Friday, July 30, 2010

श्रद्धेचे वसतीस्थान जे आहे ते शुद्ध असेल......(पान क्रमांक ५)

श्रद्धेचे वसतीस्थान जे आहे ते शुद्ध असेल

तर भावना शुद्ध राहील (पान क्रमांक ५)

-परमपूज्य श्री सद्गुरू स्वामी भगवान महाराज-

 

 

    काही काही सेवेकरी म्हणतात, "बाबा ! आम्हाला अजून प्रकाश नाही, प्रकाशाची गती मिळत नाही." त्यावेळी सद्गुरू सांगतात हा अभ्यास तुझा तुलाच करावयाचा आहे. परंतु तुमच्या मनात सद्गुरुंबद्दल सद्भावना ओथम्बल्याशिवाय बाबा तरी काय करतील? म्हणून कर्तव्य करताना देखील सत् तुम्हाला याच अभ्यास घडवीत असते. अव्यक्ताकडून कर्तव्य घडते ते कसे होते याचा अभ्यास तुम्हाला घडवितात. अव्यक्तांचे प्रणव तुम्ही ऐकता हे देखील तुमचे भाग्यच आहे. जरी तुम्ही ते पाहू शकला नाहीत तरी त्यांचे प्रणव तुम्हाला ऐकायला मिळतात हे देखील तुमचे भाग्याच आहे. अनंतांचे प्रणव ऐकणे याहून महत् भाग्य ते कोणते? असे प्रणव इतरत्र कोठे ऐकायला मिळतील? कोणाला अनुभवता येतील? गुरुदेव पितामहानसारखे परमपूज्य तत्व, सप्तऋषींचे प्रमुख, यज्ञयागात सर्वश्रेष्ठ, महान महान ऋषी ज्यांच्यापुढे लीन आहेत असे ते तत्व, ते देखील या आसनाप्रत प्रणव देतात मग असे ते आसन आणि त्यावर आरूढ असलेले तत्व, सेवेक-यानो परमश्रेष्ठ नाही का? मग अशा आसनाप्रत, अशा तत्वाप्रत मनाने किती लीन राहिले पाहिजे? आणि जर का एकदा मन त्या ठिकाणी लीन झाले, सत्मय झाले, सद्गुरुमय झाले, मग आपोआप सर्वस्व त्या ठिकाणी आकारेल. सर्वस्वाची जाण देणारे तत्व दुसरे तिसरे कोणी नसून सद्गुरुच आहेत. याच्यावेगले जाण देणारे दुसरे कोणीही नाही.

    आकार आणि निराकार यात कोणताही फरक नाही.

    आकारही तेच आणि निराकारही तेच! पण लक्षात ठेवा हे कधी ओळखता येईल? ज्यावेळी आपले मन सद्भावनेने ओथंबलेले असेल त्यावेळेस. आकार आणि निराकार हे केवळ मानाजवळ आहेत.

    आम्हाला देखील या कलियुगामध्ये असे संदेश आहेत की मनाची छाननी घ्या. मनाचा कस आहे, परंतू सत्, द्वापार, त्रेतायुगासारखा कस नाही. मनाने तो किती ठाम आहे, हाच कस आहे. कोणीही तुमच्यापैकी असा सेवेकरी आहे का की जो हे सांगू शकेल की बाबा आमचा कस घेऊन मोकळे झाले. परंतु जो जाणकार आहे तो यातले मर्म जाणतो. म्हनून म्हटले आहे, जागेल तो जगेल, सावध तो सुखी.

    सद्गुरू तत्वच असे आहे, त्याचा थांग कोणालाही लागणार नाही. सेवेक-याने हे मनोमन ठरविले पाहिजे की मला यातले मर्म जाणायचे आहे. मला पुढचा मार्ग शोधावयाचा आहे. ज्यांचा मी सेवेकरी आहे, ज्यांच्या चरणावर मी लीन आहे ते कोण आहेत, तर त्रिगुणांच्या कारभारावर देखरेख आहे, पण ते माझ्या ठिकाणी कसे वास करीत आहेत हे मला जाणले पाहिजे. रामदास स्वामिनी मनाच्या श्लोकात काय सांगितले आहे,

         मना सज्जना भक्ती पंथेची जावे !


