Friday, November 22, 2019

कोहम्-भाग दोन

🙏🙏🙏

*प.पू.श्री सद्गुरू स्वामी भगवान महाराज परिवार*

*कोहम्! मी कोण आहे?*

*तसे पाहिले तर मी कोणीही नाही. मी एक पंचमहाभूतांचा पुतळा होय.*

(*पंचमहाभूते म्हणजे काय?*
*पंचमहाभूतें म्हणजे आप (पाणी अथवा जल), तेज (अग्नी), वायु, आकाश आणि पृथ्वी ही पांच तत्वें होत.* या पांच तत्वांनी सजीव सृष्टी निर्माण झाली असे म्हणतात.

तसेच सांख्यदर्शन शास्त्रानुसार सर्व भौतिक जग (दृश्य विश्व), सजीव व निर्जीव पदार्थ, आपले शरीर हे पाच मूळ तत्त्वांपासून (द्रव्यांपासून) तयार झाले आहे असे मानले जाते. या पाच तत्त्वांना पंचमहाभूते असे म्हणतात.)

जर मी कोणीही नाही, पंचमहाभूतांचा एक पुतळा आहे, मग मी, "मी मी" असे कां बरे म्हणत असतो? मीपणा माझ्या मध्ये कां बरे येत असतो? कां बरे मी माझ्यातील परमात्म्याला विसरतो?

कुणी विचारतील, बरे, आता हा परमात्मा कोण? तो कुठे असतो? तो कोठे वास करतो? तो कुठे राहतो?

*परम् + आत्मा* येणे नाम परमात्मा. ही दोन शब्दांची व्याकरणातील संधी होय.

*प्रथम *आत्मा* म्हणजे काय? हे समजून घेऊ. 

आपल्या आत असणारी *मा* म्हणजे ज्योत, म्हणजेच त्या परमेशाचा अंश, ज्यावेळी आईच्या गर्भात हा पंचमहाभूतांचा पुतळा आकार घेत असतो, त्यावेळी तीन-चार मासाच्या कालावधीनंतर किंवा अवधीनंतर, त्यामध्ये हा अंश कधीतरी प्रवेश करता होतो आणि तद्नंतरच त्या मातेच्या गर्भामध्ये हालचाल, चलन-वलन होण्यास सुरुवात होत असते. याचाच अर्थ असा की तो पंचमहाभूतांचा पुतळा, हा पुतळा न राहता, त्यात सजीवता येते. अन्यथा तो एक मांसाचा गोळाच बनून राहतो, ज्याला अचेतन किंवा निर्जीव देह म्हणतात, ज्यामध्ये हालचाल दिसून येत नाही. ह्याउलट सजीव म्हणजेच जीवा सहीत किंवा चेतन देह असून, त्यामध्ये हालचाल दिसून येते.

परम् ह्याचा अर्थ अंतिम, सर्वोत्कृष्ट, मुख्य, उच्च इत्यादी, म्हणजेच आपल्या आत वास करून असणारी मा, येणे आत्मा हा त्या अंतिमाशी, मुख्याशी, उच्चाशी एकलय होतो, एकजीव होतो त्यावेळेस तो *परमात्मा* ह्या नावाने ओळखला जातो.

म्हणून त्या परमात्म्याला आपण कधी विसरायचे नसते. आपण जर त्या परमात्म्याला विसरलो नाही तर तो ही आपल्याला विसरणार नाही आणि ही सर्वस्वाची जाण ठेवून जर आपण वागलो तर आपल्यामध्ये मी पणा कधीच येणार नाही आणि मी पणाच जर आपल्यात आला नाही, तर तुझे माझे होणार नाही आणि त्यामुळें आपणांस आपल्या भगवंताच्या जवळ जाण्याचा मार्ग मोकळा होईल. 

