Tuesday, July 6, 2010

Page-4

     परिमळ कसा असतो? तर अत्यंत निर्मळ ! परिमळ म्हणजे सुवास. सुगंध कसा असतो? परंतु ही माया निर्मळ असते का हो? म्हणून सद्गुरु सांगतात, "या मायेत गुंतून राहू नकोस. सर्वस्व सत् चरणांवर अर्पण कर. अर्थातच सत्मय हो. द्वैत दूर केल्याशिवाय तुला अद्वैताचा अनुभव येणे शक्य नाही. अद्वैत झाल्याशिवाय एकचित्त झाल्याशिवाय प्रकाश मिळणार नाही आणि प्रकाश मिळाल्याखेरीज आत्मानंदात लय होता येणार नाही. म्हणून सेवेक-यांनी हे लक्षात ठेविले पाहिजे की सत्मय झाल्याखेरीज अद्वैत होणे शक्य नाही. तुमचे सद्गुरू तुम्हाला परोपरीने, तळमळीने समजावून सांगतात. सेवेक-यांवर काही प्रसंग आला तर गुपचूप संदेश देउन कार्य करून घेतात. मग आता अद्वैत होण्याच्या मार्गावर तुम्ही नको का वाटचाल करायला? जे सातच्या ठायी अद्वैत होतील ते खरोखर भाग्यवान. पण साताशी जे अद्वैत भावनेने व्यवहार करतील ते अद्वैत होणे कदापीही शक्य नाही. जे अद्वैत आहेत त्यांना ते आपल्या सान्निध्यात घेतील मग असे सेवेकरी भाग्यवान नाहीत का? अशा सेवेक-यांच्या मनात ही भावना सतत वास करीत असते की सत् माझे आहेत आणि मी सताचा आहे, सद्गुरूंचा आहे. असा सेवेकरी असल्यानंतर त्याच्यावर प्रसंग यायला देतील का? सत् आपल्या भक्तांसाठी तत्पर आहे, सद्गुरू आपल्या सेवेक-यांसाठी तत्पर आहेत, असतात, पण भक्त भगवंतासाठी तत्पर असतो का? सेवेकरी सद्गुरुंसाठी तत्पर असतो का? सद्गुरू म्हणतात, "सेवेकरी माझा आहे, परंतु सेवेकरी म्हणतात का की सता मी तुमचा आहे! ते म्हणतात मी अजून माझाच आहे! सद्गुरू विचारतात, "तु तुझा आहेस मान्य आहे. परंतू सताचा केव्हा होणार?" अरे! सताच्या, सद्गुरूंच्या प्रश्नाचे उत्तर देण्यासाठी एवढा विलंब का करतोस? एवढा विचार कसला करतोस? सर्वात प्रथम हे लक्षात घे की सद्गुरू मिळणे हेच महत् भाग्य होय. हीच सर्वात प्रथम पायरी होय. मानव जन्म जरी घेतला तरी सद्गुरू मिळणे अत्यंत दुरापास्त आहे आणि सद्गुरू प्राप्त झाल्यानंतर ते टिकविणे त्याहीपेक्षा कठीण! आज सेवेक-यानो तुम्ही सान्निध्यात आहात म्हणून तुम्हाला थोडे तरी कळतंय. परंतू आज बाह्य जगात लोकांची अवस्था कशी आहे, ही तुम्ही पाहतच आहात.

                                                हया पुढे चालू .................Mayur Tondwalkar

No comments:

अनगडवाणी