सिलिंडर न घेणारा देशभक्त - देशभक्तीची नवी
व्याख्या......!!!
काय गम्मत आहे पहा ! काय तर म्हणे गॅस ग्राहकांना ‘देशभक्त’
बनण्याची नामी संधी चालून आलेली आहे. बरे हे कसे बरे व्हावे? तर त्यासाठी फक्त
एवढेच करायचे की गॅस कंपन्यांना तुम्ही एक अर्ज करायचा व त्यावर लिहून द्यावयाचे
की आम्हाला तुम्ही देत असलेला सवलतींच्या दरातील सिलिंडर नको. बस्स ! इतकेच. आहे
की नाही गम्मत. किती साधी अन सरळ योजना आहे ही, आणि तुम्ही म्हणता ‘देशभक्त’
होण्यासाठी देशासाठी रक्त सांडावे लागते, अतिरेक्यांशी मुकाबला करावा लागतो, सामाजिक
बांधिलकीची जपणूक करावी लागते, देशासाठी आणि देशाच्या कार्यासाठी वाहून घ्यावे
लागते, हे साफ खोटे आहे, हे ह्यांनी वरील गोष्टीतून दाखवून दिलेले आहे. फक्त अर्ज
करा, आणि तोही कशासाठी तर सवलतींचा गॅस सिलिंडर नको म्हणण्यासाठी अन व्हा ‘देशभक्त’.
आहे की नाही ही अक्कल हुशारी. अशाप्रकारे कोणीही उद्या ‘देशभक्त’ म्हणून मिरवू शकतो
आणि ‘देशभक्त’ म्हणून सरकरी सोयी-सुविधा मिळविण्यासाठी मोठ्या रुबाबात त्या मिळवू
शकतो. मानायला पाहिजे ह्यांच्या ह्या अकलेला आणि अकलेशी काडीमोड घेतलेल्या अकलेच्या
ह्या कांद्यांना.
ह्या साध्या दोन ओळी तुम्ही लिहून दिलात की, झालात की
तुम्ही ‘देशभक्त’. वा ! फारच सुंदर कल्पना आहे मांडलेली ह्या पेट्रोलियम
कंपन्यांनी आणि पेट्रोलियम मंत्रालयाने. किती साधे अन सरळ आहे हे काम, नाही का?
अशाप्रकारे एका दगडात दोन पक्षी मारण्यासारखेच हे काम सोपे करून ठेवले आहे ह्या
तथाकथित ‘देशभक्तीचा’ नारा पिटना-यांनी. इकडे अर्ज द्या, तिकडे देशभक्त व्हा. वा,
काय शक्कल लढविली आहे ह्या बहाद्दरांनी. खुपच छान. असे जर ‘देशभक्त’ निर्माण झाले
असते तर मग काय विचारता? सगळीकडे ‘देशभक्त’ अन ‘देशभक्त’च दिसले असते नाही का?
इतकेच करून हे भागवान थांबलेले नाहीत, तर त्यांनी पुढे
असेही जाहीर करून टाकलेले आहे की, जो कोणी असे करेल, त्याला “वी. आय. पी.” सुविधा देण्यात
येतील. आता हे “वी. आय. पी.” कोण? तर सवलतींचा सिलिंडर नाकारणारे तथाकथित, ह्यांच्या
सांगण्याप्रमाणे करणारे लोकं.
हे लोकांना खुळे की वेडे समजतात? त्यांना कसे बरे वाटले की,
असे लोकं लिहून देतील अन ताबडतोब ‘देशभक्त’ होतील? कोणतेही देशासाठी कार्य न करता,
बलिदान न करता, फक्त ह्या तथाकथीताना लिहून दिल्यामुळे जर का लोकांना ‘देशभक्त’
होण्याची संधी हे जर देत असतील, तर लोकांनी ती अवश्य घ्यावयास नको का? घर बसल्या ‘देशभक्त’
होण्याची ही नामी संधी लोकांनी दवडता कामा नये आणि त्याचबरोबर ‘देशभक्तांसाठी’ देण्यात
येणा-या सोयी-सुविधा, सवलती जें जें म्हणून काही हे वाटायला निघाले आहेत ते सगळे,
पदरात पाडून घ्यावयास हवे, नाही का? आयतीच संधी ह्या शहाण्यासुरत्या, अक्कल्बाज
लोकांनी लोकांना उपलब्ध करून दिलेली असताना, ती सर्व-सामान्यांनी नाकारावी किंवा
घेऊ नये असे कसे बरे आम्ही म्हणावे? घ्या बापडयांनो, ही संधी जरूर घ्या, आणि
स्वताचे आणि सगळ्यांचे कोटकल्याण करून घ्या. अशी संधी पुन्हा मिळणे नाही. तर, मग
घेणार ना ही ‘देशभक्त’ होण्याची संधी? आणि होणार ना ‘देशभक्त’. जरूर व्हा, ताबडतोब
व्हा. एकदा का ही संधी तुम्ही गमावलीत, तर पुन्हा अशी संधी तुम्हाला तुमच्या उभ्या
आयुष्यात सापडायची नाही. तर मग घेताय ना, ही संधी?
मयुर तोंडवळकर – 9869704882/9869450934