Friday, August 30, 2019

गुरुराज स्वामी ......

  *प. पू. सद्गुरु स्वामी भगवान महाराज यांची*
                      *अमृतवाणी*

      *गुरुराज स्वामी आता स्वप्रकाश |*
       *जयापूढे उदास चंद्र रवी ||*
                (भाग दूसरा)

बाबा म्हणतात, "काही ज्योती त्याला प्रकाश हवा म्हणून, ते सताचे ध्यान करीत नाहीत, तर त्याला जीवाची भिती वाटते म्हणून ध्यान करतात." 

बाबा असे कां बरे म्हणत असतील?
आता आपण प्रकाश येणे कोणती स्थिती आणि ध्यान येणे कोणती स्थिती? ह्याबद्दल समजून घेऊ. बाबांना अभिप्रेत असलेला प्रकाश म्हणजे *सताचा शुभ्र प्रकाश.* प्रकाश निरनिराळ्या प्रकारचा असतो. तो लाल येणे ताम्र वर्णी असतो, पित वर्णी देखील असू शकतो, तसाच तो नील वर्णी देखील असू शकतो.

ध्यान येणे डोळे बंद करून अथवा उघडे ठेवून केलेले आपल्या सद्गुरूंचे अथवा भगवंताचे स्मरण होय. या स्मरणात आपण त्यांची छबी अथवा रुप पाहण्याचा प्रयत्न करीत असतो, त्याचबरोबर त्यांचे नामस्मरण देखील करीत असतो.

आता बाबांनी म्हटल्याप्रमाणे, "काही ज्योती त्यांना प्रकाश हवा म्हणून ध्यान करीत नाहीत, तर ध्यान कशासाठी करतात? आपले काही बरे वाईट होऊ नये या भीतीपोटी 
भगवंताचे ध्यान करतात."

येथे प्रश्न पडतो की असे ध्यान कशासाठी करावे? ध्यान भीतीपोटी करावे काय? 

आपले काही बरे वाईट होऊ नये असे जर आपणास वाटत असेल, तर त्यासाठी आपण आपल्या वर्तणुकीत सुधारणा केली पाहिजे. आपले वर्तन, सद्वर्तनी ठेवावयास हवे. सदाचारी रहावयास हवे. आपल्या श्री सद्गुरू माऊलींच्या चार तत्त्वांनुसार वागावयास हवे. अशाप्रकारे आपण आपली स्थिती केली, तर ध्यानात मन रमून, आपल्या प्रकाशाची गतीही वाढीस लागून, आपल्याला आपल्या सताच्या दर्शनाचा लाभ होऊ शकेल आणि म्हणूनच आपले बाबा आपल्याला सांगताहेत, "भीतीपोटी ध्यानधारणा करु नका, तर *ध्यानधारणा भगवंताला पाहण्यासाठी करा.*

पुढे बाबा म्हणतात, "हे सर्व करण्यापेक्षा (म्हणजे भीतीपोटी ध्यान करण्यापेक्षा) आपण असे म्हटले पाहिजे, *" अनंता ! ही आपलीच कृपा आहे. आपल्या चरणांचा आम्हाला ठाव द्या, म्हणजेच स्वप्रकाश द्या, म्हणजे स्वप्रकाशाने मला पूढची वाटचाल करता येईल", मला आपल्या चरणांच्या दर्शनाचा लाभ घेता येईल.* 

 "हे सता !" "स्वप्रकाश नसेल तर मला कुठेही जाता येणार नाही. त्रिगुणांच्या प्रकाशाच्या अनुषंगाने गेलो तर मला ते अजून मायेत गुरफटवतील." 

बाबा पुढे सांगतात, *लक्षात ठेवा, गरीबी परवडली पण अमीरी नको.* 

म्हणूनच आपले बाबा म्हणतात, आपण काय म्हटले पाहिजे, *"सता !" आम्हाला काय पाहिजे तर केवळ तुमचे चरण!"* 

स्वप्रकाशाची मागणी या करीता आहे. ही मागणी तुम्ही मागितली अन् त्यांनी तुम्हाला दिली तर तुमच्यासारखा भाग्यवान दुसरा कोणीही नाही. अन् अशा गतीने प्रत्येक भक्त जाऊ लागला तर, एकनाथांनी सांगितले ते योग्यच आहे. 

श्री सद्गुरू माऊली म्हणते, *"सर्व संतमंडळी या गुरुकुलातल्याच ज्योती होत. स्थुल सुटल्यानंतर त्यांना परत गुरुकुलातच सामावून घेतले जाते. सत त्यांना ज्या ज्यावेळी आवश्यकता असेल, त्या त्यावेळी कर्तव्यासाठी आदेश देऊन पाठवितात. हे अनुभवसिद्ध आहे म्हणूनच एकनाथांनी अनुभवसिद्ध मागणी केली. मागितले काय? तर फक्त *स्वप्रकाश!"*

आपण पहातो लोक वेगवेगळे उपास तापास करीत असतात. शरीराला झीजवत असतात. पण लक्षात ठेवा ! *शरीर हे आत्म्याचे मंदिर आहे. हे शरीररूपी मंदिर आत असणा-या *मा* चे म्हणजेच *आत्म्याचे* मंदिर 
समजून ठेवल्यानंतरच, आतमध्ये मन स्थिर राहील.*

(13) क्रमश:

Wednesday, August 21, 2019

बुलबुल

झावळीवर बसली, बुलबुलांची जोडी
कावळा करु लागला, त्यातच लाडीगोडी
त्या जोडीला ही, लाडीगोडी कांही रुचेना
कावळ्याच्या गोडीगुलाबीला, ती जोडी काही फसेना

बुलबुलांची जोडी,
कावळ्याची लाडीगोडी,
दूर दूर जाई जोडी
थोडी थोडी थोडी थोडी......

