Saturday, October 20, 2018

दसरा


एकाचा अंत घेणे येणे नाम एकांत

👏👏👏

*एकाचा अंत घेणे येणे नाम एकांत*
एकाचा म्हणजे कुणाचा?
तर तो एक म्हणजे अनंत, तो एक म्हणजे अपुली श्री सद्गुरू माऊली, तो एक म्हणजे साक्षात ॐ कार.
हे शक्य आहे कां?
म्हटले तर होय, म्हटले तर नाही.
हे शक्य कोणाला आहे? तर जो भक्त त्या अपुल्या सद्गुरू माऊलींशी तन, मन आणि धनाने तादात्म्य पावला आहे त्यालाच. तसेच त्या सद्गुरू माऊलींची इच्छा असल्यास, तरच हे त्या भक्ताला ते शक्य होते, अन्यथा नाही.
*द्वैत आणि अद्वैत काय आहे?*
अशुद्धत्वता आणि शुद्धत्वता. बाबा म्हणतात, *मन शुद्ध तेथे अद्वैत आहे आणि जेथे मन अशुद्ध तेथे द्वैत आहे.*

*संसार करून परमार्थ साधणे* हाच बाबांच्या मते अद्वैत सिद्धांत होय व तोच श्रेष्ठ होय.

पुढे बाबा म्हणतात, *अद्वैत सिद्धांत हा निराकारी आहे.* *सत् हे आकार रहीत असते.*

*आकारी जे आहे, ते द्वैत आहे आणि ह्याला कारण माया आहे.*

बाबा पुढे म्हणतात, *तमोगुण म्हणजे तामस गुण म्हणजेच अंधार होय.* येथे विचार सापडत नाही, तर येथे अविचारच सापडतो. येथे प्रकाश सापडणार नाही.

*त्रिगुणी माया काय आहे?*
रज, तम आणि सत्व गुण जेथे एकत्र येतात, तेथेच ही त्रिगुण नटलेली माया साकारताना दिसून येते. हे त्रिगुण म्हणजेच ब्रह्मा, विष्णू आणि महेश. म्हणूनच म्हटले आहे, ही त्रिगुणात्मक आहे. अर्थात त्रिगुण नसतील तर संसार होणार नाही ह्याची बाबा पुढे आपणास आठवण करून देतात.

*बाबा श्रीमान कुणाला म्हणतात?*
सताचा जो सेवेकरी तो बाबांच्या मते खरा श्रीमान. फक्त धनवान किंवा सावकार तो श्रीमान नव्हे. दूस-यांचे हित करणारा तो बाबांच्या मते श्रीमंत.

म्हणूनच पुढे बाबा म्हणतात, *अद्वैत भक्ती ही श्रीमान आहे.*

बाबा पुढे आठवण करून देताना म्हणतात, *हा दरबार सताचा दरबार आहे आणि तो ज्ञानासाठी मुक्त आहे.* *हे ज्ञानाचे आगर आहे.* आणि हे पुढील काळात बाबांनी वेगवेगळ्या विषयांवरील प्रवचने करून दाखवून दिले आहे.

ह्या दरबारात अनेक प्रकारची कर्तव्ये बाबांनी केलेली आहेत. त्यात ज्ञानोपासना करण्यापासून ते शुद्धीकरणे - वेगवेगळ्या पातळींची, स्थुल, सूक्ष्म, कारण, महाकारण देहाची आणि त्या पलिकडची सुद्धा केलेली आहेत. सव्वीस अवतारांचे गुपितही ह्या कलियुगी स्थितीत उघड करून सांगितले आहे. सद्गुरूंचा महिमा पदोपदी उलगडवून सांगितला आहे, त्याशिवाय दाखवूनही दिलेला आहे. तो अगाध कसा आहे हे सोदाहरण दाखवून दिलेला आहे. अखंड चमत्कार काय व कसे असतात, तर त्यांच्यासमोर भुरटे चमत्कार कसे खुजे असतात हे ही भक्तगणांना येथेच या दरबारात दाखविलेले आहेत. किती किती म्हणून कर्तव्ये श्री सद्गुरू माऊलीने आपल्या या अवतारकार्यात या दरबारात प्रत्यक्षात घडवून घेतली होती, ती अवर्णनीयच होत.

