Friday, December 13, 2019

स्वत:शी प्रामाणिक रहा

एक ओळ कुठे तरी वाचल्याची जाणवले. ती ओळ होती, *स्वत:शी प्रामाणिक रहा*. 

खरे आहे, माणसाने स्वत:शी प्रामाणिक राहिले पाहिजे. पण म्हणून इतरांशी अप्रामाणिकपणा करावा कां? तर याचे उत्तर नाही म्हणूनच यावे, असे अस्मादिकांस वाटते. काही अंशी हे सत्यवचन, काही अंशी असत्य वचन असू शकते. परंतु स्वत:शी प्रामाणिक राहता राहता तोच प्रामाणिकपणा इतरांशीही वागताना ठेवला तर मग सोन्याहून पिवळे नाही कां होणार?

परंतु स्वत:शी प्रामाणिक राहून इतरांशी वागतांना आपणांकडून इतरांवर अन्याय तर आपण करीत नाही नां? याचेही अवधान आपण बाळगावयास नको कां? 

स्वत:शी प्रामाणिक राहणे म्हणजे काय करने? इतरांशी अप्रामाणिक वागणे की काय? 

प्रामाणिक म्हणून आपलेच घोडे दामटणे हे कितपत योग्य? हे ज्याचे त्यानेच ठरवायचं आहे. मी प्रामाणिक, मला सर्व समजते, मी स्वघोषित तज्ञ, इतरांना ह्यांतील काय कळते?, कळते ते मलाच कळते अशा भ्रामक विश्वात राहून इतरांना तुच्छ लेखणे व त्यामुळे त्यांना खिजगणतीतही न घेणे, त्यांना न कळविता आपल्या कंपूत रममाण होऊन आपल्या कंपूशी प्रामाणिक राहणे हे कोणते लक्षण समजायचे?

आपण हे लक्षात घेणे गरजेचे आहे की मी कुणी एकटाच नाही आहे, ज्याला भगवंताने सर्वस्व बहाल केलेले आहे, तर इतरेजणही आहेत, जी त्या भगवंताचीच लेकरे आहेत. तर यांच्याशीही मी प्रामाणिक राहणे तेवढेच गरजेचे आहे, जेवढे मी माझ्याशी प्रामाणिक राहतो.

*_मी माझ्याशी प्रामाणिक राहणे हा माझा दागिना जरी असला,_* तरी इतरांशी देखील मी प्रामाणिक राहून प्रामाणिकपणे माझे कर्तव्य कर्म करणे हे कांही कथिलाचे लक्षण नव्हे. हे सुद्धा तितकेच महत्त्वाचे आणि गरजेचे देखील आहे.

प्रामाणिकपणाच्या आड आडोसा घेऊन समाजातील इतरांशी अप्रामाणिकपणा अवलंबिणे हे काही यथायोग्य नाही.

सद्गुरू आणि अनंत


अनगडवाणी