बदलापूर - एक सेंट्रल रेल्वेवरील कर्जतच्या दिशेने असणारे सर्वसामान्य रेल्वे स्टेशन. हे ठाणे जिल्ह्यात असून ह्याचे सर्वसाधारण क्षेत्रफळ अंदाजे ३५.६८ स्के.मी. इतके आहे.
येथे आल्यावर पाहण्यासाठी जवळपास उपलब्ध असणारी ठिकाणे म्हणजे कोंडेश्वर मंदिर, मलंगगड, चिखलोली (अंबरनाथ) आणि बारवी धरण, माहुली शिखर, कोंडेश्वर तलाव, चंदेरी किल्ला, विस्परींग पिपल रिसाॅर्ट, धनगर धबधबा इत्यादी इत्यादी.
आम्ही येथे आलो कारण आमचे एक मित्र आणि सत्संग परिवारातील स्नेही चंद्रकांत येवले यांच्या आग्रहाखातर, जे गेल्या काही वर्षांपासून येथे वास्तव्यास आहेत.
येथे उतरल्यावर मुंबईच्या उपनगरीय स्टेशनांसारखेच हे छोटेखानी स्टेशन असून, बाजूलाच भलामोठा स्कायवाॅक बांधलेला दिसून येतो. ह्याचे नांव हेनरेपाडा फुट ओवरब्रीज असून, तो बाजूच्याच सर्वोदय नगर एरियाचा भाग आहे.
आमच्या यजमानांनी आमची चोख व्यवस्था अगोदरपासूनच करुन ठेवलेली होती. त्यामुळे जसे आम्ही स्टेशनवर उतरलो, त्यांनी आमचे आनंदाने स्वागत करुन पलीकडे उभ्या करून ठेवलेल्या इको ह्या मोठ्या टॅक्सीत नेऊन बसविले.
जाता जाताच यजमानांनी आम्हांस कल्पना दिलेली होती की आपणांस बदलापूरच्या एका प्रसिध्द वडेपाववाल्याकडे *मुळगांवचा वडापाव* जायचे आहे आणि तेथून पुढे मग डॅमवर (धरणावर) जावयाचे आहे.
दहा-पंधरा मिनिटांत आम्ही आमच्या संकेतस्थळावर पोहोचलो देखील. बाहेरच ब-याचशा गाड्या पार्क केलेल्या लांबूनच दिसून येत होत्या, त्यामुळे क्षणभर असे वाटून गेले की आपला नंबर लवकर काही लागणार नाही. परंतू घडले विपरीत. जसे आम्ही गाडीतून उतरून बाहेर पडलो, तेव्हाच कळले की आज म्हणावी तेवढी गर्दी नसल्याने, आम्हांला लवकरच एकत्र बसण्याची जागा उपलब्ध होणार आणि झालेही तसेच.
झाले. ताबडतोब आॅर्डर दिली गेली आणि कांहीं वेळातच गरमागरम मुळगांवचा फेमस वडापाव आमच्या टेबलांवर हजर झाला. प्रथमतःच कागदाच्या प्लेटवरील वडापाव पाहून मन समाधानी पावते न पावते तोच बाजूलाच प्लेटवर मिरचीच्या हिरव्यागार रंगाची ठेच्याची चटणी पाहून गर्भगळीत व्हावयास झाले. त्या ठेच्यातून हिरवट पिवळ्या रंगाचा तेलाचा पाट वाहताना पाहून वाटले, आता आपले काही खरे नाही.
परंतु, गंमत अशी की दृश्य जेवढे भयानक वाटत होते, तेवढे ते प्रत्यक्षात नव्हते. जरी हा हिरव्यागार मिरचीचा ठेचा होता, तरी तो आपल्या नावाला न जागणाराच होता आणि म्हणूनच की काय थोड्या वेळाने पाहतो तर ठेचा प्लेटवरून गायब झालेला होता आणि फक्त हिरवा पिवळा तेलाचा ओघळ तेवढा प्लेटवर शिल्लक राहिलेला होता.
अशाप्रकारे सकाळच्या नाश्त्यावर येथेच्छ ताव मारुन आमची पलटण पुढच्या प्रवासाला निघाली. झाले. थोड्याच वेळात आम्ही डॅमच्या एका कोपरावर आलो. दुर्दैव असे की धरण पाहण्यासाठी यावेळी रितसर परवानगी देण्यात आलेली नसल्याने सर्वचजण नाराज झालेले होते. कारण डॅमवर सैरसपाटा मारण्यास यावेळी मिळणार नसल्याने पुढील कार्यक्रमाचे आता काय करायचे अशा विचारात असतानाच, आमच्या सोबत आलेले, तेथीलच एक ग्रामस्थ श्री रवी यांनी एक उपाय सुचविला. म्हणाले, आपण धरणाच्या खालील भागात रस्त्याच्या बाजूला असलेल्या पुलाखाली जाऊया. थोडा वेळ पाण्यात पाय भिजवूया.