शेवटी बाबा म्हणतात, *ज्याठिकाणी सत् आहे, तेथे शांती व स्थिरता आहे.* *याच भूमीवर पूर्वी सत् पदाचे स्थान होते.*

👏🙏👏🙏👏🙏👏🙏👏🙏

नर (मनुष्य) देहानंतर

👏👏👏

नर (मनुष्य) देहानंतर पुन्हा देह नाही हे म्हणने तितकेसे बरोबर नाही. कारण मनुष्य देहामध्ये असतांना आपण जे कांही कर्तव्य करीत असतो त्याचा लेखाजोखा आपणच तयार करून ठेवित असतो, त्याचा हिशेब पुढिल देह कोणता मिळणार - (जसे चत्वार खाणी म्हणजेच जे कांही दृश्यमान आहे अर्थात डोळ्यांना दिसू शकते - तसेच त्या व्यतिरिक्त असणारे) - हे अवलंबून असते. त्यामुळे मानव देह मिळणार किंवा नाही? कां इतर कोणता देह मिळणार? हे सर्वस्वी आपल्या ह्या जन्मीच्या कृतीवर अवलंबून
असणारे असते आणि म्हणूनच म्हटले जाते "चांगले ते पेरा म्हणजे उगवेल तेही चांगलेच असेल" अर्थात चांगले काय आणि 
वाईट काय? हे आपण कसे ठरविणार? 
हे ठरविण्यासाठी आपल्याला एका चांगल्या मार्गदर्शकाची आवश्यकता असते. म्हणजेच
गुरूची आवश्यकता असते. हे गुरू पहिल्या प्रथम आपले माता-पिता असतात, जे
वेळोवेळी आपल्यावर चांगले संस्कार व्हावेत म्हणून धडपडत असतात. तद्नंतर शाळेत जाऊ लागल्यावर शिक्षक हे आपले
गुरू होतात आणि मधल्या काळांत जस जसे आपण मोठे होत जातो तस तसे समाजामध्ये
असणा-या चांगल्या वाईट गोष्टींचा परिणाम आपल्या मनावर होत जातो आणि ह्या कसोटीच्या
वेळी आपण आपल्या माता-पित्यांनी तसेच गुरूजणांनी दिलेले संस्कार पाठीमागे सोडून
नविन संस्कार धारण करण्यास सुरूवात करीत असतो. त्यात मग घरी दारी रोजची भांडणे
आणि इतर गोष्टींचा समावेश होतो. गोष्टी विकोपाला जाण्याची वेळ येते आणि मग आपल्याला
गरज भीसते ती अध्यात्मिक, धार्मिक गोष्टींची. अशा वेळेस धाऊन येतात ते आपले गुरू,
जे फक्त गुरू न राहता सद्गुरू होतात. ह्या सर्वस्व चक्रातून बाहेर पडण्यास आपणांस
मदत करतात. आपल्याला राजमार्ग दाखवितात आणि आपला पुढिल कल्याणाचा,
मुक्ती मोक्षाचा मार्ग खुला करून देतात आणि हा राजमार्ग खुला झाला की आपण पुनरपी 
जननम पुनरपी मरणम आणि ते सुद्धा हक्काने मानव देह मिळवून त्या सताची सेवा
करण्यासाठी सज्ज होतो. परंतु हे देणे म्हणजेच मानव देह देणे की इतर चत्वार खाणीत ज्या
मध्ये किड्या मुंग्यापासून ते साध्या डोळ्यांना न दिसणा-या (जे आपण डिस्कवरीवर पाहतो)
जीव-जंतूपर्यंत असणा-या कोणत्याही देहांत फेकले जाऊ शकतो) हे सगळे त्या सद्गुरू
माऊलीच्या हातात असते. म्हणून नर देह पुन्हा प्राप्त होऊ शकतो हे सत्य होय.
वरील उहापोह हा आपल्या श्री सद्गुरूंच्या प्रवचनातील कांही अंश आहे. हे सर्वस्व
विचार जे योग्य आणि चांगले आहेत हे त्यांचे असून त्यामधील अनवधानाने कांही चुकीचे
असल्यास ते माझे आहेत. तरी त्याबद्दल कोणी चुकीचा अर्थ काढू नये इतकेच सांगणे.
श्री सद्गुरू माऊलींची क्षमा मागून हे इथेच आवरते घेतो.
धन्यवाद. 🙏🙏🙏

अवघाची संसार सुखाचा करीन

👏🙏👏

येथे बाबांना श्री संत ज्ञानेश्वर माऊलींचा हा अभंग अभिप्रेत आहे. 

*अवघाची संसार सुखाचा करीन*
*आनंदे भरीन तिन्ही लोक*
*जाईन गे माये तया पंढरपूरा*
*भेटेन माहेरा आपुलिया*
बाबांनी ह्या अगोदर संसार म्हणजे काय? हे सांगताना सांगितले आहेच की *संसार येणे नाम सगुणाचे सार*

*संत येणे स + अंत* जो कोणी सताचा येणे सद्गुरूंचा अंत लावण्या किंवा घेण्या गेला तो तेथेच शांत झाला. त्यांची *वाचा हे निमाली ते श्री गुरू* 

सद्गुरूंचा अंत कुणीच लावू शकत नाही, लावणे शक्य नाही, लावणारही नाही, जोपर्यंत ते आपली जाण देऊ इच्छित नाही.

