Saturday, March 28, 2020

पहाट झाली हे लक्षात आले कारण...

खिडकीतून ऐकू येत होता पक्षांचा किलबिलाट. बाहेर पाहिले तर अंधुकसा प्रकाश खिडकीतून झिरपण्यास प्रारंभ झाला होता. वा-याच्या झुळकीने झाडांच्या फांद्या आजूबाजूच्या फांद्यावर माना टाकीत होत्या. लडीवाळपणे आणि प्रेमाने जणू काय आपल्या माना एकमेकांवर घासून एकमेकांवरील प्रेम व्यक्त करीत होत्या आणि त्यांचा तो लडीवाळपणा त्या होणा-या आवाजातून प्रगट करू लागल्या होत्या. त्यांना साथीला होता तो पहाटेचा समीर. 

कधी तो मंदपणे वाहत होता, तर कधी तो वेड लागल्यागत सुसाट वेगाने निघाला होता. त्या बेभान वा-याच्या बेभान स्पर्शाने मोठ मोठे वृक्ष जसे बेभान होऊन डोलत होते, तशा नाजूक, चाफेकळी सारख्या सुंदर नाजूक लयकारीने डोलणा-या लता-वल्लरी, किर्ती लहान पण कीर्ती महान असणारे छोटेखानी वृक्ष देखील एका नजाकतीने हळूवारपणे डोलतांना दिसून येत होते.

करकचून गाडीचा ब्रेक लागला आणि माझी तंद्रीच भंग पावली. एका गोड गुलाबी स्वप्नात मी हरवून गेलेलो होतो आणि आनंदात पुरता बुडालेला असतानाच ह्या एका ब्रेकने रंगाचा पूरा बेरंग करुन टाकला.

पहाटेच्या या स्वप्नात पार बुडालेलो असतानाच हा असूरी ब्रेक लागावा आणि स्वप्नभंग व्हावा यासारखे दु:ख ते कोणते? 

उठून अंथरुणात बसलो, तर खिडकीच्या बाहेरुन खरेच की पक्षांचा कलरव ऐकायला येत होता. झुंजूमुंजू पहाटेच्या संधीप्रकाशात तसे फारसे बाहेरचे दिसत जरी नव्हते तरी आजूबाजूच्या वातावरणातील गोडसा वाटणारा, स्पर्शाने थोडासा गारेगार वाटणारा वारा अंगावरुन जाताच डोळे विस्मयाने विस्फारले गेले आणि त्याचबरोबर जाणीव झाली, ती म्हणजे मी स्वप्नात नाही. हे तर सत्य समोर उभे ठाकले आहे. 

खरंच कां हे स्वप्न नव्हते. खरंच कां हे जे मी अनुभवत आहे ते सत्य आहे.

म्हणून अंथरुणातून ताडकन उठलो. खिडकीजवळ गेलो आणि बाहेरचा नजारा पाहण्याचा प्रयत्न करु लागलो.

तोपर्यंत मी साफ जागा झालेलो होतो. 

एका स्वप्नातून जागा होऊन, प्रत्यक्षात पृथ्वीवरील इतकी वर्षे हरविलेला स्वर्ग पहात होतो.

खरंच पृथ्वी इतकी सुंदर असू शकते कां? इतकी निरागस असू शकते कां? इतकी शांत-निवांत पाहावयास मिळाली असती कां? 

या अवनीवरील हे सुख आज जे पहावयास मिळाले, ते काय वर्णावे.

आपल्यापैकी प्रत्येकाने हा अनुभव आज ह्या एक दोन आठवड्यात घेतला असेल.

आपण खरोखरीच भाग्यवान. 

हे जरी खरे असले तरी ते भाग्य लिहीले गेले ते एका करोना व्हायरसमुळे. या करोना व्हायरसमुळे संपूर्ण जग आपआपल्या घरांत बंदीस्त होऊन पडलेलं असतांना, प्रत्येकाला अनुभवायला मिळता आहेत ते हे क्षण. 

कधी माणसाला आपणा स्वत:कडे, आपल्या कुटुंबियांकडे पहाण्यास वेळ मिळत नव्हता, आजुबाजुला डोकावण्यासाठी सुध्दा तो आसूसलेला होता. ह्या वेळेच्या पांगुळगाड्याला तो जुंपलेला होता. 

अशा परिस्थितीत तो निसर्गाकडे कोठून पाहणार? निसर्गातील हे अनुभव कसे बरे घेणार? 

परंतु निसर्गच त्याच्या मदतीला धावून आला आणि
नकारात्मकतेतून सकारात्मक पहाण्याचा निसर्गानेच त्याला धडा दिला.

कोरोना - CORONA

अनगडवाणी