श्रद्धेचे वसतीस्थान जे आहे ते शुद्ध असेल
तर भावना शुद्ध राहील (पान क्रमांक ६)
-परमपूज्य श्री सद्गुरू स्वामी भगवान महाराज-
हे मना ! सज्जन ज्याप्रमाणे भक्तिमार्गाने जातात त्याप्रमाणे तुही वाटचाल कर. बरेच जान देवळात जातात, कुणी लोटांगण घालून घेतात तर कोणी जोरजोरात घंटानाद करतात आणि आपली देवावरची श्रद्धा, भक्ती दाखविण्याचा प्रयत्न करतात. परंतु देवळातील दगडाची मूर्ती काही करते का हो? परंतु जागृत मूर्ती मात्र सर्व काही करते. आत वास करणारे म्हणते, "अरे ! जे काही करतोस हे सर्व तू करतोस." त्यावेळी तुझ्यात वास करणारे आहेत त्याची तू जाण घेतोस का? काही लोक आपण पाहतो की कपाळाला गंध-टीळे लाऊन स्वतःला पांडुरंगाचा सेवेकरी म्हणवितात आणि भजने, कीर्तने करतात. परंतु तुम्हीच सांगा, अशाने पांडुरंग प्राप्त होतो का? आणि हे करत असताना तुमचे आतले मन स्थिर राहू शकते का? अरे ! बाह्य अंगाने निरनिराळे वेश परिधान करून आतले मन स्थिर राहू शकेल का? अरे ! आत वास करणा-या सातच, सद्गुरूंचा माग तुम्ही काढू शकणार आहात का? तुमच्या मनाची एवढी कुवत आहे का? काही सेवेकरी दरबारातून घरी गेल्यानंतर सद्गुरुंबद्दल काही प्रणव काढतात, त्यांना वाटते सद्गुरू आपल्या बरोबर नाहीत, त्यांना थोडेच कळणार आहे? यातच खरी मेख आहे. अनन्तानी आमच्या गृहाला नाव दिले आहे, "मुळाश्रम". अनन्तानी त्याला मुळाश्रम का म्हटले त्याचे कारण अजून माहित नाही. ते जाणणे कठीण. तुकाराम महाराज म्हणतात ना,
तेथे पाहिजे जातीचे, येरा गबाळ्याचे काम नोहे l l
पण जो भक्त, जो सेवेकरी हे साधू शकेल ज्याचे मन सद्गुरुंबद्दलच्या सद्भावनेने ओथंबलेले असेल तोच हे जाणू शकेल. काही भक्त आपल्यावर प्रसंग आला की धावत येतात, इतर वेळी टंगळमंगळ करतात. अशी जर भक्ती असेल, भावना असेल, तर हृदयस्थ विराजमान असलेली सद्गुरुंनी तरी काय करावे? प्रवचन करत असताना थोडे बहुत टोकले हे पाहिजेच. परंतु सद्गुरू माऊली दयाघन आहे. ते त्यातूनही भक्ताला मार्गावर आणण्याचा प्रयत्न करतात. सद्गुरू कसे आहेत, तर अतिविशाल, अतिशांत, अतिकोमल !! भगवद् गीतेत कृष्णानी अर्जुनाला सांगितले,
नाचतो मी तेथे भावो, न भावो विद्यते सता
आहे ते सत् आहे, सद्भावनेने पाहता आले तर ते आहे. सद्भावना नसेल तर पाहता येणार नाही. ज्योत जर सताबद्दल, सद्गुरुंबद्दल सद्भावनेने ओथंबलेली असेल तर तिला सत् पाहता येईल, अन्यथा नाही. त्या सेवेक-याला, त्या ज्योतीला दाखवितात पहा मी कसा आहे. नुसत्या मायाब्रह्मात गुरफटलेला असेल तर त्या सेवेक-याला त्यांचे रूप पाहता येणार नाही. अनुभव घेता येणार नाही. हे मना ! माझ्या हृदयस्थ जे सत्, जे सद्गुरू विराजमान झालेले आहेत, त्यांना शरण जा. सर्वस्व त्यांना अर्पण करून ते कसे आहेत हे पाहण्याचा प्रयत्न कर. हे मना ! त्या सताची शक्ती अमर्याद आहे. ते क्षणात त्रिगुनानाही लय करू शकतात, तेथे तुम्हा आम्हा मानवांचा काय पाडाव लागणार? आपल्या सद्गुरुना, आपल्या बाबाना जर सेवेक-यांनी ओळखले आणि जर त्यांनी सहज जरी प्रश्न विचारले तर सत्शुद्ध भावनेने उत्तर देता आले पाहिजे. हेतू रहित, आत-बाहेर काही न करता सांगता आले पाहिजे. उत्तर हेतू रहित दिले पाहिजे. ज्यावेळी एखाद्या सेवेक-यांवर प्रसंग येतो, त्यावेळी त्याचे मायाब्रह्म त्याच्या उपयोगी येते का?
काही सेवेकरी दरबारात आल्यानंतर जवळ बसण्याचा प्रयत्न करतात, परंतु तुम्ही हे लक्षात ठेवा, "जवळ असो अगर लांब असो, सद्गुरूंचे प्रत्येक सेवेक-यावर संपूर्ण लक्ष असतेच." मन विशाल असेल तर असे तरंग, असे विचार मनात येणार नाहीत. जे मन विशाल, मोकळे असते तेच सताबद्दल, सद्गुरुंबद्दल सद्भावनेने ओथंबलेले असते. म्हणून सेवेक-यानो हे लक्षात घ्या, माया हीच तुम्हाला सतापासून दूर नेते. सद्गुरू, सत् जाणून बुजून कोणत्याही भक्ताला दूर करत नाहीत. मन जर सद्भावनेने ओथंबलेले असेल, तर तो सतापासून, सद्गुरुंपासून कदापीही दूर जाणे शक्य नाही. प्रत्येक सेवेक-याने ही भावना सदैव मनात बाळगवयाला हवी की ज्या ठिकाणी मी आहे, त्या ठिकाणी माझे सद्गुरू माझ्या बरोबर असणारच. मी आणि सद्गुरू वेगळे नाहीत. जगात सर्वकाही तुम्हा-आम्हापासून दूर जाऊ शकेल, परंतु सद्गुरू कदापीही तुमच्यापासून दूर जाणार नाहीत.
Mayur Tondwalkar
No comments:
Post a Comment