Sunday, October 6, 2019

नावात काय आहे?

अनगड आणि आनंद. या दोहोंचा संधी होताच "अडगडानंद" होतो. तसाच संगम भक्त आणि भगवंताचा, भगवंताच्या नामानेच होतो. भक्त जेव्हा "नामस्मरणात दंग होऊन जातो, एकलय होऊन जातो", त्याचवेळेस भगवान त्या भक्ताला आपल्या जवळ घेतात आणि आपले दर्शन देतात आणि म्हणतात, "बाळा, बघ ! मी कसा ह्या त्रिभूवनात भरून राहिलो आहे ! बघ, मी ह्या त्रिभूवनात भरून राहिलेला असून देखील अलिप्त सुद्धा आहे."

अवघा आनंदीआनंद जहाला की अनगड काय किंवा अनगडानंद काय? एकूण सगळे सारखेच की. सारेची त्या माऊली पुढे नतमस्तकच असतात. 

अनंताचा तो "आ" आणि नंदाचाही "आ" च. म्हणजेच अनंत येणे "निराकार" आणि नंद म्हणजे "आकार", येणे नाम सगुण आणि निर्गुण. ज्यावेळेस "निराकार" "आकार" घेतात, त्याचवेळेस ते मानवी त-हेने अपुल्या चर्मचक्षूंना दिसून येत असतात. अन्यथा आपण त्यांना फक्त "नामस्मरणाच्या" गतीने गेल्यासच समाधी अंगाने पाहू शकू.

ज्या ज्या वेळी भूतलावर भगवंताची आवश्यकता असते, त्या त्या वेळी "निर्गुण" हे अवतारकार्य धारण करून म्हणजेच अवतार घेऊन पृथ्वीतलावर अवतीर्ण होत असतात. याचाच अर्थ असा की "निर्गुण" "सगुण" रुपाने अवतरीत होऊन मानवी त-हेने अपुला कार्यभार सांभाळीत असतात, परंतु आपली जाण मात्र कुणालाच देत नाहीत.

ह्या दोघांचाही जेव्हा कृपाशीर्वाद मिळतो, तोची आनंदाने प्रगट होतो, तेथे मग द्वैत भावना न राहता अवघा आनंदीआनंद भाव तेवढा उरतो. 

शेवटी मानवी त-हेने कोणीतरी म्हटलेले आहेच की नावांत काय आहे? नांव महत्त्वाचे नसून, एखाद्याचे काम अर्थात कार्य महत्त्वाचे असते. कर्तव्य महत्त्वाचे असते.

संतांनी तर त्याहीपुढे जाऊन सांगितले आहे की "ते नाम सोपे रे"....... म्हणून मानवी नावाला महत्त्व न देता आपण अज्ञ बालकांनी आपल्या सद्गुरू नामावर भर देऊन, त्यांचे नामस्मरण करने हितकारक ठरावे.

अनगडाला आनंद झाला, म्हणूनी तोची अनगडानंद जहाला. बाकी मानवी त-हेने बघितले तर नावांत काय आहे? 

याउलट अध्यात्म्याच्या दृष्टीने पाहता, नामातच सगळे भरलेले असून, आपल्या भगवंताच्या चरणांप्रत पोहचण्यासाठी नामस्मरण करने अत्यंत आवश्यक आणि गरजेचे देखील आहे.

अनगड म्हणे,  
         "हे देवा, काय करू मी तूझीच सेवा
                   नित्य निरंतर मजला अपुल्या जवळ ठेवा
          "अपुला कधी विसर न होऊ द्यावा
                    हीच विनवणी करीतो मी देवा 
                    (आपुलिया चरणी) !!!

No comments:

अनगडवाणी