मी मी राहणारच नसल्याने तो भगवत भक्त परमेश्वरात एकलय होऊन जाईल. त्या परमात्म्याशी तादाम्य होईल. द्वैत भावना नाहीशी होऊन, तेथे अद्वैत भावना येईल. अशावेळेस *कोहम्* म्हणजेच मी कोण हा प्रश्नच उपस्थित होणार नाही.

अनगड म्हणे, *कोहम्* कोहम् न राहता, तो *ओहम्* ओहम् येणे *ओंकार*मय होईल.

ओंकार हा 'अ'कार,'उ'कार व 'म'कार अशा तीन वर्णांनी बनलेला आहे. हे तिन्ही वर्ण जो चांगल्या प्रकारे आकलन करतो तो ब्रह्मपदास पोचतो असा समज आहे.@विकीपिडीया...अनगड

हे वर्ण संपूर्ण ब्रम्हांडात विहार करून त्यांचा संयोग झाला. हा संयोग म्हणजेच ओम् कार होय. या सृष्टीचे पालक ब्रह्मा, विष्णु व महेश हे अनुक्रमे अ ,उ आणि म् यांचे प्रतिनिधित्व करतात.@विकीपिडीया...अनगड

👏💐👏💐👏💐👏💐👏💐👏

Thursday, November 21, 2019

कोहम्

*मी* 
*कोहम्?*
*मी कोण आहे?*
*कुणालाच माहीत नाही, मी कोण आहे?*
*कुठून आलो आणि कुठे जाणार?*
*हो, हो ! चुकलेच की माझे.* *असे म्हणावयास नको होते.*
*प्रत्येक मानवाला माहीत असते की आपला जन्म आईच्या गर्भातून झाला आहे आणि हे ही माहित असते की एके दिवशी हे नश्वर जग सोडून आपल्याला पैलतीरी जावयाचे आहे.*
*हो !* *पण हा पैलतीर कोणता?*
*हा पैलतीर म्हणजे नदीचा पलिकडील काठ की काय?*
*येड गांवहून पेड गांवला चाललात की हो राव !*
*अहो, हा तो पैलतीर नव्हे.*
*तर, आपल्याला गाठावयाचा आहे तो पैलतीर म्हणजे त्या भगवंताचे चरण !*
*कुणीतरी म्हणेल, स्वर्ग, तर कुणी म्हणेल, कैलास*
*येथे ही पुन्हा दोन तट, दोन दिशा*
*कुणी असे विष्णूंचे भक्त, तर कुणी शिवाचे भक्त.*
*येथे ही पुन्हा "मी"पणाच* 
*मग सांगा, पैलतीर कोणता बरे?*
*तर आपल्याला गाठावयाचा आहे तो पैलतीर म्हणजे अपुल्या भगवंताचे चरण.*
*चरणातच सगळे सामावलेले आहे आणि ते चरण आहेत अपुल्या सद्गुरुंचे. आपले सद्गुरू म्हणजेच अपुले भगवंत.* 
*हे अपुल्या सद्गुरुंचे चरण म्हणजेच मुक्ती आणि मोक्ष होय.*
*म्हणूनच म्हटले आहे, ज्याला सद्गुरू सापडले, त्याला मुक्ती ही सापडली आणि मोक्षही सापडला.*
*ज्याला मुक्ती आणि मोक्ष सापडला, त्याला भय कसले? त्याला काय कमी आहे?*
*कारण ज्याचा सखा पांडुरंग, त्याला कशाची चिंता?*
*म्हणूनच म्हटले आहे, "ज्याचा सखा हरी, त्यावरी विश्र्व कृपा करी."*
*सारे विश्वच काय, तर साक्षात श्रीहरी देखील कृपा करी*
*आणि श्रीहरीची कृपा होणे म्हणजेच त्यांचे चरण आपणांसी मिळणे होय.*
*चरण मिळणे, म्हणजेच मुक्ती आणि मोक्ष प्राप्त होणे होय.* *म्हणजेच पैलतीर गाठणे होय.*
*पैलतीर गाठला असता, अशा भक्ताला काय उणे?*
*मग, लागणार ना पैलतीर गाठायच्या मार्गाला?*
*चला तर मग.*......*_अनगड_*

Friday, November 15, 2019

नामातच सर्वस्व बहरलेले आहे.

