Tuesday, December 25, 2018

अनाथांच्या नाथा.....

*ॐकार स्वरूपा सद्गुरु समर्था ।*
*अनाथांच्या नाथा तुज नमो ।।*
*गुरूराज स्वामी असे स्वयंप्रकाश।*
*ज्या पुढे उदास चंद्र, रवी ॥*

एकनाथ महाराजांच्या ह्या अभंगात ते म्हणतात,"ॐकारा ! आपणच सद्गुरू आहात, आपणच समर्थ आहात. सद्गुरु माऊली आपणच अनाथांचे नाथ आहात. ज्याचा कुणी वाली नाही, त्यांचेही तुम्ही नाथ आहात."

सता! आपणच तारक आहात. पूर्णात पूर्ण असणारे तत्व देखील आपणच आहात. भक्ताला अनुग्रहीत करून, तसेच सद्गुरूंची गती देऊन पूर्णात पूर्ण पदाला पोहचविणारे ॐकार स्वरूप म्हणजेच ॐकार बीज, जे वेदांचे बा देखील आहेत,ते सुद्धा आपणच आहात.

बाबा विचारणा करतात,"पंचमहाभूतांचा अंत कुणी घेतला आहे कां? पृथ्वीचा अंत घेतला आहेत कां? पाण्याचा अंत कोणी घेतला आहे कां?" 

पाणी पण निराकारी आहे. तेज म्हणजे प्रकाश आणि वारा स्पर्शज्ञानाने कळतो. तो दिसत नाही. वायु नसेल तर आपण जीवंत राहू शकणार नाही. 

बाबा पुढे विश्वाच्या निर्मिती मागील रहस्य उघड करताना म्हणतात,

*_वायु म्हणजेच प्रणव. धुंधुंकारातून प्रणव प्रसवला. प्रणव म्हणजे अक्षरे. ती ऐकता येतात. पण पाहता येतात कां? ते आकलन करता येत नाही._* 

बाबा म्हणतात,"आपल्याला ॐकार स्वरूप पाहता आले पाहिजे." ऋग्वेद, यजुर्वेद, सामवेद, अथर्ववेद हे चार वेद असून पाचवा वेद प्रणव. पंचमहाभूते निराकारी आहेत. 

बाबा विचारतात, "ॐ कार कसा आहे? तर आठ प्रकृतीने नटलेला ॐ आहे. (ह्या आठ प्रकृती कोणत्या? पंचमहाभूतें (पृथ्वी, आप, तेज, वायू व आकाश) आणि अहंकार, बुद्धी आणि चित्त (अव्यक्त परा प्रकृती) ह्या सर्व मूळ प्रकृती मिळून अष्टदा प्रकृती होतात असे भगवद् गीता सांगते.)

पुढे बाबा म्हणतात,"समर्थांना आकार नाही. समर्थ कसे आहेत, तर निराकारी. परंतु तुमच्या कोडकौतुकासाठी ते आकार घेतात. स्वतः समर्थांनी आपल्याला आपल्यात सामाऊन घेतले आहे. *प्रगट दृष्य तर अप्रगट अदृष्य.* 

एकाने उत्पत्ती करायची, एकाने स्थितीप्रत ठेवायचे, एकाने लय करायचे, ही कर्तव्ये कोण करीत असते? तर ब्रह्मा, विष्णू व महेश म्हणजेच त्रिगुण.

समर्थ म्हणतात, "भक्ताला मला पहाता येते पण पहाणारा पाहिजे." सर्व व्यापक सद्गुरु आहेत आणि व्यापूनही अलिप्त देखील आहेत. अलख निर्गुण निराकार पद आहे. ॐकार स्वरूप गुरूराज स्वामी आहेत. त्या प्रकाशापूढे चंद्र, सूर्य फिके पडतात, तोच स्वयम् प्रकाश. 

*वेद म्हणजे प्रणव.* *ॐकार ध्वनी सुद्धा शांत होतो.* 

जाणीव ठेवून जर एखादा भक्त दर्शन घ्यावयास गेला तर त्याला दर्शन होणार नाही. ह्यासाठी जाणीव रहित सत् चरणांत तादात्म्य होणे गरजेचे आहे आणि ज्यावेळेस अशी स्थिती होते, त्याचवेळेस त्या भक्ताला सत् चित् आनंद मिळतो. तो मिळाल्यावर तो भक्त आनंदिमय होतो व अशावेळेस त्यांचे तेज लोप पावणारे नसते.

कृपादृष्टी होणे म्हणजे अमृत दृष्टीने भगवंताने भक्तावर कृपा करणे होय. ते प्रगट कसे होणार? तर हिच गुरुकिल्ली आहे. 

एकनाथ महाराज सद्गुरू माऊलींना प्रभूराज म्हणतात. बाबा पुढे म्हणतात, "आपण सत्य काय आहे ते पहा, मायेला फसू नका."

*ज्ञानबीज म्हणजे अखंड नाम* आणि *भूमी म्हणजे भक्त.* जोपर्यंत भक्ताची भूमी शुध्द होत नाही तोपर्यंत ते ज्ञानबीज सद्गुरू माऊलींकडून भक्ताच्या भूमीवर पेरले जाणार नाही. म्हणजेच ते *नाम* तुम्हाला सद्गुरू माऊलींकडून मिळणार नाही आणि नाम न मिळाल्याने तुमचा उद्धार होणे कठीण होते. 

*उद्धार होणे म्हणजे काय?* तर उद्धार होणे म्हणजे भक्ताला सद्गुरूंकडून नामाची प्राप्ती होणे व ती झाल्यावर अखंडितपणे आपण ते न विसरता घेत राहणे होय. अशाप्रकारे आपण सद्गुरू चरणांवर लिन झाले असता, आणखी उद्धार तो कोणता? त्यामुळे आपणाला श्री सद्गुरू माऊलींचे सतत सान्निध्य मिळते, वेळोवेळी सेवा करण्याची संधी मिळते, सत् कार्य करण्याची द्वारे आपोआप सद्गुरू माऊली आपणासाठी खुली करून देतात. अशाने एकप्रकारे आपला उद्धारच होत असतो.

🙏💐👏🙏💐👏🙏💐👏🙏

No comments:

अनगडवाणी