Mayur Tondwalkar

Thursday, July 29, 2010

श्रद्धेचे वसतीस्थान जे आहे ते शुद्ध असेल तर भावना शुद्ध राहील (पान क्रमांक ४)

श्रद्धेचे वसतीस्थान जे आहे ते शुद्ध असेल

तर भावना शुद्ध राहील (पान क्रमांक ४)

-परमपूज्य श्री सद्गुरू स्वामी भगवान महाराज-

 

सेवेक-यानो तो महाल पहायचा, अनुभवयाचा प्रयत्न करा. या नकली मायावी महालामध्ये काय सापडणार आहे. तुम्हीच सांगा, उद्या काही स्थित्यन्तरे घडली तर हा तुमचा नकली महाल टिकणार आहे का? जर त्या अनंत तत्वाने पंचमहाभूताना आदेश सोडले तर हा तुमचा नकली महाल किती टिकणार आहे? परंतु सद्गुरू दयाघन तत्व आहे, ते अनंताना सांगतात कि हे माझे सेवेकरी आहेत त्यांना पूर्णत्व संरक्षण देवून स्थित्यन्तरे घडवा आणि अनंत तत्व सद्गुरूंच्या प्रणवाला किंमत देवून त्याप्रमाणे स्थित्यन्तरे घडवतात, तुमच्या या मायावी नगरीत त्यांनी आपले स्थान प्रस्थापित करून त्या स्थानाला अद्वितीय कर्तव्याची दिशा दिलेली आहे. तुम्ही त्यांना सद्गुरू म्हणता. तेच सत् आहे. त्यांना मार्गदर्शक कोण आहे? तर अनंत तत्व! तेच सताला, सद्गुरुना कर्तव्याचे मार्गदर्शन करतात. अनंतान्शिवाय ह्या विश्वाचा कारभार चालला नाही, चालत नाही आणि चालणार नाही. अनंतान् खेरीज त्रिगुणांचा कारभार कोणीही हाकने शक्य नाही, त्या अनंतांशी सम्बधीत असणारे तत्व सत् आहे, सद्गुरू तत्व आहे.

          अशा त्या सद्गुरुंबद्दल आपल्या मनात सद्भावना निर्माण व्हावी हि इच्छा ! मनाने आकारल्याखेरीज ते तत्व दिसणार नाही, पाहता येणार नाही. खरोखरच येथील सर्व सेवेक-यांनी आपल्या सद्गुरुंकरीता मनामध्ये सद्भावना, सत्शुद्धपणा आणणे हे प्रत्येकाचे आद्य कर्तव्य आहे.

सेवेक-याच्या मनाची भावना सत् शुध्द असेल तर त्याचे क्रियाकर्म सत्शुध्द असावयास पाहिजे. परंतु आपले सेवेकरी कसे आहेत, "वाटता जड भारी, मग आठवावा श्रीहरी." सद्गुरुंनी कर्तव्याकरिता प्रणव दिले तर वेळ नसतो, परंतु सद्गुरुंनी जर असे सांगितले कि "आता मला वेळ नाही, नंतर पाहू", तर सेवेक-यांची काय अवस्था होईल? परंतु सद्गुरू तत्व दयाघन आहे, त्यांना आपल्या सेवेक-यांकरिता माया आहे, ओढ आहे, आपुलकी आहे, ते त्याला प्रसंगातून मुक्त करतात. ते सदैव सेवेक-यांना सांगत असतात, मनात सद्भावना निर्माण कर. मन सद्गुरुमय बनविण्याच्या प्रयत्न कर आणि एकदा मनाने ते आकारले की त्यांची भावना सदैव सतच राहणार. पण जर एखाद्या सेवेक-याने स्वत:ला यापासून वंचित केले, गैरकृत्ये केलीत, तर विचार करा, तुम्हाला परत सद्गुरू सान्निध्य कसे मिळेल? मनाला आकार देणे, ही त्या सताची शक्ती आहे. तुम्हाला परत सान्निध्यात पाठविणे ही देखील त्या अनंतांची, सताची, सद्गुरुंचीच शक्ती आहे. म्हणून सेवेक-यानो आपल्या सद्गुरुंबद्दल आपल्या मनात सद्भावना जागृत ठेवा. मनाला परोपरीने सांगा की आपले सर्वस्व त्या अचलाप्रत ठेव तरच तुला पुढची गती प्राप्त होईल आणि एकदा गती मिळून सर्वस्व तुझ्यातच प्रगटले मग तुला कशाचीही ददात नाही. हे मना ! तू त्यांची, सद्गुरूंची जान घे. पूर्ण सत्मय हो. सद्गुरुमय हो. माझ्या सद्गुरुंशिवाय ह्या त्रिभुवनात वेगळे तत्व नाही. पण हे मन स्थिर करणे अत्यंत दुरापास्त गोष्ट आहे. एकच तत्व त्याला स्थिर करू शकते, ते म्हणजे सत् किंवा सद्गुरू तत्व! पण हे कधी होईल ज्यावेळी सेवेकरी शारीरिक, मानसिक, संपूर्णपणे सताकरिता, सद्गुरुंकरिता ओथंबलेला असेल तेव्हाच ते होऊ शकेल. त्यावेळी त्याचे मन स्थिर होईल.