ठरले. आयडियाची कल्पना सगळ्यांनाच आवडली. खाली उतरण्यासाठी असलेला रस्ता शोधू लागलो आणि शिवाजी महाराजांचा काळ आठवला. किल्ल्यावर जाताना जसा एकपदरी दगडाधोंड्यांचा रस्ता असायचा, बाजूलाच खोल दरी असायची, तसा हा रस्ता भासला. रस्ता कसला? हि तर पायवाटच होती. होय नाय होय नाय करीतच आम्ही शेवटी खाली उतरण्यात यशस्वी झालोच.
येथे एक गोष्ट नमूद करावीशी वाटते ती म्हणजे आम्ही भेट दिलेली ही वेळ येथे येण्याची नक्कीच नव्हती. त्यामुळे येथे जे दृश्य दिसत होते ते म्हणजे सर्वत्र पसरलेला काळा कातळ. काही ठिकाणी निसर्गानेच निर्माण केलेले पाण्याचे डोह. काही खोल, तर काही उथळ. पुलावरून पाणी वाहून जाण्याचा तर प्रश्नच नव्हता. कारण हा काही पावसाळी हंगाम नव्हता, ज्यावेळेस पर्यटक मोठ्या प्रमाणावर येथे भेट देत असतात.
खाली उतरतानाच रवी भाऊंनी कल्पना दिलेली होती की जो दूरचा डोह आहे, तेथे मात्र कुणी जाऊ नका, कारण तो एक अॅक्सिडंट स्पाॅट आहे. तेथे जाणे म्हणजे जाणूनबुजून आपण अपघात अंगावर ओढून घेतल्यासारखे होईल. तेथे पावसाळ्यात हमखास अपघात घडून येत असतात. कारण पावसाळ्यात पाण्याच्या खोलीची कल्पना नव्याने येणाऱ्या पर्यटकांना येत नाही आणि त्यामुळें नाहकच अपघात घडून जीवावर बेतण्याचे प्रसंग सुद्धा उद्भवतात.
थोड्या गमंती जमती करून, मनोरंजनात्मक कार्यक्रम करून पोटात कावळे ओरडायला लागल्याने आम्ही तेथून काढता पाय घेतला. रवी भाऊंच्या घरी अगोदरच जेवणाची सोय करून ठेवण्यात आलेली असल्यामुळे सगळ्यांचे पाय आपसूकच तिकडे वळले. जेवणाचा बेत हा घरगुतीच असल्याने कित्येक दिवसांनी गावाकडचे घरगुती जेवण खावयास मिळणार असल्याने पाहुणे मंडळी खूप खुष होती. दोन्ही प्रकार - वेज, नाॅनवेज उपलब्ध होते. नाॅनवेजमध्ये गावठीचा बेत होता, तर वेजमध्ये वरण भात, उसळ, चुलीवरची ताजी ताजी तांदळाच्या पिठाची भाकरी सुद्धा उपलब्ध करून देण्यात आली होती. मंडळींनी येथेच्छ मन सोडून भोजन केले, ते यजमानांचे गुणगान गातच. किती दिवसांत असे गावाकडचे घरगुती जेवण खावयास मिळाले नव्हते आणि मिळणारही नव्हते. याचे अप्रुप काही वेगळेच होते.
तेथेच कांहींनी आराम केल्यावर, पुढे कोंडेश्वर मंदिरास भेट देण्याचे ठरले. हे ठिकाणही एका बाजूला असून, तेथे आजूबाजूला डोंगर, डोह, कातळ, आणि जंगलच असल्याचे जाणवले. हा ही एक निर्जन भागच आहे. जुने शिवाचे मंदिर असून, बाजूलाच डोह देखील आहे. येथील डोहात देखील पावसाळ्यात येथे येणाऱ्या पर्यटकांचे अपघात घडत असतात. त्यामुळे हा ही भाग तसा सुरक्षित नाहीयय. परिसरात ह्यावेळी तरी स्वच्छता पाहावयास मिळाली. मुख्य कमानीपासून बरेच आत हे मंदिर छोटेखानीच आहे. येथे लिंग स्थापिलेले असून, गाभाऱ्यात मात्र अंधाराचे साम्राज्य पसरलेले होते. पावसाळ्यात येथील निसर्ग सौंदर्य खुललेले असावे, हे आजूबाजूचा प्रदेश डोळ्याखालून घालताच जाणवते. श्री शंकराचे हे स्थान असल्यामुळे येथे जाणवणारी शांतता देखील भयाण असल्याचे जाणवते. माणसांचा वावर येथे दिसून येत नसल्याने, ती प्रकर्षाने जाणवली असावी इतकेच.
तेथून पुढे परतीचा प्रवास आटोपून आम्ही बदलापूर स्टेशन कधी गाठले हे कळलेच नाही.
No comments:
Post a Comment