*_नामातच सर्वस्व बहरलेले आहे._* 

हो, हे जरी खरे असले, तरी ते नाम कुणाचे? ते तुमचे की आमचे? ह्याबाबत मात्र संभ्रम निर्माण होऊ नये हे तितकेच खरे. तर हे नाम, आपण आपल्या भगवंताचे, आपल्या सद्गुरुंचे, त्या जगत् नियंत्याचे म्हणजेच हनुमंताने म्हटल्याप्रमाणे त्या राघवाचे, त्या रामाचे घ्यावे.

*_नाम घेता मुखी राघवाचे_*
*_दास रामाचा हनुमंत नाचे_*
*_हो, दास रामाचा हनुमंत नाचे_*

बरे, ते कसे घ्यावे? तर त्या रामाच्या दासाने म्हटल्याप्रमाणे म्हणजेच हनुमंताने म्हटल्याप्रमाणे, *"दास रामाचा हनुमंत नाचे"*. 

नाम घेता घेता आपण त्या नामात इतके तल्लीन व्हावयास हवे, इतके त्यात गुंतून जावयास हवे की आपणांस सर्वस्वाचा विसर पडावयास हवा. आजूबाजूच्या कसल्याच गोष्टींचे स्मरण व्हावयास नको. त्या नामात आपण दंग व्हावयास हवे. आपण त्या नामात दंग होऊन, त्या रामभक्त हनुमंता सारखे एकलय होऊन नाचावयास हवे. 

याचाच भावार्थ असा की आपण त्या *रामाचा दास* असलेल्या हनुमंता सारखे *_राममय_* व्हावयास हवे. असे ज्यावेळी आपण होऊ, त्याचवेळेस तो पांडुरंग आपणांस आपल्यात सामावून घेऊन आपल्याला दाखवून देईल की हे बघ, मी कसा तुझ्यातच सामावलेला आहे. हा बघ, पांडुरंग कसा शुभ्र पांढ-या रंगात रंगलेला आहे. पांढरा रंग हा सताचा रंग.

यावरून रामभक्त श्री हनुमानाचे ते चित्र आठवले, ज्यामध्ये हनुमंत आपली छाती आपल्या दोन्ही हातांनी फाडून दाखवित आहे व आतमध्ये श्री राम प्रगट होऊन दर्शन देताहेत.

येथे जी छाती फाडून दाखविण्यात आलेली आहे, ती तशी स्थिती नसून, त्यामधून सांकेतिकपणे हे दाखवून द्यावयाचे आहे की ज्यावेळेस एखादा भक्त त्या हनुमंतासारखा संपूर्णपणे राममय होईल, त्या रामनामात दंग होईल, त्यावेळेसच प्रभू राम त्या भक्तावर प्रसन्न होऊन, त्याला त्याच्या आंतरीक स्थितीत, हृदयस्थ स्थितीत, त्याच्या समाधी स्थितीत त्याला दर्शन देतील.

*_अनगड म्हणे हे रामा_*
*_दर्शन मज द्यावे हे मनोरमा_*
*_रुप तुझे मज हृदयी पाहूनी_*
*_तृप्तता येऊ दे माझ्या मनोमनी_*
*_दंग होऊनी जाऊ दे हे सीतारामा सकळा_*
*_तुझ्याच नामाचा लागू दे मजला अवघाची लळा_*
*_हृदयस्थ कोरून ठेवू दे मजला तुझीच मूर्ती_*
*_जन मनात वाढू दे अशीच तुझी दिगंत कीर्ती_*
*_दास रामाचा हनुमंत जसा नाचे_*
*_अनगड अपुल्या मुखी तुझेच नाम वाचे_*
*_तुझेच नाम वाचे, तुझेच नाम वाचे_*

अनगडवाणी