Mayur Tondwalkar

Monday, July 26, 2010

श्रद्धेचे वसतीस्थान जे आहे ते शुद्ध असेल तर भावना शुद्ध राहील (पान क्रमांक ३)

श्रद्धेचे वसतीस्थान जे आहे ते शुद्ध असेल

तर भावना शुद्ध राहील (पान क्रमांक ३)

-परमपूज्य श्री सद्गुरू स्वामी भगवान महाराज-

 

यद् भावो तद् भवतू !!

 

          जसा भाव तसा सद्भाव, तशीच भावना. असद्भाव तशी भावना. आपली क्रिया कर्मे मायातीत असल्यामुळे आपण फक्त सद्भावनेचे अवडंबर करतो. सद्गुरुना असे दर्शविण्याचा आम्ही सतत प्रयत्न करतो. आम्ही सद्गुरूंच्या ठिकाणी ठाम आहोत असे दाखविण्याचा प्रयत्न करतो. आपले सद्गुरू आपल्याला सांगतात, संसारात राहून संसाराची कर्तव्य पूर्णत्व कर. मुला-माणसात आनंदाने रहा. समर्थ तुला सदैव देणारे आहेत. कोणतीही काळजी करू नकोस. पण एक लक्षात ठेव हि सर्वस्व माया आहे. ती नाशिवंत आहे. इतकेच काय, तू जे कवच धारण केले आहेस ते देखील नाशिवंत आहे. परंतु तुझ्या आत वास करणारे जे अविनाशी आहे ते मात्र लय होणारे नाही. मग तू हा का विचार करत नाहीस, का या मायेत स्वत:ला गुरफटवून घेतोस?

 

    काही काही मानव असे विपरीत वागत असतात आणि विचार करतात कि मी जे काही करतो आहे ते कोणाला कळणार आहे? परंतु तुमच्यात जे सत् आहे, जे अविनाशी आहे, त्याला मात्र पूर्णत्व जान  असते. अरे! जे अनंत, अविनाशी सत् आहे त्यान्चे लक्ष सूक्ष्माहूनहि सूक्ष्म असलेल्यान्वर देखील लक्ष असते, तर तुमच्यावर त्यांचे लक्ष असणार नाही का? अरे! अनंत तत्व कसे आहे तर सर्व व्यापून अलिप्त तत्व आहे. सर्व ठिकाणी विखरून देखील अलिप्त आहे. मग असे हे जे विखुरलेले तत्व आहे त्यांच्या नजरेतून काही सुटणार आहे का? अरे! सेवेक-यानो तुमच्या आमच्यात सर्वस्व एकच सत् तत्व भरून उरलेले आहे. फक्त आमच्या प्रकृतीत फरक आहे. मग आता तुम्हीच सांगा जे आतमध्ये वास करीत आहे ते तुमची कृती, क्रिया, कर्म जाणते कि नाही? हे मानवा! आमच्यात सर्वस्व एकच सत् तत्व भरून उरलेले  आहे. फक्त आमच्या प्रकृतीत फरक आहे. मग आता तुम्हीच सांगा जे आतमध्ये वास करीत आहे ते तुमची कृती, क्रिया, कर्म जाणते कि नाही?

 

हे मानवा! हे सर्वस्व तू गुप्त ठेवतोस, हे मना ! तू हे कळू देत नाहीस. सेवेक-यानो तुमच्यावर प्रसंग आल्यानंतर मग सेवेकरी आसनाजवळ गयावया करू लागतो आणि सांगतो, "बाबा यातून केवळ आपणच मला सोडवू शकाल." सद्गुरू हे दयाघन तत्व आहे. ते सर्वस्व विसरून आदेश देतात. सेवेक-याला प्रसंगातून सोडवून मार्गस्थ करतात. असे हे जे दयाघन तत्व आहे आणि अशा या दयाघन तत्वाच्या ठिकाणी तुम्ही शरण आहात, मनाने शरण आहात कि शरीराने शरण आहात? मनाने शरण आहोत असे म्हणता, तर काहीजण शरीराने शरण आहोत असे म्हणतात. काहीजण म्हणतात आम्ही मनाने आणि शरीराने शरण आहोत, तर काही सेवेकरी म्हणतात आम्ही तिन्ही अंगानी शरण आहोत. सेवेकरी म्हणतात, "बाबा ! आम्ही तुम्हाला बंगला बांधून देतो, पण बाकीचे आमच्याकडे राहू दे."  अरे सेवेक-यानो ! तुमच्या या बंगल्यात वास करणारे हे सत् नव्हे. या मायावी पसा-याने तू काय साधणार आहेस? सताचा, सद्गुरूंचा बंगला फार वेगळा आहे. अरे! तो महाल फार वेगळा आहे, त्यातून सतत अखंड नामाचा ध्वनी निघत असतो,


