*_नामातच सर्वस्व बहरलेले आहे._*
हो, हे जरी खरे असले, तरी ते नाम कुणाचे? ते तुमचे की आमचे? ह्याबाबत मात्र संभ्रम निर्माण होऊ नये हे तितकेच खरे. तर हे नाम, आपण आपल्या भगवंताचे, आपल्या सद्गुरुंचे, त्या जगत् नियंत्याचे म्हणजेच हनुमंताने म्हटल्याप्रमाणे त्या राघवाचे, त्या रामाचे घ्यावे.
*_नाम घेता मुखी राघवाचे_*
*_दास रामाचा हनुमंत नाचे_*
*_हो, दास रामाचा हनुमंत नाचे_*
बरे, ते कसे घ्यावे? तर त्या रामाच्या दासाने म्हटल्याप्रमाणे म्हणजेच हनुमंताने म्हटल्याप्रमाणे, *"दास रामाचा हनुमंत नाचे"*.
नाम घेता घेता आपण त्या नामात इतके तल्लीन व्हावयास हवे, इतके त्यात गुंतून जावयास हवे की आपणांस सर्वस्वाचा विसर पडावयास हवा. आजूबाजूच्या कसल्याच गोष्टींचे स्मरण व्हावयास नको. त्या नामात आपण दंग व्हावयास हवे. आपण त्या नामात दंग होऊन, त्या रामभक्त हनुमंता सारखे एकलय होऊन नाचावयास हवे.
याचाच भावार्थ असा की आपण त्या *रामाचा दास* असलेल्या हनुमंता सारखे *_राममय_* व्हावयास हवे. असे ज्यावेळी आपण होऊ, त्याचवेळेस तो पांडुरंग आपणांस आपल्यात सामावून घेऊन आपल्याला दाखवून देईल की हे बघ, मी कसा तुझ्यातच सामावलेला आहे. हा बघ, पांडुरंग कसा शुभ्र पांढ-या रंगात रंगलेला आहे. पांढरा रंग हा सताचा रंग.
यावरून रामभक्त श्री हनुमानाचे ते चित्र आठवले, ज्यामध्ये हनुमंत आपली छाती आपल्या दोन्ही हातांनी फाडून दाखवित आहे व आतमध्ये श्री राम प्रगट होऊन दर्शन देताहेत.
येथे जी छाती फाडून दाखविण्यात आलेली आहे, ती तशी स्थिती नसून, त्यामधून सांकेतिकपणे हे दाखवून द्यावयाचे आहे की ज्यावेळेस एखादा भक्त त्या हनुमंतासारखा संपूर्णपणे राममय होईल, त्या रामनामात दंग होईल, त्यावेळेसच प्रभू राम त्या भक्तावर प्रसन्न होऊन, त्याला त्याच्या आंतरीक स्थितीत, हृदयस्थ स्थितीत, त्याच्या समाधी स्थितीत त्याला दर्शन देतील.
*_अनगड म्हणे हे रामा_*
*_दर्शन मज द्यावे हे मनोरमा_*
*_रुप तुझे मज हृदयी पाहूनी_*
*_तृप्तता येऊ दे माझ्या मनोमनी_*
*_दंग होऊनी जाऊ दे हे सीतारामा सकळा_*
*_तुझ्याच नामाचा लागू दे मजला अवघाची लळा_*
*_हृदयस्थ कोरून ठेवू दे मजला तुझीच मूर्ती_*
*_जन मनात वाढू दे अशीच तुझी दिगंत कीर्ती_*
*_दास रामाचा हनुमंत जसा नाचे_*
*_अनगड अपुल्या मुखी तुझेच नाम वाचे_*
*_तुझेच नाम वाचे, तुझेच नाम वाचे_*
No comments:
Post a Comment