Saturday, October 20, 2018

एकाचा अंत घेणे येणे नाम एकांत

👏👏👏

*एकाचा अंत घेणे येणे नाम एकांत*
एकाचा म्हणजे कुणाचा?
तर तो एक म्हणजे अनंत, तो एक म्हणजे अपुली श्री सद्गुरू माऊली, तो एक म्हणजे साक्षात ॐ कार.
हे शक्य आहे कां?
म्हटले तर होय, म्हटले तर नाही.
हे शक्य कोणाला आहे? तर जो भक्त त्या अपुल्या सद्गुरू माऊलींशी तन, मन आणि धनाने तादात्म्य पावला आहे त्यालाच. तसेच त्या सद्गुरू माऊलींची इच्छा असल्यास, तरच हे त्या भक्ताला ते शक्य होते, अन्यथा नाही.
*द्वैत आणि अद्वैत काय आहे?*
अशुद्धत्वता आणि शुद्धत्वता. बाबा म्हणतात, *मन शुद्ध तेथे अद्वैत आहे आणि जेथे मन अशुद्ध तेथे द्वैत आहे.*

*संसार करून परमार्थ साधणे* हाच बाबांच्या मते अद्वैत सिद्धांत होय व तोच श्रेष्ठ होय.

पुढे बाबा म्हणतात, *अद्वैत सिद्धांत हा निराकारी आहे.* *सत् हे आकार रहीत असते.*

*आकारी जे आहे, ते द्वैत आहे आणि ह्याला कारण माया आहे.*

बाबा पुढे म्हणतात, *तमोगुण म्हणजे तामस गुण म्हणजेच अंधार होय.* येथे विचार सापडत नाही, तर येथे अविचारच सापडतो. येथे प्रकाश सापडणार नाही.

*त्रिगुणी माया काय आहे?*
रज, तम आणि सत्व गुण जेथे एकत्र येतात, तेथेच ही त्रिगुण नटलेली माया साकारताना दिसून येते. हे त्रिगुण म्हणजेच ब्रह्मा, विष्णू आणि महेश. म्हणूनच म्हटले आहे, ही त्रिगुणात्मक आहे. अर्थात त्रिगुण नसतील तर संसार होणार नाही ह्याची बाबा पुढे आपणास आठवण करून देतात.

*बाबा श्रीमान कुणाला म्हणतात?*
सताचा जो सेवेकरी तो बाबांच्या मते खरा श्रीमान. फक्त धनवान किंवा सावकार तो श्रीमान नव्हे. दूस-यांचे हित करणारा तो बाबांच्या मते श्रीमंत.

म्हणूनच पुढे बाबा म्हणतात, *अद्वैत भक्ती ही श्रीमान आहे.*

बाबा पुढे आठवण करून देताना म्हणतात, *हा दरबार सताचा दरबार आहे आणि तो ज्ञानासाठी मुक्त आहे.* *हे ज्ञानाचे आगर आहे.* आणि हे पुढील काळात बाबांनी वेगवेगळ्या विषयांवरील प्रवचने करून दाखवून दिले आहे.

ह्या दरबारात अनेक प्रकारची कर्तव्ये बाबांनी केलेली आहेत. त्यात ज्ञानोपासना करण्यापासून ते शुद्धीकरणे - वेगवेगळ्या पातळींची, स्थुल, सूक्ष्म, कारण, महाकारण देहाची आणि त्या पलिकडची सुद्धा केलेली आहेत. सव्वीस अवतारांचे गुपितही ह्या कलियुगी स्थितीत उघड करून सांगितले आहे. सद्गुरूंचा महिमा पदोपदी उलगडवून सांगितला आहे, त्याशिवाय दाखवूनही दिलेला आहे. तो अगाध कसा आहे हे सोदाहरण दाखवून दिलेला आहे. अखंड चमत्कार काय व कसे असतात, तर त्यांच्यासमोर भुरटे चमत्कार कसे खुजे असतात हे ही भक्तगणांना येथेच या दरबारात दाखविलेले आहेत. किती किती म्हणून कर्तव्ये श्री सद्गुरू माऊलीने आपल्या या अवतारकार्यात या दरबारात प्रत्यक्षात घडवून घेतली होती, ती अवर्णनीयच होत.

शेवटी बाबा म्हणतात, *ज्याठिकाणी सत् आहे, तेथे शांती व स्थिरता आहे.* *याच भूमीवर पूर्वी सत् पदाचे स्थान होते.*

👏🙏👏🙏👏🙏👏🙏👏🙏

No comments:

अनगडवाणी