Mayur Tondwalkar

Thursday, July 22, 2010

श्रद्धेचे वसतीस्थान जे आहे ते शुद्ध असेल तर भावना शुद्ध राहील (पान क्रमांक २)

श्रद्धेचे वसतीस्थान जे आहे ते शुद्ध असेल

तर भावना शुद्ध राहील (पान क्रमांक २)

शरीर मन सोडून नाही आणि मन शरीर सोडून नाही. शरीराला त्रास झाला तर मनाला त्रास हा होणारच! काही शारीरिक त्रास झाला, काही प्रसंग ओढवला तरी देखील मन बेचैन होतेच! अशा वेळी मन शांत राहते का? मन बेचैन झाले कि शरीर बेचैन होते आणि शरीर बेचैन झाल्यावर मन देखील बेचैन होते. जर तू आपले मन दृढ श्रद्धेने सद्गुरु माऊलींच्या चरणांवर पूर्णत्व अर्पण केलेस तर सद्गुरु तुला अशा व्याधींपासून दूर ठेवतात आणि मन सद्गुरु चरणांवर अर्पण करताना काही हातचे राखून केलेस तर त्याची बेरीज वजाबाकी त्याच त-हेने होणार कि नाही? हे मना! तुझ्या ठिकाणी सद् गुरुन्बद्दल का सद्भावना निर्माण होत नाही? माझ्या सद्गुरूनबद्दल, हे मना! तू मागे-पुढे का होतोस? आपणच आपल्या मनाला असा प्रश्न करावा. आपले जे सद्गुरू आहेत ते प्रत्यक्ष अनंत तत्वाशी, परम तत्वाशी व्यवहार करतात. त्या करिता हे मना! तू साशंक का असावे? सद्गुरूंच्या प्रणवाला अनंत किंमत देतात, साक्षात गुरुदेव पितामह (वशिष्ठ गुरुदेव) किंमत देतात, महान महान तत्वे किंमत देतात अशा ठिकाणी हे मना! तू का स्थिर होत नाहीस? माझ्या सद्गुरुनबद्दल तुझ्या मनात का आदरभाव निर्माण होत नाही? हे मना! तू ठाम, निष्काम गतीने का वाटचाल करीत नाहीस? महान महान तत्वे, ऋषी-मुनी ज्या माझ्या सद्गुरूंच्या चरणांवर लीन आहेत त्या सताच्या, सद्गुरूंच्या चरणांवर हे मना! तू का बरे लीन होत नाहीस?

    प्रारब्धाप्रमाणे, पुर्वसंचीतानुसार त्यांनी आम्हाला आपल्या सान्निध्यात घेतले आहे, अशा त्या माझ्या सद्गुरूंच्या ठिकाणी हे मना! तू का बरे स्थिर होत नाहीस? मन म्हणते अरे! मला तू असा प्रश्न करतोस, पण तुझी कृती कशी आहे याचा तू विचार केलास का? तुझी क्रिया, कृती, कर्तव्य कोणत्या त-हेने चालू आहे याचा विचार तू केला आहेस का? आणि मग मलाच का बरे प्रश्न करतोस कि सताच्या, सद्गुरूंच्या ठिकाणी मी का स्थिर होत नाही? तुझी क्रिया, कर्तव्य, कृती जर सद्भावनेने ओथंबलेली असेल तर मी का बरे तुझ्या सताच्या, सद्गुरूंच्या ठिकाणी स्थिर होणार नाही, का बरे माझ्या सद्गुरूंच्या ठिकाणी असणार नाहीत? म्हणूनच म्हटले आहे,


Mayur Tondwalkar

Tuesday, July 13, 2010

श्रद्धेचे वसतीस्थान जे आहे ते शुद्ध असेल तर भावना शुद्ध राहील

श्रद्धेचे वसतीस्थान जे आहे ते शुद्ध असेल

तर भावना शुद्ध राहील

श्रद्धेचे स्थान जे असावे लागते ते भक्ताजवळ नसेल तर भावना शुद्ध राहू शकेल का? श्रद्धेचे जे वसतीस्थान आहे ते जर शुद्ध नसेल, श्रद्धा आहे पण ती कशी, आम्हाला काळजी नाही, आपले बाबा आहेत, काही जरी झाले तरी ते बघतील. काही प्रसंग आल्यावर व हाक मारल्याबरोबर सद्गुरू येतील. आम्हाला प्रसंगातून सोडवतील, आमचे सांत्वन करतील, माझे बाबा किंवा माझे सद्गुरू मला बिकट प्रसंगातून सोडवतील अशी