प्रपंचाबद्दलही असे म्हणता येईल की, पर + पंच येणे नाम प्रपंच.

*अहं ब्रह्मास्मी* मीच ब्रह्म आहे. हे निर्विवाद सत्य होय. पण कोणासाठी? कोण म्हणू शकतो असे? तर बाबाच ह्याची फोड करताना सांगतात, *आपल्या रूपाचे, आपली दृष्टी बंद करून जर कां आपण दर्शन घेण्यात यशस्वी झालो, म्हणजेच तो भक्त आपल्या स्वरूपात जातो, त्यावेळीच तो ब्रह्म होतो.*

बाबा पुढे किती साध्या आणि सोप्या शब्दात सांगतात, *आपल्या हृदयी जो अविनाशी आहे, त्याला ओळखले म्हणजेच संसार* *ज्यावेळी आपण आकाराची जाणीव घेऊ तेव्हाच निराकाराचा शोध लागेल.*

बाबा म्हणतात, *गरीब, श्रीमंत हे पूर्व संचित आहे* म्हणून भक्ती मार्गातील, त्यातही एकाच सद्गुरू माऊलींच्या सेवेक-यांमध्ये *गरीब, श्रीमंत* हा भेदभाव कुणी करू नये किंवा कुणी आणूही नये.

येथे *कृष्ण-सुदाम्याचे* उदाहरण बरेच काही सांगून जाते. ह्यापासून आपण बोध घेण्यास काहीच हरकत नाही.

तुकाराम महाराज म्हणतात, *सगुणाचे सार घेतल्यावर *सत् + चित् + आनंद = सच्छिदानंद* लांब नाही. म्हणजेच सताच्या चित्तात अर्थात सद्गुरू माऊलींच्या चिंतनात, सद्गुरू माऊलींच्या आठवणीत किंवा स्मरणात म्हणा आपण आपला अमूल्य असा वेळ जर कां कारणीभूत लावला तर तो *सच्छिदानंद* आपणास दूर नाही.

हे आहे, ते सर्व परमेश्वराचे आहे, आपण फक्त निमित्त मात्र आहोत, ही जाण जर आपणास सदोदित असेल, तरच बाबा म्हणतात, *संसार सुखाचा होईल.*

*जी ज्योत मनाने सुस्वरूपी असेल तीच सद्गुरूंना पाहू शकेल.*

एकनाथ महाराज म्हणतात, *काया ही पंढरी, आत्मा हा विठ्ठल* जर आपण काया म्हणजे हे आपले पंचमहाभूतांचे शरीर हे जर कां पंढरपूर मानले, तर त्या शरीरात जो वास करून राहिलेला *आत्मा* आहे, तो म्हणजे विठ्ठल होय.* हे खरेच आहे, परंतु हा आत्मा रूपी विठ्ठल कोण? पंढरपूरात युगाने युगे उभा असलेला विठ्ठल की इतर कोणी?

 _तर तो हा विठ्ठल नव्हे. विठ्ठलांचा विठ्ठल जो आहे तो. तो कोण? तर ते म्हणजे ज्यांनी ह्या अगोदर 25 अवतार कार्ये नटविलीत ते, आपली श्री सद्गुरू माऊली, ज्यांनी ह्या कलियुगात 26 वे अवतार कार्य नुकतेच संपन्न केले, ते आपले बाबा._ 

बाबा म्हणतात, *तुकाराम* येणे *तुच का तो राम?*

बाबा पुढे म्हणतात, *ज्या ठिकाणी सत् आहे, त्या ठिकाणी भगवंत आहे.* आणि वेळ प्रसंगी अशा भक्ताचे संचितही ते स्थीर करतात. अशी कित्येक उदाहरणे बहुतेकानी *ह्याची देही, याची डोळा* प्रत्यक्षात अनुभवली आहेत.

शेवटी ती दयाघन श्री सद्गुरू माऊली समस्त भक्तगणांना आठवण करून देताना म्हणते, *जर भक्ती आपल्याकडून झाली नाही, तर जन्माला येऊन आपला उभा जन्म फुकट आहे.*

*तुम्ही या भवसागरी संसार करून, आणि करता करता तो तरून या भवसाग-याच्या पलीकडे चला.* _म्हणजेच त्या श्री सद्गुरू माऊलींच्या चरणी लीन होऊन, त्यांचे दर्शन मिळवून आयुष्याचे सार्थक साधा._

अनगडवाणी