Sunday, September 8, 2019

प. पू. सद्गुरु स्वामी भगवान महाराज यांची अमृतवाणी

*वेदा पडीले मौन शास्त्रे वेडावली |*
*वाचाही निमाली ते श्रीगुरु ||*

         एकनाथ महाराजांनी आपल्या सद्गुरूंवर हा अभंग रचलेला आहे. एकनाथ महाराजांचे सद्गुरु जनार्दन स्वामी हे होते. जनार्दन स्वामींनी एकनाथ महाराजांना अनुग्रहीत केले होते. एकनाथ महाराजांनी जनार्दन स्वामींचे सर्वस्व महत्व जाणले होते. त्यांची महती एकनाथ महाराजांनी गाताना, त्या महतीमध्ये त्यांनी सांगितले आहे, 

*वेदा पडीले मौन, शास्त्रे वेडावली*
*वाचाही निमाली, ते श्रीगुरु*

एकनाथ महाराज म्हणतात, "त्या माझ्या सद्गुरूंची महती काय वर्णावी? त्यांची महती गाता गाता *वेद देखील मौनावले, अन् वाचा देखील निमाली. अर्थात वाचा देखील बंद पडली. इतकेच नव्हे, तर जी कांही शास्त्रें आहेत, ती सुद्धा, त्यांची महती गाता गाता, गुणगान गाता गाता वेडावली*, असे ते माझे सद्गुरू आहेत. अशा जाणीवेने जेव्हा एखादा भक्त आपल्या सद्गुरूंचे नामस्मरण करतो, त्यावेळेसच ते सद्गुरु प्रगट होतात, असे आपले बाबा आपल्याला सांगताहेत.

श्री सद्गुरू माऊली पुढे म्हणते, *वेद म्हणजे ध्वनी, येणे नाम!* ते देखिल लहरीत लयबद्ध होऊन जातात. मन देखील लहरीत लयबद्ध होऊन जाते. अशावेळेस तेथे शास्त्र तरी काय करणार?* 

शास्त्र या ठिकाणी टिकूच शकत नाही. *अखंड नाम देखील त्याठिकाणी लय होऊन जाते.* तेथे काहीच शिल्लक रहात नाही. शास्त्रांना त्या सद्गुरूंचा अंतच लागणार नाही आणि म्हणूनच आपले बाबा आपल्याला सांगतात, *हे सर्वस्व जाणण्याचा पलीकडे आहे. म्हणजेच जाणीवेच्या पलिकडचे आहे.*

ज्यावेळेस आपण आपल्या सद्गुरू माऊलींचे नामस्मरण करता करता आपले देहभान विसरू व त्यांच्यांच नामात तल्लिन होऊ, त्यांच्या स्मरणात रममाण होऊ, त्यांची छबी आपल्या मनात पाहू, त्याचवेळेस आपण ख-या अर्थाने त्यांच्याशी एकरुप होऊन, बाबा म्हणतात त्याप्रमाणे, जाणीवेच्या पलीकडे जाऊन त्या सताशी तादाम्य होऊ शकू. अशी स्थिती झाली असता, काय उरते? तर फक्त पंचमहाभूतांचा देह. *अशा व्यक्तीला ना कशाची जाण असते, ना कशाचे भान असते.* ही एक समाधी स्थिती असते. त्या आनंद ब्रह्मांत ती ज्योत लय झालेली असते.

ऋग्वेदात स्पष्ट म्हटले आहे की *सताचा कोणी अंत लाऊ शकत नाही.* मग तिथे शास्त्रांचा काय पाड लागणारआहे?

बाबा आपणांस समजावून सांगताना म्हणतात, "शास्त्रे वेडावली म्हणजे शास्त्रांना पुढे जाता आले नाही. त्यांना संताचा अंत घेता आला नाही."

श्री सद्गुरू माऊली पुढे *गुह्य उघड करतांना* म्हणते, *अखंड नामाच्या (सतपदाच्या आसनावरून साक्षात सताने दिलेले नाम - फक्त तेच गुरू गुह्य आहे, इतर सताच्या ठिकाणी काहीही गुह्य नव्हते आणि नाही) गतीत गुंग होऊन गेल्यानंतर, जो बाहेर पडणारा प्रणव आहे, बोल आहे तो म्हणजे ॐकार ध्वनी होय.* 

अशाप्रकारे नामस्मरण करत करत जेव्हा भक्त किंवा सेवेकरी जाणीवेच्या, नेणीवेच्या पलीकडे जातो, त्यावेळेस बाबा म्हणतात, नामाची स्थिती बंद होत जाते. त्या भक्ताची स्थिती कशी होते? तर जाणीव रहित स्थिती होते. जाणीव अजिबात रहात नाही. आणि मग अशावेळेस स्वयंम् गुरुतत्व प्रगट होते, अर्थात जो भक्त ज्या सद्गुरूंचे ध्यान करणार तेच सद्गुरु त्याच स्वरुपात प्रगट होतात. अर्थात त्या भक्ताला आपल्या सद्गुरूंचे दर्शन होते. ह्या स्थितीला भक्तीमध्ये मुक्ती आणि मोक्ष म्हटलेले आहे. मुक्ती आणि मोक्ष इतर दुसरा तिसरा नसून, हाच मुक्ती आणि मोक्ष होय.
(1) क्रमश:

No comments:

अनगडवाणी