सेवेक-याना खात्री असते. त्यांची श्रद्धा असते. परंतु सेवेकरी हा विचार अडचणीच्या वेळेला करतो. हा त्याचा भाव त्याच्यावर प्रसंग आल्यानंतर असतो. परंतु सेवेक-यानो तुम्हीच सांगा यासाठीच केवळ शक्ति आहे का? आपण पाहतो आपल्यात काही ज्योती, काही सेवेकरी असे आहेत की त्यांची मुलेच त्यांना दाद देत नाहीत, त्यांची मुले त्यांचे ऐकत नाहीत. अर्थात सद्गुरूंचे हे कर्तव्य आहे की अशा सेवेक-यांना शांत करणे, कारण जर सेवेक-याचे मन बेचैन झाले तर भक्ति होणे शक्य नाही.


Mayur Tondwalkar

दुष्टपणाने थोडावेळ सरशी मिळवता येईल. पण अंतिम विजय कधीच मिळवता येणार नाही.

दुष्टपणाने थोडावेळ सरशी मिळवता येईल. पण अंतिम विजय कधीच मिळवता येणार नाही.
Mayur Tondwalkar

Tuesday, July 6, 2010

Page-4

     परिमळ कसा असतो? तर अत्यंत निर्मळ ! परिमळ म्हणजे सुवास. सुगंध कसा असतो? परंतु ही माया निर्मळ असते का हो? म्हणून सद्गुरु सांगतात, "या मायेत गुंतून राहू नकोस. सर्वस्व सत् चरणांवर अर्पण कर. अर्थातच सत्मय हो. द्वैत दूर केल्याशिवाय तुला अद्वैताचा अनुभव येणे शक्य नाही. अद्वैत झाल्याशिवाय एकचित्त झाल्याशिवाय प्रकाश मिळणार नाही आणि प्रकाश मिळाल्याखेरीज आत्मानंदात लय होता येणार नाही. म्हणून सेवेक-यांनी हे लक्षात ठेविले पाहिजे की सत्मय झाल्याखेरीज अद्वैत होणे शक्य नाही. तुमचे सद्गुरू तुम्हाला परोपरीने, तळमळीने समजावून सांगतात. सेवेक-यांवर काही प्रसंग आला तर गुपचूप संदेश देउन कार्य करून घेतात. मग आता अद्वैत होण्याच्या मार्गावर तुम्ही नको का वाटचाल करायला? जे सातच्या ठायी अद्वैत होतील ते खरोखर भाग्यवान. पण साताशी जे अद्वैत भावनेने व्यवहार करतील ते अद्वैत होणे कदापीही शक्य नाही. जे अद्वैत आहेत त्यांना ते आपल्या सान्निध्यात घेतील मग असे सेवेकरी भाग्यवान नाहीत का? अशा सेवेक-यांच्या मनात ही भावना सतत वास करीत असते की सत् माझे आहेत आणि मी सताचा आहे, सद्गुरूंचा आहे. असा सेवेकरी असल्यानंतर त्याच्यावर प्रसंग यायला देतील का? सत् आपल्या भक्तांसाठी तत्पर आहे, सद्गुरू आपल्या सेवेक-यांसाठी तत्पर आहेत, असतात, पण भक्त भगवंतासाठी तत्पर असतो का? सेवेकरी सद्गुरुंसाठी तत्पर असतो का? सद्गुरू म्हणतात, "सेवेकरी माझा आहे, परंतु सेवेकरी म्हणतात का की सता मी तुमचा आहे! ते म्हणतात मी अजून माझाच आहे! सद्गुरू विचारतात, "तु तुझा आहेस मान्य आहे. परंतू सताचा केव्हा होणार?" अरे! सताच्या, सद्गुरूंच्या प्रश्नाचे उत्तर देण्यासाठी एवढा विलंब का करतोस? एवढा विचार कसला करतोस? सर्वात प्रथम हे लक्षात घे की सद्गुरू मिळणे हेच महत् भाग्य होय. हीच सर्वात प्रथम पायरी होय. मानव जन्म जरी घेतला तरी सद्गुरू मिळणे अत्यंत दुरापास्त आहे आणि सद्गुरू प्राप्त झाल्यानंतर ते टिकविणे त्याहीपेक्षा कठीण! आज सेवेक-यानो तुम्ही सान्निध्यात आहात म्हणून तुम्हाला थोडे तरी कळतंय. परंतू आज बाह्य जगात लोकांची अवस्था कशी आहे, ही तुम्ही पाहतच आहात.