Tuesday, August 20, 2019

काया ही पंढरी, आत्मा हा विठ्ठल

*प. पू. सद्गुरु स्वामी भगवान महाराज यांची*
              *अमृतवाणी*

      *गुरुराज स्वामी आता स्वप्रकाश |*
       *जयापूढे उदास चंद्र रवी ||*
                (भाग दूसरा)
        
  *काया ही पंढरी, आत्मा हा विठ्ठल*
        *नांदतो केवळ पांडुरंग*

चोखोबा कोण होते? तर विठ्ठलाच्या देवळात झाडू मारणारे एक भक्त. 

विठ्ठलाला चोखोबा महार आहेत याचे सोयर सुतक नव्हते. विठ्ठल कोण होते? तर साक्षात भगवंत. भगवंताला जाती, पाती काहीही नसते, मग त्यांचा भक्त जातीने कुणी कां असेना? ह्या जाती-पाती कोणी निर्माण केल्यात? तर समस्त मानवानीच नां?

पण तोच चोखोबा म्हणतो, "काया हिच पंढरी आहे" आपली काया म्हणजे आपले शरीर अर्थात आपला हा पंचमहाभूतांचा देह, तर हिच पंढरी आहे. म्हणजेच पांडुरंगाचे स्थान असलेले ठिकाण आहे. अन् त्या देहाच्या पंढरीत हा विठ्ठलरुपी आत्मा आत विठेवर वास करीत आहे ह्याची आपले बाबा आपल्याला जाणीव करून देतात.

बाबा पुढे विचारणा करतात, "आम्ही पंढरपूर कोठे पहातो अन् आमच्या चोखोबाने पंढरपूर कोठे पाहिले? चोखोबा अडाणी असून त्याला हे कळले, मग तुम्ही सांगा, अडाणी श्रेष्ठ कि सुशिक्षित श्रेष्ठ! 

परम् श्रेष्ठ आपल्या बाबांनी म्हटलेलेच आहे, तसेच 
संतानी देखील सांगितलेलेच आहे, *जेथे मांडीले ढोंग, तेथे कैचा आला पांडुरंग* म्हणजेच जेथे ढोंगच ढोंग मांडलेले आहे, अशा ठिकाणी पांडुरंग कसा बरे येईल?

म्हणूनच बाबा पुढे विचारणा करतात, "ज्या ठिकाणी ढोंग आहे तेथे पांडुरंग कसा बरे येईल आणि कुठून येईल? 

*पांडुरंग म्हणजे शुभ्र प्रकाश, पांडुरंग म्हणजे भगवंत !* अशा ठिकाणी तो तेथे स्थिर राहू शकेल का?* 

तो जर स्थिर रहावयाचा असेल, तर त्याकरीता आपली सद्गुरू माऊली म्हणते, "भक्ताने ढोंग रहित होणे गरजेचे आहे. सतशुध्द गतीने वाटचाल करने गरजेचे आहे. मगच तो स्वप्रकाश पहाता येईल. 

त्याकरीता परम् पूज्य श्री सद्गुरू माऊली म्हणते, *"सेवेक-यानों, मायारहित व्हा, शुद्ध व्हा. सर्वस्व जीवन हे त्यांचेच (म्हणजे सताचे) आहे."*

येथे एक गोष्ट लक्षात घेण्यासारखी आहे, ती म्हणजे, आपण केवळ निमित्त (मात्र) आहोत. या मृत्युगोलार्धात, जन्म घेणे अन् अदृष्य होणे हा सिद्धांत आहे. सतयुगापासूनचे ऋषी-मुनीं आजदेखील सानिध्यात आहेत. ते आपल्या (अध्यात्मिक) शक्तिच्या जोरावर अदृष्यही होऊ शकतात.

म्हणून पुढे बाबा म्हणतात, *"ही शक्ति तुम्ही सुद्धा कमाऊ शकता, पण केव्हा तर स्वप्रकाश मिळेल तेंव्हा."* 

*स्वप्रकाश मिळाला नाही तर तुम्ही काही करु शकणार नाही. मग पुनरपी जननम्, पुनरपी मरणम्!* 

चौर्याऐशी लक्ष योनी तुमची वाट पहातच असते. मानव योनीचा फेरा चुकला अन् उरलेल्या त्र्याऐशी लक्ष योनीत जर तुम्ही भटकत राहिलात, मग तुम्ही सत् सानिध्यात कधी येणार? अशी विचारणा आपले बाबा आपणांस करतात.

आणि पुढे जाणीव करून देताना म्हणतात, *हक्काने मानव जन्म मिळाल्याखेरीज सद्गुरु सानिध्य मिळणे दुरापास्त आहे.* 
(14)  क्रमश:

अनगडवाणी