती विश्वास टाकतात. तो विश्वास सार्थ करण्यासाठी येथे आपण हे लक्षात घेतले पाहिजे की त्यामुळे आपली जबाबदारी वाढते व ती ओळखूनच, त्याप्रमाणे आपण वागावयास हवे. आपण आपली *कृती* आणि *उक्ती* अशी ठेवावयास हवी की आपल्या सताला किंवा त्यांच्या शिकवणीला कुठे गालबोट लागता कामा नये. उलट बाह्य स्थितीत तो चारचौघांत उठून दिसावयास हवा. त्याच्या उक्ती आणि कृतीमुळे बाह्य स्थितीने आवर्जून म्हटले पाहिजे की वाह् ! धन्य ते सद्गुरू आणि धन्य तो सेवेकरी !!

कारण आपण हे लक्षात घ्यावयास हवे की सद्गुरू हे एकच तत्व होऊ शकते. हा आपल्या श्री सद्गुरू माऊलींचा मोठेपणा आहे की ते म्हणतात, "या आसनाचा सेवेकरी येथे सेवेकरी आणि *बाह्यठिकाणी सद्गुरू आहे.*"

💐👏💐👏💐👏💐👏💐👏

*_वादे वादे जायते तत्वबोध:_*

👏👏👏

अर्थ - शब्दशः अर्थ असे सांगतो की, सुसंवाद केल्याने चांगले तत्वविवेचन होऊन ज्ञानप्राप्ती होते.

*अभिमान कशाने निर्माण होतो?*
तर *_असंगाने अभिमान निर्माण होतो._* (म्हणजेच वाईट माणसांशी संगत केल्याने वृथा अभिमान निर्माण होत असतो.) ह्यासाठी बाबा म्हणतात, *"अहंकाराची बाधा आपल्या मनाला लागू द्यायची नाही. अहंकार आपल्या मनाला शिवू द्यावयाचा नाही."*

बाबा पुढे म्हणतात, "आपला जो सत्संगाचा पाया आहे तो मजबूत करण्यासाठी नितीमत्ता अंगीकारा व त्या सताजवळ त्यांचे अखंड दर्शन मिळण्यासाठी टाहो फोडा. मानवाने सत्संग हा केलाच पाहिजे."

त्यासाठी मानवाने काय केले पाहिजे?
तर *मानवाने सत्संग केला पाहिजे.* त्यासाठी *सद्गुरू माऊलीना शरण गेले पाहीजे.* *सद्गुरू हे परब्रह्म मानले पाहिजे.* सदासर्वकाळ त्या *सद्गुरू माऊलींचे नाम मुखी घ्यावयास हवे.*

*_सद्गुरू हे सेवेक-यास अज्ञानाच्या अंध:कारातून बाजूला सारून पूर्ण प्रकाशाच्या मार्गाने घेऊन जाणारे तत्व असून, ते सर्वव्यापकही आहे._*

सर्व व्यापक म्हणजे सर्व ठिकाणी व्याप्त (चरात चर, परात पर, क्षरात क्षर, इतकेच नव्हे तर ते अणू, रेणू, परमाणू ह्यामध्ये असूनही अलिप्त असणारे असे ते तत्व आहे) असणारे असे ते तत्व आहे.

बाबा पुढे म्हणतात, "तुमची भूमी शुद्ध असेल तर *(भूमी शुद्ध करी, ज्ञान बीज पेरी)* पुरुष / स्त्री हा भेदाभेद त्यांच्याकडे नसतो, त्यामुळे अशावेळी ते भक्तात ज्ञान बीज पेरून, नाम बहाल करून, त्या भक्ताला भगवंताप्रत पोहोचण्याचा राजमार्ग खुला करून देतात." 

तो राजमार्ग कसा असावा? तर त्या सद्गुरू माऊलींचे स्मरण करताच तेथे ज्ञान प्रसवावयास हवे. अर्थात ती दिव्य दृष्टी त्या भक्तास प्राप्त होते. त्या दृष्टीच्या सहाय्याने तो भक्त त्या सद्गुरू माऊलींच्या चरणांत तादात्म्य होऊन जातो.

म्हणून श्री सद्गुरू माऊली पुढे म्हणते, "नितीने जा, अनितीस दूर सारा. मी नितीने जाणार अशी भीष्म प्रतिज्ञा करा."

 *अंतकाळीचा बा पांडुरंग !* हे नेहमी लक्षात ठेवा. इतर कुणीही अंतकाळी आपल्या मदतीला धावून येणार नाही, शिवाय श्री सद्गुरू माऊली. आणि अशात-हेने तुम्ही जर वाटचाल केलीत, तर तो भगवंत आपल्या पासून कधीही दूर राहणार नाही. ती श्री सद्गुरू माऊली आपणापासून कदापिही दूर राहू शकणार नाही.

🙏💐🙏💐🙏💐🙏💐🙏💐

अनगडवाणी