                                                हया पुढे चालू .................Mayur Tondwalkar

मित्राकडून फसवले जाण्यापेक्शा त्याचाबाबत अविश्वास निर्माण होणे अधिक खेदाचे आहे. – कान्फुशियस

मित्राकडून फसवले जाण्यापेक्शा त्याचाबाबत अविश्वास निर्माण होणे अधिक खेदाचे आहे. – कान्फुशियस
Mayur Tondwalkar

Sunday, July 4, 2010

Page-3

सेवेक-यानी परोपकार जरूर करावा, परंतु सर्व सर्वप्रथम स्वत:ची मानसिक शक्ति अजमावून परोपकार करावा. जीवात्मा ह प्रत्येक अणु रेणूत भरलेला आहे. मानवाने दानशूर होण्यापेक्षा  स्वयंपूर्ण होणे आवश्यक आहे. ही जीवशक्ति अनन्तानी, सतानी प्रत्येक प्राणीमात्रात फेकलेली आहे. मन हीच या शक्तीची मेख आहे. ते सत् सांगते, अनंत सांगतात कि तुझे मनच तू माझ्या ठिकाणी लय कर. कृष्णानी देखील पार्थाला हेच सांगितले कि हे पार्था तू तूझे मन माझ्यातच लय कर. परंतु सेवेकरी काय करतात तर् "वाटता जडभारी, मग आठवावा श्रीहरी," ते म्हणतात "काही प्रसंग आलाच तर् सद्गुरूंची आठवण करुया नाहीतर त्यांना उगाच कशाला त्रास द्या." सेवेक-यानो तुम्हीच सांगा भक्त आणि भगवंत एक आहेत का हो? जर भगवंतच भक्ताच्या हृदयात वास करीत आहेत तर ते वेगळे असू शकतील का? परंतु आम्हाला काय वाटते, भगवंत वेगळा आणि मी वेगळा. आपल्यात्त ते वास करणारे जे अविनाशी तत्व आहे त्यालाच आत्मा म्हणतात. आपणाला कल्पना आहे कि जर अद्वैत गती प्राप्त करायची असेल तर् मनाची ठेवण सत् शुद्ध पाहिजे. जर हेतुरहित असेल तर् त्याला आत्मज्ञान म्हणजे शुभ्रप्रकाश तो पाहू शकेल. परंतु मन जर हेतुरहीत नसेल तर आत्मज्ञान होणे दुरापास्त आहे. आपले सेवेकरी याची जान घेत नाहीत की आपले सद्गुरू आपणाला तळमळीने परमोच्च गतीपर्यंत समजाउन सांगतात पण ते ऐकायाचे आणि सोडून द्यायचे. "मी तू रहीत होणे म्हणजेच सत्मय होणे, म्हणजेच सद्गुरूमय होणे." आता आपल्याला सद्गुरुनी तळमळीने अमृत पाजले तर ते अमृत प्राशन करून सेवेक-यानी शक्तिमान होण्याचा प्रयत्न केला पाहिजे. परंतु सेवेकरी काय करतात जिथे ऐकतात तिथेच सोडून मोकळे होतात. सद्गुरू प्रणवाचा अर्थ तुम्ही जाणला आहे का? सद्गुरू प्रणव हे अमृतमय प्रणव आहेत. ते सेवेक-याना आपल्या अमृततुल्य बोलानी समजाऊन सांगतात. जर सद्गुरुनी सांगितलेल्या प्रणवाप्रमाणे जर आपण मार्गस्थ झालात तर सद्गुरुना देखील मनोमन समाधान वाटते. पण जर हेच जर त्या अमृततुल्य बोलांकडे दुर्लक्ष केले तर सद्गुरुना काय वाटेल? आणि जर सेवेक-याना कोणताही त्रास होउ लागला, त्यांच्यावर कोणता प्रसंग ओढवला, मग सेवेकरी गयावया कोठे करणार? सद्गुरुंकडे. मग सद्गुरुंनी काय करावे? म्हणून सांगतो मी तू रहीत होण्याचा प्रयत्न करा कारण ही अत्यंत कठीण, दुरापास्त गोष्ट आहे.

 

       मी तू रहीत होणे म्हणजे सत्-मय होणे. जे काही आपले सद्गुरू सांगतील ते ब्रह्मवाक्य! दूसरे मी काही जाणत नाही. अशी सेवेक-यांच्या मनाची धारणा असली पाहिजे. असा आत्मविकास प्रत्येक सेवेक-यांच्या मनाची धारणा असली पाहिजे. असा आत्मविकास प्रत्येक सेवेक-यानजवळ असायला पाहिजे. सद्गुरूंचे वाक्य जर

सेवेक-याने प्रमाण मानले नाही तर् कोणाचे वाक्य प्रमाण मानावे? मी तू रहीत होणे म्हणजेच अद्वैत ! हे होण्यासाठी सेवेक-यांनी मनाने सत्मय होणे आवश्यक आहे. मन एकदा सत्मय झाले की सर्वस्व सत्मय झालेच म्हणून समजा. म्हणून सद्गुरूंच्या ठायी, सत् चरणांवर मन अर्पण करताना कसे असले पाहिजे तर् ठाम !

