श्रद्धेचे वसतीस्थान जे आहे ते शुद्ध असेल
तर भावना शुद्ध राहील (पान क्रमांक ५)
-परमपूज्य श्री सद्गुरू स्वामी भगवान महाराज-
काही काही सेवेकरी म्हणतात, "बाबा ! आम्हाला अजून प्रकाश नाही, प्रकाशाची गती मिळत नाही." त्यावेळी सद्गुरू सांगतात हा अभ्यास तुझा तुलाच करावयाचा आहे. परंतु तुमच्या मनात सद्गुरुंबद्दल सद्भावना ओथम्बल्याशिवाय बाबा तरी काय करतील? म्हणून कर्तव्य करताना देखील सत् तुम्हाला याच अभ्यास घडवीत असते. अव्यक्ताकडून कर्तव्य घडते ते कसे होते याचा अभ्यास तुम्हाला घडवितात. अव्यक्तांचे प्रणव तुम्ही ऐकता हे देखील तुमचे भाग्यच आहे. जरी तुम्ही ते पाहू शकला नाहीत तरी त्यांचे प्रणव तुम्हाला ऐकायला मिळतात हे देखील तुमचे भाग्याच आहे. अनंतांचे प्रणव ऐकणे याहून महत् भाग्य ते कोणते? असे प्रणव इतरत्र कोठे ऐकायला मिळतील? कोणाला अनुभवता येतील? गुरुदेव पितामहानसारखे परमपूज्य तत्व, सप्तऋषींचे प्रमुख, यज्ञयागात सर्वश्रेष्ठ, महान महान ऋषी ज्यांच्यापुढे लीन आहेत असे ते तत्व, ते देखील या आसनाप्रत प्रणव देतात मग असे ते आसन आणि त्यावर आरूढ असलेले तत्व, सेवेक-यानो परमश्रेष्ठ नाही का? मग अशा आसनाप्रत, अशा तत्वाप्रत मनाने किती लीन राहिले पाहिजे? आणि जर का एकदा मन त्या ठिकाणी लीन झाले, सत्मय झाले, सद्गुरुमय झाले, मग आपोआप सर्वस्व त्या ठिकाणी आकारेल. सर्वस्वाची जाण देणारे तत्व दुसरे तिसरे कोणी नसून सद्गुरुच आहेत. याच्यावेगले जाण देणारे दुसरे कोणीही नाही.
आकार आणि निराकार यात कोणताही फरक नाही.
आकारही तेच आणि निराकारही तेच! पण लक्षात ठेवा हे कधी ओळखता येईल? ज्यावेळी आपले मन सद्भावनेने ओथंबलेले असेल त्यावेळेस. आकार आणि निराकार हे केवळ मानाजवळ आहेत.
आम्हाला देखील या कलियुगामध्ये असे संदेश आहेत की मनाची छाननी घ्या. मनाचा कस आहे, परंतू सत्, द्वापार, त्रेतायुगासारखा कस नाही. मनाने तो किती ठाम आहे, हाच कस आहे. कोणीही तुमच्यापैकी असा सेवेकरी आहे का की जो हे सांगू शकेल की बाबा आमचा कस घेऊन मोकळे झाले. परंतु जो जाणकार आहे तो यातले मर्म जाणतो. म्हनून म्हटले आहे, जागेल तो जगेल, सावध तो सुखी.
सद्गुरू तत्वच असे आहे, त्याचा थांग कोणालाही लागणार नाही. सेवेक-याने हे मनोमन ठरविले पाहिजे की मला यातले मर्म जाणायचे आहे. मला पुढचा मार्ग शोधावयाचा आहे. ज्यांचा मी सेवेकरी आहे, ज्यांच्या चरणावर मी लीन आहे ते कोण आहेत, तर त्रिगुणांच्या कारभारावर देखरेख आहे, पण ते माझ्या ठिकाणी कसे वास करीत आहेत हे मला जाणले पाहिजे. रामदास स्वामिनी मनाच्या श्लोकात काय सांगितले आहे,
मना सज्जना भक्ती पंथेची जावे !
Mayur Tondwalkar
No comments:
Post a Comment