*अमृतवाणी*
आपले बाबा आजच्या प्रवचनातून आपणा सर्वस्वांना सांगताना म्हणतात, *"आपले मन शंकाकुल होऊ देऊ नका. सत् तुमच्या जवळच आहे अन् त्यांचे लक्ष तुमच्यावर आहेच आहे. पण मात्र, आपल्या श्रध्देला तडा जाऊ देऊ नका."*
पुढे श्री सद्गुरू माऊली म्हणतात, *तुम्ही कोठेही असलात, लाखो मैल जरी दूर असलात तरी तुमचे सद्गुरु तुमच्या जवळच आहेत.*
या संदर्भातील एक गोष्ट आठवली, ती आपणा सर्वस्वां सोबत वाटाविशी वाटली म्हणून येथे देत आहे.
आपल्या परम् पूज्य श्री सद्गुरू माऊलींचे महानिर्वाण झाल्यानंतरची ही गोष्ट आहे. माऊलींच्या पश्चात त्यांचा हा वारसा पुढे चालू कसा ठेवायचा याची भ्रांत सगळ्यांना पडली होती. त्यावर उपाय म्हणून त्यांच्याच नामाभिधानाचा ट्रस्ट स्थापन करण्याचे सर्वांनुमते ठरले. प्रश्न उपस्थित झाला, तो म्हणजे, यावर विश्वस्त कोणाकोणाला नेमायचे आणि कुणी नेमायचे? शेवटी बाबांचे एकचित्तात संदेश घेण्याचे ठरले. परम् पूज्य श्री सद्गुरू माऊलीने पितामहांवर हे कर्तव्य सोपविले. झाले. एक एक नावे पितामहांसमोर वाचून दाखविण्यात येऊ लागली व त्यावर सखोलतेने विचारणा करून पाच नावांना मान्यता देण्यात आली. त्यातील एक नाव होते - गोपाळराव नवांगुळ यांचे.
(गोपाळराव "दादा" नवांगुळ हे पूर्वाश्रमीचे *"महामुनी अरूणी"* होत. त्यांच्या बाबतची इतिहासात हकीगत अशी सांगितली जाते की त्यांच्या त्यावेळच्या सद्गुरूनी ज्यावेळेस शेतामध्ये बांध घालण्यास पाठविले होते, त्यावेळी धुवांधार पावसामुळे बांध टिकत नव्हता, तेव्हा ह्यांनी सद्गुरूंचा शब्द सिद्ध करण्यासाठी स्वतःला बांधाच्या ठिकाणी आडवे पाडून बांध निर्माण केला होता आणि अशा या भक्ताला सव्वीसाव्या अवतार कार्यात सताने आपल्या सान्निध्यात घेतले होते.)
विशेष उल्लेखनीय बाब म्हणजे ज्यांना आम्ही "दादा" म्हणत असू हे त्यावेळेस पुण्यात स्थायिक झालेले होते आणि त्यामुळे आपल्यापैकी काहीजणांनी शंका-कुशंका निर्माण करत, अशी शंका उपस्थित केली होती की, नवांगुळ हे पुण्यात राहतात, मग त्यांचे नाव विश्वस्त म्हणून कसे? ते कर्तव्याचे वेळेस येथे कसे हजर राहू शकतील?
यावर आपल्या परम् पूज्य श्री सद्गुरू माऊलीने जे स्पष्टीकरण दिले होते ते खरोखरीच उद्बोधक ठरावे. बाबा त्यावेळेस म्हणाले होते, *नवांगुळच काय, माझा कोणताही सेवेकरी मग ते पुणेच काय, तर जगाच्या कोणत्याही कानाकोप-यात का असेना, तो माझ्याप्रत, माझ्या सताप्रत मनोभावे, मनःपूर्वक जर का असेल, तर त्याला सोडून मी नाही, आणि माझे सतही नाही.*
यावरून एक गोष्ट आपल्या लक्षात यावयास हवी, ती म्हणजे *जो निस्सीम भक्त आहे, तो मग जगाच्या पाठीवर कोठे कां असेना, त्याला सोडून सत् कधीच असणार नाही.*
म्हणूनच आपण श्रध्देला तडा जाऊ द्यायचा नाही. मनात जरी शंका आली तरी श्रध्देला तडा जाईल आणि आपण ते कदापिही होऊ द्यावयाचे नाही. सर्वस्व त्यांच्यावर सोडून आपण आपल्या *नामात* राहावयाचे.
प्रत्येक सेवेक-यांनी ही खात्री बाळगा की आपले सद्गुरु आपल्या जवळच आहेत. ते मला सोडून क्षणभर देखील राहणार नाहीत. म्हणूनच पुढे आपले बाबा म्हणतात, *तुमचा जो आत्मा आहे, तेच सद्गुरु! येथे *आत्मा* म्हणजे *आपल्यात असणारी ती मा, म्हणजेच ज्योत, म्हणजेच आपले सद्गुरू, म्हणजेच अनंत !!*
माऊली पुढे विचारणा करते, *"तोच त्यांचा अंश तुम्हाला सोडून आहे का एक क्षण तरी?"*
मग सेवेक-याने मनाशी अशी ठेवण ठेवता कामा नये कि बाबा माझ्याशी बोललेच नाहीत. कोणी काहीही बोलो, कोणी काही सांगो, बाकीच्यांच्या मनाशी उपलब्धता ठेवायची नाही.
आपले मन एकाच ठिकाणी सत् चरणांवर स्थिर ठेवले पाहिजे. कोणी वंदो, कोणी निंदो, काहीही होवो, आपल्याला त्याच्याशी कर्तव्य नाही. निंदणारे निंदतील, वंदणारे वंदतील, भावीक भाविकतेने जातील परंतु त्या ज्योतीची श्रध्दा ठाम आहे ती सताशिवाय दूसरा काही विचार करणार नाही असे आपली माऊली आपणास समजावून सांगते आहे.
💐👏💐👏💐👏💐👏💐👏
No comments:
Post a Comment