सेवेक-यांच्या मनात ही भावना सदैव असली पाहिजे, मी सद्गुरूंचा आहे आणि सद्गुरू माझे आहेत.

 

       सद्गुरूंचा जो सेवेक-यानवर विश्वास असतो त्याची परिपूर्तता करणे प्रत्येक सेवेक-याचे आद्य कर्तव्य आहे. या विश्वासाला तडा जाउ न देण्याची जबाबदारी प्रत्येक सेवेक-याची आहे. एखादा सेवेकरी विचित्र त-हेने जाउ लागला, वागू लागला तर मात्र सद्गुरू त्यावर नाराज होतात. पण सेवेक-यांसाठी सद्गुरू सदैव खालीवर होतात. त्यांच्या मनात सेवेक-यानबद्दल तळमळ असते. भक्त आणि भगवंत वेगळे आहेत का? हे समजण्यावर आहे. सेवेकरी कसा पाहिजे तर सत् शुद्ध आणि ठाम ! माझे सद्गुरू सांगतील तेच प्रमाण त्यावेगळे दूसरे काही नाही अशी त्याच्या मनाची ठाम धारणा असली पाहिजे. सेवेक-यावर एकदा प्रसंग आला, आपत्ती आली तर सद्गुरू असे म्हणतात का, "मला तुझ्या संसाराशी काय घेणे देणे आहे? तूझे तूच बघ." वेळ प्रसंगी सद्गुरू धाव घेत नाहीत असे कधी झाले आहे का? सर्वात प्रथम सेवेक-यासाठी धाव घेत नाहीत असे कधी झाले आहे का? सर्वात प्रथम सेवेक-यासाठी धाव घेणारे सद्गुरू असतात, भक्तांसाठी भगवंतच धाव घेतात. माया नाही. आप्तस्वकीय जबाबदारी पडल्यावर दूर जातात, दूर लोटतात. परंतु कितीही जबाबदारी पडली तरी सद्गुरू मात्र सेवेक-याला दूर लोटत नाहीत. मग अशा सद्गुरूंच्या ठिकाणी का ठाम राहू नये? का अद्वैत राहू नये? सेवेक-याला प्रसंगातून सोडविण्यासाठी जीवाचे रान करतात, संतांनीच सांगितले आहे की तू अद्वैत हो, सर्वस्व सद्गुरू चरणांवर अर्पण कर. हे केल्यानंतर तुझ्या लक्षात येईल की आत्मज्ञान तुझ्यापासून दूर नाही. परंतु होत नाही याला कारण माया! ज्यांना आपण माझे म्हणतो, ते कोणीही तुला आत्मज्ञान दाखवू शकणार नाहीत. मानवाने, सेवेक-यांनी परोपकार जरूर करावेत पण कसे तर चंदनासारखे चंदन स्वत: झिजते आणि झीजताना दुस-याला सुगंध देते. परंतु या मायावी स्थितीत कितीही जरी झीजलो तरी सुगंध स्थिती येते का हो?

 

Mayur Tondwalkar

Saturday, July 3, 2010

Page-2

गुरुगीतेमध्ये महेशानी अंबेला सांगितले, "जीवीत तेही समर्पिजे" म्हणजे सर्वस्व जो तुझा जीवात्मा आहे तो देखील तू अर्पण कर. काही शिल्लक ठेऊ नकोस. "जीवात्मा अर्पण केलास कि शिवात्मा प्रगट होणे म्हणजे आत्मज्ञान प्रगत होणे. गुरुगीतेत सांगितल्याप्रमाणे मी तू रहीत होणे म्हणजेच जीवात्मा अविनाशाप्रत अर्पण करणे. परंतू जीवात्मा अविनाशाप्रत अर्पण होत नाही. जागृतीत आल्यानंतर परत माझे – तुझे चालू होते. या मायावीतून आपल्याला बाहेर पडावयाचे असेल तर, माझे-तुझे रहीत होणे अत्यंत आवश्यक आहे. परंतू आत्मज्ञान अनुभवायचे असेल, त्या अविनाशाप्रत जायचे असेल तर माझे-तूझे करण्याचा काही उपयोग आहे का? तेथे द्वैताचा काय उपयोग? त्याकरिता आपणाला अद्वैत झाले पाहीजे. मनाचे मी तू रहीत होणे याचा अर्थ काय आहे कोणी सांगू शकेल? आणि कोणी असे म्हटले की मी आता मी-तू रहीत झालेलो आहे, तेव्हा कसे आणि कधी ते मनाला टिचकी मारतील ते कळणार नाही. हे कळण्याची, समजण्याची, जाणण्याची

