*प. पू. सद्गुरु स्वामी भगवान महाराज यांची*
*अमृतवाणी*
*गुरुराज स्वामी आता स्वप्रकाश |*
*जयापूढे उदास चंद्र रवी ||*
(भाग दूसरा)
बाबा म्हणतात, "काही ज्योती त्याला प्रकाश हवा म्हणून, ते सताचे ध्यान करीत नाहीत, तर त्याला जीवाची भिती वाटते म्हणून ध्यान करतात."
बाबा असे कां बरे म्हणत असतील?
आता आपण प्रकाश येणे कोणती स्थिती आणि ध्यान येणे कोणती स्थिती? ह्याबद्दल समजून घेऊ. बाबांना अभिप्रेत असलेला प्रकाश म्हणजे *सताचा शुभ्र प्रकाश.* प्रकाश निरनिराळ्या प्रकारचा असतो. तो लाल येणे ताम्र वर्णी असतो, पित वर्णी देखील असू शकतो, तसाच तो नील वर्णी देखील असू शकतो.
ध्यान येणे डोळे बंद करून अथवा उघडे ठेवून केलेले आपल्या सद्गुरूंचे अथवा भगवंताचे स्मरण होय. या स्मरणात आपण त्यांची छबी अथवा रुप पाहण्याचा प्रयत्न करीत असतो, त्याचबरोबर त्यांचे नामस्मरण देखील करीत असतो.
आता बाबांनी म्हटल्याप्रमाणे, "काही ज्योती त्यांना प्रकाश हवा म्हणून ध्यान करीत नाहीत, तर ध्यान कशासाठी करतात? आपले काही बरे वाईट होऊ नये या भीतीपोटी
भगवंताचे ध्यान करतात."
येथे प्रश्न पडतो की असे ध्यान कशासाठी करावे? ध्यान भीतीपोटी करावे काय?
आपले काही बरे वाईट होऊ नये असे जर आपणास वाटत असेल, तर त्यासाठी आपण आपल्या वर्तणुकीत सुधारणा केली पाहिजे. आपले वर्तन, सद्वर्तनी ठेवावयास हवे. सदाचारी रहावयास हवे. आपल्या श्री सद्गुरू माऊलींच्या चार तत्त्वांनुसार वागावयास हवे. अशाप्रकारे आपण आपली स्थिती केली, तर ध्यानात मन रमून, आपल्या प्रकाशाची गतीही वाढीस लागून, आपल्याला आपल्या सताच्या दर्शनाचा लाभ होऊ शकेल आणि म्हणूनच आपले बाबा आपल्याला सांगताहेत, "भीतीपोटी ध्यानधारणा करु नका, तर *ध्यानधारणा भगवंताला पाहण्यासाठी करा.*
पुढे बाबा म्हणतात, "हे सर्व करण्यापेक्षा (म्हणजे भीतीपोटी ध्यान करण्यापेक्षा) आपण असे म्हटले पाहिजे, *" अनंता ! ही आपलीच कृपा आहे. आपल्या चरणांचा आम्हाला ठाव द्या, म्हणजेच स्वप्रकाश द्या, म्हणजे स्वप्रकाशाने मला पूढची वाटचाल करता येईल", मला आपल्या चरणांच्या दर्शनाचा लाभ घेता येईल.*
"हे सता !" "स्वप्रकाश नसेल तर मला कुठेही जाता येणार नाही. त्रिगुणांच्या प्रकाशाच्या अनुषंगाने गेलो तर मला ते अजून मायेत गुरफटवतील."
बाबा पुढे सांगतात, *लक्षात ठेवा, गरीबी परवडली पण अमीरी नको.*
म्हणूनच आपले बाबा म्हणतात, आपण काय म्हटले पाहिजे, *"सता !" आम्हाला काय पाहिजे तर केवळ तुमचे चरण!"*
स्वप्रकाशाची मागणी या करीता आहे. ही मागणी तुम्ही मागितली अन् त्यांनी तुम्हाला दिली तर तुमच्यासारखा भाग्यवान दुसरा कोणीही नाही. अन् अशा गतीने प्रत्येक भक्त जाऊ लागला तर, एकनाथांनी सांगितले ते योग्यच आहे.
श्री सद्गुरू माऊली म्हणते, *"सर्व संतमंडळी या गुरुकुलातल्याच ज्योती होत. स्थुल सुटल्यानंतर त्यांना परत गुरुकुलातच सामावून घेतले जाते. सत त्यांना ज्या ज्यावेळी आवश्यकता असेल, त्या त्यावेळी कर्तव्यासाठी आदेश देऊन पाठवितात. हे अनुभवसिद्ध आहे म्हणूनच एकनाथांनी अनुभवसिद्ध मागणी केली. मागितले काय? तर फक्त *स्वप्रकाश!"*
आपण पहातो लोक वेगवेगळे उपास तापास करीत असतात. शरीराला झीजवत असतात. पण लक्षात ठेवा ! *शरीर हे आत्म्याचे मंदिर आहे. हे शरीररूपी मंदिर आत असणा-या *मा* चे म्हणजेच *आत्म्याचे* मंदिर
समजून ठेवल्यानंतरच, आतमध्ये मन स्थिर राहील.*
(13) क्रमश:
No comments:
Post a Comment