सेवेक-यानो तुमची कुवत नाही. कारण त्या अनंत शक्तीच ठाव घेणे अत्यंत दुरापास्त आहे. करून अकर्ते पद आहे ते त्या शक्तीचा मुकाबला त्रिभुवनात कोणीही करू शकणार नाही. सतांनी हे सर्वस्व जाणले होते. म्हणून ते म्हणत असत, "अनंता मी तुमच्या चरणाचा दास आहे, माझे सर्वस्व आपणच आहात. मी माझा नाही." आणि असे मन ज्यावेळी जीवात्म्याकडे व्यवहार करील त्यावेळी शिवात्मा प्रगत होईल. हेतुरहीत झाल्याखेरीज जीवात्मा सापडणे शक्य नाही. प्रथम जीवात्मा शोधण्यासाठी, त्याच्याप्रत जाण्यासाठी हेतूरहित होणे आवश्यक आहे.

 


Mayur Tondwalkar

Friday, July 2, 2010

प्रत्यक्ष अनुभूती हेच खरे ज्ञान व खरा धर्म होय. – स्वामी विवेकानंद

प्रत्यक्ष अनुभूती हेच खरे ज्ञान व खरा धर्म होय. – स्वामी विवेकानंद


Mayur Tondwalkar

Thursday, July 1, 2010

जया अंगी नाही द्वैत, अद्वैत भाव तेणे आत्मस्थिती जानितसे

जया अंगी नाही द्वैत, अद्वैत भाव तेणे आत्मस्थिती जानितसे

द्वैत म्हणजे हेतू—अद्वैत म्हणजे हेतुरहित, अशी जी ज्योत असेल, ती आत्म स्थितीचा अनुभव घेउ शकते. अशी ज्योत आत्मस्थिती अनुभवते. अशी दृष्टी ज्या मानवाच्या मनाजवळ आहे तोच अशा आत्मस्थितीचा अनुभव घेउ शकतो. अशी स्थिती जाणून घेउ शकतो.

मानव आत्मज्ञानी होईल हे मान्य आहे पण हेतुरहित केव्हा होईल? हेतुरहित झाल्याखेरीज मानव आत्मस्थितीचा अनुभव घेउ शकणार नाही. पण मानव हेतुरहित केव्हा होउ शकतो? अहंकार रहित झाल्यानंतर मानव हेतुरहित होउ शकेल.

अहंकार हा हेतूचा सर्वात मोठा आसरा आहे. शत्रू आहे. रिपू आहे. मग हा अहंकार नष्ट करण्याकरिता मानवाने काय केले पाहिजे? मन सर्वस्वपरीने सद्-गुरु चरणांवर अर्पण केलेले असेल अशा मानवाला काही अवघड नाही. मानवावर अनेक प्रसंग येत असतात. परमेश्वराने,अनंतानी मानवाला शक्ती दिलेली आहे. ही शक्ती सर्वत्र भरून उरलेली आहे. ते नाहीत असे कोणतेही ठिकाण नाही. ज्योत जर सद्गुरु चरणात, सत् चरणात लय असेल तर् सद्गुरू त्या ज्योतीला कोणत्याही प्रसंगातून सोडवितात. सद्गुगुरून्च्या ठिकाणी ज्योतीने सर्वस्व वाहने आवश्यक आहे. मन बाकी ठेउन जर सद्गुरु चरणांवर बाकीचे अर्पण केलेले असेल तर त्याचा काय उपयोग आहे. एखादी ज्योत नामस्मरणात लय असेल सद्गुरूंच्या ध्यानात सदैव मग्न असेल, सद्गुरूंमध्ये तादाम्य पावलेली असेल तर त्याला ताटकळत ठेवणार नाहीत. प्रसंगातून त्याला ताबडतोब सोडवतील. तो सेवेकरी म्हणतो, "सता ! आपल्या चरणांवर मी सर्वस्व अर्पण केले आहे. माझ्याकडे अर्पण करण्यासारखे आत्ता काहीच उरले नाही. अनंत जर काही शिल्लक असेल तर ते तुम्हालाच माहित असेल."

मी रहित जे आहे ते अनंत. गुरुगीतेमध्ये महेशनी अंबेला सांगितले,


Mayur Tondwalkar

क्रोध हा मूर्खांचा तीव्र मनोविकार आहे. – वसिष्ठ मुनी

क्रोध हा मूर्खांचा तीव्र मनोविकार आहे. – वसिष्ठ मुनी



Mayur Tondwalkar

अनगडवाणी